आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासुन अनेक मोदी समर्थक लोकांच्या सभेमध्ये देशात अमुक करायचं असेल, तमुक करायचं असेल तर “मोदींसारखी ५६ इंचाची छाती असावी लागते” हा डायलॉग हमखास वापरला जातो. विशेषतः विरोधी पक्षांतील नेत्यांनी मोदींवर कुठल्याही मुद्द्यावर टीका केली की त्यांना उत्तर देताना मोदींनी हे केलं, मोदींनी ते केलं सांगून विरोधी पक्षांनी आजपर्यंत काय केले असा प्रश्न विचारला जातो. प्रश्न विचारुन झाल्यावर उपस्थितांच्या टाळ्याशिट्ट्या घेण्यासाठी हा डायलॉग वापरायचा मोह भाषण करणाऱ्या मोदी समर्थकांना आवरत नसल्याचे आपण कित्येकदा बघितले आहे.
परंतु आपण वापरत असलेल्या या डायलॉगमध्ये किती दम आहे, खरंच मोदींची छाती ५६ इंचाची आहे का ते मोदी समर्थक आणि मोदी विरोधक कुणीही तपासुन पाहिले नाही. मोदीप्रेमात आंधळे झालेल्या भक्तांना जर यातील वास्तव समजले तर ते सुद्धा पडतील अशी एकंदर वस्तुस्थिती आहे. मोदींची छाती खरोखरच ५६ इंचाची आहे का ते जाणुन घेण्यासाठी पुढील प्रसंग वाचा.
…हा प्रसंग २०१६ मधील आहे. या प्रसंगाची माहिती २१ जानेवारी २०१६ रोजीच्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये देण्यात आली आहे. झालं असं की लखनऊ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या सहाव्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणुन निमंत्रीत करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोदींना परिधान करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने एक खास कुर्ता तयार करण्यात येणार होता. साहजिक विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी मोदींचे मोजमाप विचारण्यासाठी प्रधानमंत्री कार्यालय (PMO) येथे संपर्क केला. त्यावेळी प्रधानमंत्री कार्यालयाकडुन माहिती देण्यात आली की, मोदींच्या छातीचे मोजमाप ५० इंच असुन खांद्याचे मोजमाप २१ इंच आहे.
मोदींच्या कुर्त्यासाठी मोजमाप मिळाल्यानंतर विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सुप्रसिद्ध अनिल नंदा नावाच्या टेलरकडून मोदींसाठी सोनेरी रंगाचा कुर्ता शिवून घेतला. नंतर त्या टेलरला संपर्क केल्यावर “हा राजकीय विषय” असल्याचे सांगुन त्याने यावर भाष्य करणे टाळले होते.
५६ इंच छातीचा विषय कुठुन आला ?
२०१४ च्या लोकसभा निवडणुकांवेळी नरेंद्र मोदींनी आपल्या प्रचारात “५६ इंच छाती” हा शब्दप्रयोग वापरला होता. त्यावेळी तो खुप प्रभावी ठरला. त्याचं असं झालं की लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत समाजवादी पार्टीचे मुलायमसिंग यादव यांनी मोदींवर निशाणा साधताना एका सभेमध्ये “मोदीजी उत्तरप्रदेशला दुसरा गुजरात बनवू शकत नाहीत” असा टोला लगावला होता.
त्यावर मोदींनी दुसऱ्या एका सभेमध्ये “उत्तरप्रदेश दुसरे गुजरात बनू शकत नाही, कारण गुजरात बनविण्यासाठी ५६ इंचाची छाती असावी लागते” या शब्दात उत्तर दिले होते. तेव्हापासून ५६ इंचाची छाती हा मुद्दा मोदी समर्थकांनी अनेक सभांमध्ये वापरला. परंतू मोदींची छाती तर ५६ इंचाची नसून ५० इंचाची असल्याचे त्यांच्यापैकी कित्येकांना माहीतच नाही.
५६ इंचाची छाती हा शब्दप्रयोग शक्यतो शब्दशः त्याच अर्थाने वापरला जात नाही. साहस, धाडस किंवा निर्णय घेण्याची क्षमता अंगी असणाऱ्या लोकांसाठी तो वापरण्यात येतो. मोदींच्या बाबतीत त्यांनी देशात सर्वसामान्य लोकांना त्रासदायक ठरलेली नोटबंदी, लघुद्योगाचे कंबरडे मोडणारा जीएसटी कायदा किंवा अचानक कुठल्याही नियोजनात नसताना पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाऊन येणे यासारखे मागचापुढचा विचार न करता घेतलेले आततायी निर्णय पाहता, त्यांच्या भक्तांसाठी मोदी ५६ इंच वाले ठरतात यात काही शंका नाही ! भले लोकांना पटो ना पटो…
अनिल माने, पुणे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.