शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाचं काल त्यांच्या जयंतीदिनी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. पण या स्क्रिनिंगला वाद झाल्याचे बघायला मिळाले आहे. मुंबईतील वरळी आयनॉक्समध्ये काल संध्याकाळी साडेसात वाजता ठाकरे चित्रपटाचं स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं.
स्पेशल स्क्रिनिंगला मान्यवर आणि विशेष निमंत्रितांची विशेष आसनव्यवस्था करण्यात येत असते. हि जबाबदारी निर्माते आणि प्रिमियरच्या आयोजकांची असते. पण ठाकरे चित्रपटाच्या दिग्दर्शकालाच या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला आहे.
ठाकरेचे दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना थिएटर मध्ये कुटूंबियांसह पोहचण्यास उशीर झाला. ते सिनेमातील एक महत्वाचे व्यक्ती आहेत. पण त्यांना उशीर झाल्यामुळे एकदम पुढच्या सीटवर बसवण्यात आलं. त्यामुळे पानसे यांनी सिनेमाचं स्क्रिनिंग अर्ध्यावर सोडून थिएटरमधून ते बाहेर पडले. यावेळी निर्माते संजय राऊत आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे देखील बोलले जात आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक असूनही अभिजीत पानसे आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसायला नीट जागा का देण्यात आली नाही हा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. संजय राऊत यांनी पानसेंची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. पण यात त्यांना यश आलं नाही. पानसे कुटुंबासह घरी निघून गेले. अभिजित पानसे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर संजय राऊत यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या घटनेला मनसे-सेना वादाची किनार?
या घटनेला मनसे सेना वादाची किनार तर नाहीयेना असा प्रश्न उपस्थित होत आहेत. पानसे हे मनसेचे नेते आहेत तर निर्माते संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. ठाकरे चित्रपटाच्या प्रमोशनमधून डावलल्याची खदखद अभिजीत पानसेंच्या मनात आधीपासूनच होती.
‘मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटाला शुभेच्छा,’ असा मजकूर असलेले पोस्टर्स देखील मनसेने लावले होते. नवाझुद्दीन सिद्दीकीची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २५ जानेवारीला मराठी आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…