क्रांतिज्योती सावित्रीमाईंबद्दल वाचत असताना बाहूलीच्या हौदाचा उल्लेख सापडला. त्यानंतर शोधले असता हा उल्का मोकासदारांचा लघुलेख मिळाला. समाजाच्या उद्धारासाठी किती ज्ञात-अज्ञात आहूती पडल्या, माता भगीनीचा शिक्षणासाठीचा संघर्ष कामी आला आहे..
भाऊबीज महिलांसाठी या दिवसाचे खुप महत्त्व.पण १७५ वर्षापूर्वी याच दिवशी पुणे नगरीत एक खुप मोठी ऐतिहासिक गोष्ट घडली.
बाहुलीच्या हौदाचे लोकार्पण
बाहुलीचा हौद ? बाहुली कोण ? या हौदाचे एव्हढे महत्व का? सांगते
मी स्वतः इतिहासाची विद्यार्थिनी कॉलेजमध्ये असताना महात्मा फुले यांचे चरित्र अभ्यासताना कुठे तरी वारंवार डॉ. विश्राम घोले यांचा उल्लेख यायचा. ते फार मोठे शल्यविशारद माळी समाजातील बडे प्रस्थ पुणे नगरपालिकेचे सदस्य आणि नंतर स्थायी समितीचे अध्यक्ष होते. डॉ.घोले महात्मा फुले यांचे सहकारी आणि फॅमिली डॉक्टर आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते अग्रणी सुधारक होते.
महात्मा फुले यांच्यापासुन प्रेरणा घेऊन त्यांनी स्त्री शिक्षणाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली. सुरवात आपल्या घरातुन करण्यासाठी त्यांनी आपली लाडकी कन्या बाहुली. हिला शिकवण्यास सुरवात केली. बाहुली खरोखरच नावाप्रमाणे बाहुली वय अवघे ६-७ वर्ष..
अतिशय हुशार कुशाग्र आणि चुणचुणीत.बाहुलीच्या शिकण्याला डॉ. घोले यांचे पाठबळ असले तरी घरातील जेष्ठ व्यक्ती, महिलांना त्यांची ही कृती पूर्ण नापसंत होती, किंबहुना प्रखर विरोध होता.अनेकदा डॉ.घोले यांना समजविण्याचा प्रयत्न जातीतील मान्यवरांनी केला.जातीतून बहिष्कृत करण्याची धमकी दिली.
पण डॉ.घोले यांनी कुठल्याही अडचणीला भीक घातली नाही.शेवटी काही नतद्रष्ट नातेवाईक व्यक्तिंनी काचा कुटुन घातलेला लाडु बाहुलीस खावयास दिला. अश्राप पोर ती काचांचा लाडु खाल्ल्या मुळे अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मृत्यूमुखी पडली.
स्त्री शिक्षणाचा हा पहिला ज्ञात बळी आपल्या लाडक्या लेकीच्या स्मरणार्थ डॉ. घोल्यानी बाहुलीचा हौद बांधला आणि तो सर्व जातीधर्मातील लोकांसाठी खुला ठेवला.त्याचा लोकार्पण सोहळा मातंग समाजातील थोर सुधारक दादा भुतकर यांच्या हस्ते भाऊबीजेच्या दिवशी ठेवल्याची नोंद आहे. पण इतिहासात बाहुलीच्या जन्म मृत्युच्या तारखेची नोंद मात्र आढळत नाही.
काळ बदललाय कालपटावरील आठवणी धुसर झाल्यात. डॉ. विश्राम घोले यांच्या नावाचा घोले रोड आता सतत वाहनांच्या वर्दळीने धावतपळत असतो. पुर्वी शांत निवांत असलेली बुधवार पेठ आज व्यापारी पेठ म्हणून गजबुन गेलीये.
फरासखाना पोलीस चौकी सुध्दा आता कोपऱ्यात अंग मिटुन बसलीये..आणि त्या फरासखाना पोलीस चौकीच्या एका कोपऱ्यात बाहुलीचा हौद इतिहासाचा मुक साक्षीदार स्थितप्रज्ञाची वस्त्रे लेवून उभा आहे. बाहुलीचा फोटो मला खुप शोध घेतल्यावर इतिहास संशोधक मंडळातील एका जीर्ण पुस्तकात साधारणपणे ६ वर्षापूर्वी सापडला
आज बाहुलीची आठवण कारण आजचा तो दिवस तिच्या स्मरणार्थ बांधलेल्या हौदाचा आज लोकार्पण सोहळा स्त्री शिक्षणासाठी आत्माहुती देणाऱ्या बाहुलीच्या निरागस सुंदर स्मृतिदिनी मनोभावे वंदन.
साभार-उल्का मोकासदार
लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका….