पुलवामा येथे CRPF च्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याला काहीच दिवस झाले असताना जम्मू पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले आहे. जम्मूत एका बस स्टॅण्डवर मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात १८-२० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अगोदर एक मोठा आवाज झाला. हा आवाज टायर किंवा अजून काही फुटल्याचा असेल असा अंदाज लोकांनी बांधला. पण काही क्षणात हा ग्रेनेड हल्ला असल्याचे समोर आले. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले.
या स्फोटाची तीव्रता खूप जास्त होती. स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांचे काच फुटले. स्फोटाचे अधिकृत कारण समोर आले नसले तरी हा ग्रेनेड हल्ला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण असताना या स्फोटामुळे वातावरण अजून बिघडणार अशी चिन्हे आहेत. जम्मूचे पोलीस महानिरीक्षक एम. के. सिन्हा यांनी हल्ल्याच्या घटनेला दुजारो दिला आहे. गर्दीनं गजबजलेल्या बस स्थानकावरच हा हल्ला झाला आहे. त्यामुळं जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.
१४ फेब्रुवारीला पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. यानंतर भारताने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत चोख प्रत्युत्तर दिलं.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अलर्ट जारी असताना आणि ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना देखील हा स्फोट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.