आपल्याकडे प्रथा आहे. पहिल्या बाळंतपणात मुलीला आईकडे पाठवतात. चांगली प्रथा आहे. मुलींच्या फायद्याची. हक्काचा आराम मिळतो. सातव्या महिन्यात किंवा नवव्या महिन्यात माहेरी अवघडलेल्या अवस्थेत एक भक्कम आधार मिळतो. जिथे वयाची वीस, बावीस, पंचवीस वर्षे घालवलेली असतात तिथे तिला कोणतीही जबाबदारी नं घेता हवं ते खाता येतं, हवं तेव्हा पसरता येतं. लाड पुरवले जातात, काळजी घेतली जाते.
नंतरही तिची, बाळाची काळजी घेणारे तत्पर असतात. प्रेमाने करतात. ऊब असते त्यात, आश्वासकता असते. मालीश, खाणंपिणं, बाळाची झोप हे बघणारं कोणी असतं. आईची झीज भरून निघते, बाळ छान गुटगुटीत होतं. त्याच्या प्रत्येक हालचालीचं, बदलाचं डोळे भरून कौतुक करणारे असतात. साठीला लागलेले हे आजीआजोबा अगदी डोळ्यात तेल घालून जपत असतात. यात त्यांचा पैसा, वेळ, शारीरिक क्षमता यांची कसोटी लागत असते. कुठे विपरीत काही घडलं तर सासरचे बोल लावतील ही भीती असतेच.
जावयाचं पोर… त्यांचा हक्क पण कमीच असतो. त्यात बारशाचा खर्च, देणंघेणं वेगळंच. त्यातही सासरच्या मंडळींचा तोल सांभाळा. वरुन ते बाळ कसं त्यांच्या सारखं आहे हे कौतुक करता थकत नाहीत. कोणालाही जराही वाटत नाही की ही आपली जबाबदारी मुलीच्या आईने पेलली तेही वयाच्या उताराच्या टप्प्यावर. ते सून आणि तिची आई यांच्याकडे बघतच नाहीत. कितीतरी थँकलेस जाॅब बाई करते त्यापैकी हा एक. ती आपल्या मुलीसाठी करते हे वेगळं सांगायला नको. ते एक साडी देऊन याची परतफेड करतात. त्यात मुलगी झाली तर बऱ्याच सासरच्या लोकांची तोंडं फुगलेलीच असतात हे सर्वश्रुतच आहे. जेव्हा की कष्ट सारखेच लागतात त्या बिचार्या आईला जिने नऊ महिने पोटात वागवलं, वाढवलं. त्या आईला जिने जन्मानंतर जपलं, वाढवलं.
यात त्या आईचं वय, ती जर नौकरी करून बाळंतपण करत असेल मुलीचं तर तिची अवस्था, जर नसेल तरी माहेरच्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार केला जातो का? शिवाय बाळाला बघायला येणारे जाणारे असतातच. हा सगळा खर्च, शारीरिक व मानसिक ताणाची मोजदाद कुठेच नसते.
तीच आई आजारी पडली तर मात्र मुलीला तेवढ्या हक्काने, आपल्याला जबाबदारीची जाणीव ठेवून किंवा तिच्या कष्टाची परतफेड तर होऊच शकत नाही. पण ती जाणीव मनात ठेवून मुलीला करता येतं का आईसाठी? ते करताना मात्र सगळे हिशेब निघतात. आपल्या कडे चार दिवस आणलं तर काट्यासारखं सलतं, टोचतं घरच्यांच्या डोळ्यात.
ती जाऊन राहिली तर तिकडे भाऊ भावजयांना आवडत नाही,इकडे घरी गैरसोय होते घरच्यांची. तिने आणलं तर काय काय सोसावं लागतं, ऐकावं लागतं. सतत एका दडपणाखाली वावरत असते ती. म्हणजे जावई ज्या व्यवस्थेचा फायदा घेतो आपल्या मुलाच्या जन्माच्या वेळी तीच व्यवस्था त्याला त्याची कर्तव्य करताना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करते. हा सासरच्यांचंच करतो वगैरे वगैरे.
म्हणजे बाईने फक्त सेवा करावी. जर्जर अवस्था असेल तरी ती घेताना मात्र मुली, सुना तिच्यावर उपकारच करत असतात.
सगळे हेवेदावे करण्याची हीच योग्य वेळ असते बरं! ती समोर हे बघत असताना तिला यातना होत नसतील का? सगळं आयुष्य फुकट घालवलं असं त्या टप्प्यावर पडल्या पडल्या वाटतच असेल. ते संपतही का नाही, असंही!
साभार:- Whatsapp
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..