प्रति,
राष्ट्रातील सर्व जनता.
हे पत्र फक्त सरकारला किंवा कुण्या एका व्यक्तीला उद्देशून नाही, तर भारत या कृषिप्रधान देशातील तमाम जनतेला आहे, याची सुरवातीलाच नोंद घ्यावी.
मी एक शेतकरी, बळीराजा, भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा (कि जो आज पूर्णपणे मोडला आहे). या पत्रातून मी टीका करणार नाहीये. मात्र कुठे टीका वाटली तर ती लाल-हिरव्या मिरची सारखी झोंबू शकते. अशावेळी आम्हीच पिकवलेल्या उसाची साखर खाऊन तोंड शांत करून घेण्यात धन्यता मानावी. वास्तववादी परिस्थिती किंवा घटना समोर आणल्या कि त्या झोंबतात च, कितीही नाही म्हटलं तरी.
सुरवातीलाच थोडासा इतिहासाचा संदर्भ देतो. इंग्रजांनी भारतात पाऊल ठेवलं, त्या काळाच्या कित्येक अगोदर पासून भारतात सोन्याचा धूर निघत होता. खर आहे ते, सोन्याचा धूर च होता तो. कारण आम्ही शेतकरी मातीतून सोन उगवत होतो. काळी माती हीच आमची सोन्याची खाण होती. त्यात आम्ही अगदी आमचं देहभान विसरून राबत होतो, आजही राबतो, आणि यापुढेही अखंडपणे राबत राहू, यात शंका नाही.
अगदी त्या काळापासून ते आजतागायत आमच्या पूर्वजांचा, आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन काळ्या मातीतून हिरव सोन काढीत होतो, आजही काढतो. मात्र इंग्रजांनी पाय रोवले आणि सोन्याचा धूर कुठे गायब झाला ते कळलेच नाही. या घटनेला जबाबदार कोण, हा प्रश्न अजूनही उत्तराविना एका गाठोड्यात बांधुन एका कोपऱ्यात तसाच पडून आहे.
गेल्या ३ ते ४ वर्षांपासून एक वाक्य नेहमी ऐकायला मिळते, “वावर आहे तर पावर आहे…” पावर हा शब्द ऐकायला खूप छान वाटतो. आज माझ्याकडे ५० एकर वावर आहे, मात्र पावर आहे का.? हा दुष्काळ, ती महागाई, शेतमालाला नसणारा भाव. ह्याव-त्यांव गोष्टींनी माझ्यात पावर च नाही राहिली, मग वावर असून उपयोग काय.? पण मी मात्र परिस्थिती समोर कधी हतबल होत नाही. दुष्काळ असो कि इतर काही, मी मात्र सगळ्या परिस्थितीला सामोरे जातो.
भारत हा तसा कृषिप्रधान देश आहे, होता आणि असेलही. मात्र कृषिप्रधान देशाच्या प्रधान मंत्र्यांना मला विचारायचं आहे कि, तुम्ही काय करत आहात शेतकऱ्यांसाठी.? शेतमालाला भाव नाही, कांदा सडत चालला आहे, महागाई वाढत चालली आहे. काय प्रयत्न आहेत सरकारचे.? हा प्रश्न फक्त सरकारसाठी आहे, त्यात विरोधी सरकार पण आलेच. कित्येक वेळा हा प्रश्न विचारला गेला याला माप नाही.
तुमच मात्र नेहमी सारख एकच उत्तर, “अभ्यास सुरु आहे.” अरे कसला घंट्या चा अभ्यास सुरु आहे तुमचा? इतके दिवस एखाद्या १२ वी च्या पोराने अभ्यास केला असता तर ५ वर्षात ते पोरग कलेक्टर नक्कीच झाल असतं आणि तुमची चांगलीच मारली असती……असो, संस्कार आणि शिकवण आहे शेतकऱ्यांवर कि कुणावर मारण्यासाठी उगीचच हात उगारायचे नाही. मात्र संतापाचा अतिरेक झाला तर लक्षात असू द्या, नांगर आणि बैल फक्त शेतकऱ्यांकडे आहे.
सार जग माझ्याकडे अन्नदाता म्हणून पाहत. योग्यच आहे ते. देणारा दाता असतो आणि जगाला अन्न देण्याच पवित्र काम आम्ही शेतकरी देतो म्हणून आम्ही अन्नदाता. पण एक सांगू, मी अन्नदाता असलो तरीही ते अन्न खाण्यासाठी माझ्याकडेच दात नाही राहिले आता. वय झालंय आता, साठी तर केव्हाच ओलांडलीये. मात्र आजही एखाद्या तरुणाप्रमाणे शेतात काम करायला जोमाने उभा असतो. समोर दुष्काळ जरी रेड्यावर बसून आला कि नाय तरी मी अशा थाटात उभा असो कि माझा आत्मविश्वास पाहून त्या रेड्याची फाटते.
मात्र एक लक्षात असू द्या, ज्या दिवशी भाकरी पिझ्झा प्रमाणे ऑनलाइन मागवावी लागेल ना, त्या दिवशी शेतकऱ्याची किंमत कळेल तुम्हाला. आणि सरकारने वेळीच लक्ष आमच्या कडे नाही दिले तर त्याचं भाकरीच्या तुकड्यासाठी अख्खा देश तुम्ही गहाण ठेवलेला असेल.
शेती विकायची नसते हो, राखायची असते. मला मात्र विकावी लागली. मोठ्या थाटामाटात लेकीच लग्न करायचं होत. त्यामुळे मोठ कर्ज झालं डोक्यावर. तिकडे सासरकडेही तिचा खूप छळ झाला. त्याला कंटाळून लेकीन आत्महत्या केली. मुलगी आणि शेती दोन्ही हि गेली. अतोनात दु:ख झाल मात्र मी कधीच निराश झालो नाही. आत्महत्येचा विचार मनाला कधी शिवला देखील नाही. मला तर जगाची काळजी काळजी होती.
कारण मी जर फाशी घेतली असती तर जग उपाशी राहिलं असतं. नको आहे आम्हाला कुणाची मदत. आम्हाला फक्त निसर्गाने साथ द्यावी, सरकारच्या मदतीची देखील गरज नाही आम्हाला. ती मदत जर द्यायची असेल तर नोकरदार वर्गाला द्या. कारण पगारवाढ होऊन देखील ती मंडळी नाखुश दिसतात. अरे आम्ही शेतकरी तर नुसतं आभाळ काळ्या ढगांनी भरून आलं तरी खुश होतो.
माझी परिस्थिती आधी खूप चांगली होती. मात्र आज ती बिकट व्हायला ज्या समाजच मी पोट भरलं तोचं समाज कारणीभूत आहे. झोंबल ना हे वाक्य.? अहो, माझ्या डोक्यावर गारपीट, अवकाळी पाऊस, धुक यांचे ढग सदैव फिरत असतात. काही शेतीची काम यंत्राने करावी लागतात. यांत्रिक मशागत करणाराच त्याच्या महागाईच्या लोखंडी पात्याने माझा गळा कापतोय, सोबतीला शेणखत वाले आहेतच, स्वत: शेण खावून इतरांना खायला लावणारे.
औषधांची विक्री करणारे जास्त किमतीने औषधे विकतात कि साला तेच औषध मी पितोय कि काय, असा भास मला कधी कधी होतो. आज अनेक पिकसल्लागर पुढे आले आहेत, मात्र सल्ला देण्याऐवजी स्वत:चा गल्ला कसा भारता येईल इकडेच त्यांच जास्त लक्ष. मजूर आहेत च की. त्यांना काय बोलणार ? तेही माझ्यासारखं हातावर पोट भरणारी मानस आहेत. मात्र पोटावर हात ठेवून आरामात बसलेली दलाल आणि व्यापारी मंडळी पहिली कि मला त्यांचा राग येतो. एक दिवस माझा माल विकत घेता घेता मलाच विकत नाही घेतलं तर मिळवलं ! मी मात्र तसे होऊ देणार नाही. कारण मोडला असला कणा तरी स्वाभिमान-अभिमान आजही शाबूत आहे.
अरे , कडाक्याचे ऊन असो किंवा सोसाट्याचा वारा, सोबतीला पावसाच्या धारा कितीही ओलाचिंब करत बरसू देत, मी मात्र माझ्या शेतात दिवसरात्र राबणार. फक्त माझ्याच नाही तर तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पुर्ण व्हाव्यात हेच देवाला एक साकड.
– आपला बळीराजा
लेखक : प्रा. विशाल पवार
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…