भारतात पुलवामा येथे CRPF जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानातल्या बालाकोट इथं हवाई हल्ला करून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले आणि जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्याची शौर्यगाथा अजुनही देशभर चर्चेचा विषय आहे. भारताच्या एअरस्ट्राईकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले होते याचा अधिकृत आकडा काही समोर आला नव्हता.
या सर्व चर्चा देशभरात सुरु असतानाच आता लष्कराच्या तिसऱ्या सर्जिकल स्ट्राईकची माहिती समोर आलीय. म्यानमारच्या सीमेवर असलेल्या दहशतवाद्यांचे तळ भारतीय लष्कराने उद्धवस्त केले आहेत. म्यानमारच्या लष्करासोबत संयुक्त कारवाई करून भारतीय लष्कराने ही कामगिरी फत्ते केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १७ फेब्रुवारीला ही कारवाई सुरू झाली आणि २ मार्चला संपली. तब्बल दोन आठवडे सुरू असलेल्या या कारवाईत दहशतवाद्यांच्या अनेक छावण्या, तळ आणि केंद्र उध्वस्त करण्यात आलेत.
भारत आणि म्यानमारच्या सीमेवर रोहिंग्या, अराकान आर्मी आणि NSCN (K) या दहशतवादी संघटनेने तळ निर्माण केले होते. त्या भागात सुरू असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर हल्ला करण्याची त्यांची योजना होती. याची माहिती मिळाल्यानंतर भारताचं लष्कर आणि म्यानमार लष्कराने संयुक्त योजना आखून ही धडक कारवाई केली.
याला सर्जिकल स्ट्राइक म्हणता येईल?
याला सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल कि नाही याबाबत साशंकता आहे. कारण यापूर्वीही भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये बंडखोरांविरोधात मोठी कारवाई केली होती. सप्टेंबर २०१७ मध्ये भारतीय लष्कराने अशाच स्वरूपाची मोठी कारवाई करून नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड NSCN(K) या बंडखोर संघटनेचे कंबरडे मोडले होते.
त्यावेळी केलेली कारवाई हे सर्जिकल स्ट्राईक नव्हते अशी माहिती लष्कराने दिली होती. त्यामुळे आता भारतीय लष्कराने आणि म्यानमार लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाईला सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल कि नाही याबाबत साशंकता आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.