महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारादरम्यान ढवळून काढलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये नेमकं काय चित्र असेल, याबाबत संपूर्ण राज्यात प्रचंड उत्सुकता आहे.
मावळ मतदारसंघात एकूण सात उमेदवार रिंगणात होते. मात्र खरी लढत महायुतीचे उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांच्यात आहे. 2009 आणि 2014 मध्ये भाजपमधून भेगडे आमदार झाले. त्यानंतर ते तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहे.
भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या सुनील शेळके यांचा पत्ता कट करून भेगडे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. हेच टायमिंग साधत राष्ट्रवादीने शेळके यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देऊन भेगडे यांना तगडे आव्हान दिले.
शेळके हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आहेत. नगरपरिषदेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता.
मावळ विधानसभा मतदार संघात भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हॅटट्रीकचे स्वप्न भंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके यांनी 1 लाख 16 हजार मतांनी भेगडे यांचा पराभव केला आहे. आयत्यावेळी पक्ष बदल करीत त्यांनी भेगडे यांना जोरदार टक्कर दिली.
पहिल्या फेरीपासून सुनील शेळके आघाडीवर होते. फेरीनिहाय शेळके यांची आघाडी वाढतच गेली. भेगडे यांचे दहा वर्षातील संस्थान खालसा झाले असून मावळात आला शेळके यांचे पर्व सुरु झाले आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायाल विसरू नका.