सध्या देशात जातीय तणावाचं वातावरण कमालीचं टोकाला पोचलेलं आहे. राजकीय फायदे आणि व्यक्तिगत मतलब सध्या करण्यासाठी जो तो व्यक्ती आपले जातीय गट मजबूत करण्यात व्यस्त आहे. पण या सगळ्या बाबीला छेद देणारा एक आदर्श पायंडा औरंगाबादमध्ये पाडला जात आहे. शहरात नामांकित असलेल्या बनसोड क्लासेसचे संचालक रविंद्र बनसोड पाटील यांनी एका दलित मुलीला दत्तक घेऊन थेट तिला डॉक्टरच बनवलं आहे.
वडिलांच्या गरिबीमुळे अत्यंत हलाखीचे जीवन जगणारी दीक्षा कांबळे ही मुलगी सध्या औरंगाबादच्या नामांकित शासकिय मेडिकल कॉलेज मध्ये दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेत आहे. दलित विद्यार्थिनीचं पालकत्व स्वीकारून तिला एमबीबीएस पर्यंत पोचवण्याचं काम करणाऱ्या मराठा शिक्षकाची ही जातीय सलोख्याच्या आदर्श वस्तुपाठ घालून देणारी प्रेरक कहाणी..!
दीक्षा कांबळे ही नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातली गरीब विद्यार्थिनी..! देगलूर शहरातल्या सिद्धार्थ नगर परिसरात तिचं छोटसंच घर, आई वडील दोघेही अशिक्षित… आई घरचंच काम करण्यात व्यस्त असायची तर वडिलांचं छोटासा अपघात झाल्यामुळे ते जास्त श्रमाची कामं करू शकायचे नाहीत. त्यामुळे दिक्षाचं घर हे तिच्या काका आणि आजीवर अवलंबून होतं. त्यामुळे घरात प्रचंड आर्थिक ओढताना व्हायची, कुठलीच गोष्ट वेळेवर मिळू शकली नाही. त्यामुळे तिला देगलूर शहारातल्याच सरस्वती विद्यालयात शाळेत घालण्यात आलं दीक्षा ही लहानपणासुन हुशार, तिची अभ्यासात चांगली प्रगती होती. हस्ताक्षरही अतिशय सुंदर… घरच्यांना वाटायचं की ही पुढे कुठल्यातरी मोठ्या हुद्द्यावर जाईल. पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आपण तिला शिकवू शकणार नाही याची जाणीव होतीच.
दिक्षाची दुसरी पर्यंतची शालेय प्रगती पाहून तिचे काका दिनकर कांबळे यांनी तिला आपल्यासोबत औरंगाबादला आणले, दिनकर कांबळे हे औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयात काम करायचे त्यांनाही पगार तुटपुंजा त्यात भागेल नाही भागेल ही त्यांचीच मारामार..! पण भावाच्या मुलीला शिकवण्याच्या जिद्दीपोटी त्यांनी दिक्षाला औरंगाबादला आणलं. वर्षभर दीक्षा ही औरंगाबादेत राहिली पण काकांची काही आर्थिक गणितं जुळेनात. परिणामी चौथीला दिक्षाला पुन्हा देगलूर पाठवण्यात आलं.
चौथीपासून पुन्हा दीक्षा सरस्वती विद्यालयात जाऊ लागली. शहर आणि शाळा बदलली तरी तिच्या बौद्धिक पातळीत कुठलीच कमतरता आली नाही ती सतत अभ्यासात उत्कृष्टच राहिली. पण या कालावधीत तिला काही जातीय चटके बसू लागले. दिक्षाला परीक्षेत मार्क चांगले मिळायचे पण दलित असल्यामुळे प्रॅक्टिकल आणि इतर शैक्षणिक ऍक्टिव्हिटीत तिचे गुण मुद्दाम कापले जायचे.
हे सगळे जयीयवादाचे चटके सोसत दीक्षा ही कशीबशी सातवी पास झाली पण आता पुढे काय करणार कुठे जाणार हा प्रश्न तिच्यासमोर होता. आई वडिलांनी तर परिस्थितीपुढे हातच टेकले होते. दिक्षाची शेवटची आशा होती ती तिचे काका. काकलाही खुप काही करावं वाटायचं पण त्यांचीही जेमतेम परिस्थिती. त्यामुळे त्यांचेही हात बांधलेले. पण पुढे दिक्षाचे काका बनसोड क्लासेसचे संचालक रविंद्र बनसोड यांना भेटले आणि दीक्षा कांबळेचं आयुष्यच बदलून गेलं.
दीक्षा तेंव्हा नुकतीच सातवी पास झालेली, मार्क चांगले होते, आणि स्वभावतःच चुणचुणीत..! दिक्षाच्या काकांचा मुलगा हा आधीपासूनच बनसोड क्लासेस मध्ये शिकवणीला होता. त्याच्या फिस मध्ये कंशीषण मिळावं म्हणून दिनकर कांबळे हे रविंद्र बनसोड यांना भेटले. बनसोड सरांनाही तात्काळ त्यांना फी मध्ये सवलत दिली. ही सवलत मिळाल्यानंतर दिनकर कांबळे यांना राहवलं नाही आणि त्यांनी आपल्या भावाच्या मुलीचा असा असा प्रॉब्लेम असल्याचं सांगितलं. तेंव्हा रविंद्र बनसोड यांनी मुलीला घेऊन या मग पाहू असं सांगितलं.
काकांनी दुसऱ्याच दिवशी दीक्षा कांबळेला सरांसमोर हजर केलं. तेंव्हा सरांनी दिक्षाला पहिलाच प्रश्न विचारला की तुला आयुष्यात काय व्हायचंय तेंव्हा सातवी पास झालेल्या दिक्षाने आपल्याला डॉक्टर व्हायचं असल्याचं सांगितलं. दिक्षातला चुणचुणीत पणा पाहून रविंद्र बनसोड यांनी तात्काळ निर्णय घेतला की या मुलीला आपण दत्तक घ्यायचं. आणि त्यांनी तात्काळ आपल्याच जिगीशा इंटरनॅशनल स्कुल मध्ये अडमिशन करून दिलं. आणि तिचं पूर्ण शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं..!
रविंद्र बनसोड पाटील हे औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापुत तालुक्यातील एकबुर्जी वाघालगावचे… वडील सिनिअर अकाऊंटंट त्यामुळे रविंद्र बनसोड यांचं mpsc करायचं फिक्स होतं. पण त्यावेळी औरंगाबादला एकही mpsc चा चांगला क्लास नव्हता. त्यांनी जिथे क्लास तिथले शिक्षक बनसोड यांनाच समीकरणे विचारायचे. त्यामुळे एक दिवस क्लास चालकाने बनसोड यांनाच लेक्चर घेण्याची विनंती केली. तिथून पुढे सहजयोगाने लेक्चर झाले. आणि पूढे दोन वर्षात त्यांनी आपले स्वतःचे क्लासेस सुरू केले. सुरुवातीला गडको परिसरात एक इमारतीच्या बेसमेंट मध्ये 15 बाय 20 इतक्या छोट्याशा जागेत सुरू केलेल्या क्लासेसने महाकाय स्वरूप धारण केलंय.
आज औरंगाबाद आणि नगर येथे बनसोड क्लासेसचे तब्बल सात सेंटर आहेत. 4 कॉलेज आहेत तर एक केजी पासून ते 10 पर्यंत इंटरनॅशनल शाळा आहे. त्यांच्याकडे आज जवळपास साडेचार हजार विद्यार्थी शिकतात तर वेगवेगळ्या अस्थापनांवर तब्बल एक हजार कर्मचारी काम करत आहेत. इतकं सगळं साम्राज्य उभं केल्यानंतर बनसोड सर सांगतात की मी जर एमपीएससीतुन एखादा अधिकारी झालो असतो तर माझ्या हातून एवढं मोठं शैक्षणिक कार्य झालं नसतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगारही देऊ शकलो नसतो.
स्वतःच्या क्लासेसची इतकी अफाट प्रगती असूनही रविंद्र बनसोड यांचे पाय जमिनीवर आहेत. आजही ते दरवर्षी या साडेचार हजार मुलांमधून तब्बल 160 विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारतात आणि त्यांच्या पूर्ण शैक्षणिक आयुष्याची जबाबदारी घेतात. पालकत्व स्वीकारताना तो मुलगा खरंच पुढं जाईल का याची ते तपासणी करतात आणि निवड करतात. दीक्षा कांबळे हिने सुद्धा वयाच्या 14 व्या वर्षी आपल्याला डॉक्टर व्हयचंय असं सांगितलं आणि आज 19 व्या वर्षी ती औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिकते आहे.
हे सगळं करत असताना रविंद्र बनसोड यांनी विद्यार्थ्यांची कधीही जात पहिली नाही तर फक्त त्यांच्यात असलेली विद्वाता आणि व्यक्तित्वातली चुणूक पहिली. असे अजूनही अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना आयुष्य रविंद्र बनसोड यांनी घडवलं आहे. सरांच्या या कृतज्ञ मदतीबद्दल मी दिक्षाला विचारलं तेंव्हा दीक्षा कांबळे म्हणाली, “की जातीच्या पलीकडे जाऊन फक्त गुणवत्तेचा सन्मान करण्याची सरांची जी वृत्ती आहे ती मी मनोमन माझ्या व्यक्तिमत्वात उतरवण्याचा प्रयत्न करीन आणि भविष्यात मला कितीही जातीय त्रास झाला तरीही मी जातीवाद करणार नाही” रविंद्र बनसोड सरांनी केलेल्या कामाची उपलब्धी खरंच कमी नाही.
सध्या देशासह राज्यात जातीय धार्मिक पोत बिघडत असताना, जातीय अजेंडे अधिक विखारी होत असताना दीक्षा कांबळे आणि रविंद्र बनसोड या दोन विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं जातीयवादी मनोवृत्ती समोर एक वेगळा आदर्श निर्माण करणारं आहे.
– दत्ता कानवटे
आदर्शवत कार्य ! अभिनंदन ! ?
आदर्श घ्यावा तो बनसोड सरांकडूनच