गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यावर काल शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या साधेपणाचे किस्से २ दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले आहेत. खासरेवर असेच त्यांचे काही खास किस्से बघूया ज्याची खूप चर्चा झाली.
मुख्यमंत्री झाल्यानंतर पर्रीकरांनी पहिल्याच दिवशी त्यांनी दोन महत्वाचे निर्णय घेतले होते. गोव्यातील अवैध मायनिंग बंद केले आणि पेट्रोल- डिझेलवरचा कर २०% वरून ०.१% केला होता. या निर्णयामुळे गोव्यात पेट्रोल २०रू. स्वस्त झाले. या निर्णयावर प्रचंड टीका देखील झाली. होणारं प्रचंड महसुली नुकसान भरून निघणं अशक्य आहे आणि गोवा सरकार दिवाळखोरीत निघेल अशी भिती व्यक्त होऊ लागली होती.
पण त्यांनी सर्व गोष्टी प्लॅनिंगनेच केल्या होत्या. त्यांनी दाबोलीम अंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानासाठी लागणाऱ्या व्हाईट पेट्रोलवरचा करही घटवला आणि त्याबदल्यात विमान कंपन्यांनी गोव्यासाठीच्या तिकीटदरात कपात केली. त्यामुळे गोव्यात देशी- विदेशी पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली. तसेच त्यांनी गोव्यातील कॅसिनोंवरचे करही वाढवले. त्यांच्या या निर्णयांनी गोव्यातील पर्यटन वाढले, स्थानिकांचे रोजगार वाढले, उद्योगांना चालना मिळाली आणि महसूली नुकसानही भरून निघाले होते.
मी गोव्याच्या जनतेचा ट्रस्टी आहे , त्यामुळे जनतेचं नुकसान होईल असा एकही निर्णय मी घेणार नाही असं ते नेहमी म्हणत आणि गोव्याच्या जनतेचाही त्यांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास असे.
गेल्या दोन वर्षात गोव्याच्या प्रशासनातून भ्रष्टाचार जवळपास हद्दपार केला होता. एजंट, कॉंट्रॅक्टर, सरकारी कर्मचारी अगदी प्रामाणिकपणे कामं पूर्ण करत. गोव्याच्या अगदी लहानात लहान गल्लीबोळातील स्वच्छ, चकचकीत रस्ते पाहिले की याची साक्ष पटते.
पर्रीकरांना निरनिराळ्या मार्गांनी लाच देऊन त्यांची प्रतिमा डागाळण्याचेही अनेक प्रयत्न झाले पण पर्रीकर कशालाच बधले नाहीत. ५८ वर्षांचे पर्रीकर बऱ्याचदा १६ तास काम करायचे. मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्यामुळे जास्त वेळ काम करावे लागायचे.
एके दिवशी काहीतरी महत्वाचं काम असल्याने त्यांचे सचिव रात्री १२ पर्यंत ऑफिसमधे त्यांच्यासोबत होते. जाताना त्यांनी विचारलं की उद्या थोडं उशीरा आलं तर चालेल का? यावर पर्रीकर म्हणाले की हो चालेल. उद्या थोडं उशीरा म्हणजे साडेसहापर्यंत आलात तरी चालेल! ते सचिव दुसऱ्या दिवशी साडेसहाला ऑफिसमधे आले तेंव्हा त्यांना वॉचमननं सांगितलं की साहेब सव्वापाचलाच आले आहेत!
अशाच प्रकारचे पर्रीकरांचे अनेक किस्से गोव्यात प्रसिद्ध आहेत.माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.