बॉलीवूड मधील अनेक कलाकारांना सध्या कॅन्सरने ग्रासले आहे. यामध्ये आता जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे नाव जोडले गेले आहे. अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार चालू आहेत. पण त्यांना नेमका कुठला आजार झाला याचा खुलासा कपूर कुटुंबीयांकडून करण्यात आला नव्हता.
आता मात्र त्यांची पत्नी नीतू सिंग यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन ऋषी कपूर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढा देत असल्याचे समोर आले आहे. नीतू यांनी स्पष्टपणे ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याचे सांगितलेले नाही, मात्र त्यांनी कॅप्शनमध्ये जे लिहिले आहे त्यावरून ऋषी कपूर याना कॅन्सरसारखा गंभीर आजार झाल्याचे स्पष्ट होते.
ऋषी कपूर मागील तीन महिन्यांपासून अमेरिकेत आहेत. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते 29 सप्टेंबरला तिथे रवाना झाला होते. त्यांनी सोशल मीडियावर याची माहिती देताना लिहिले होते, “सगळ्यांना नमस्कार, उपचारांसाठी अमेरिकेला जातोय. मी माझ्या चाहत्यांना विनंती करतो, की उगाच कुठलाही अंदाज बांधू नका. मी गेल्या 45 वर्षांहून अधिकचा काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहे. तुमच्या प्रार्थना आणि प्रेमाच्या बळावर लवकरच परतेल.”
ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यानंतर दोन दिवसांनीच म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्या 87 वर्षीय मातोश्री कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले होते. पण ऋषी कपूर अंत्यसंस्कारात सहभागी होऊ शकले नव्हते. त्यांची पत्नी आणि मुलगाही अमेरिकेत त्यांच्यासोबत असल्याने ते भारतात आले नव्हते. तेव्हा देखील ऋषी कपूर यांना कॅन्सर झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्यांचे थोरले भाऊ रणधीर कपूर यांनी या बातम्यांचे खंडन केले होते.
पण आज नीतू यांनी पती ऋषी, मुलगा रणबीर आणि त्याची गर्लफ्रेंड आलिया भट, मुलगी रिद्धिमा, जावई भरत साहनी आणि नात समारासोबत न्यूयॉर्क येथे न्यू इयर सेलिब्रेट केल्याचे फोटो पोस्ट केले आहेत.
फॅमिलीचा सेलिब्रेशन करतानाचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करुन सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “2019 च्या शुभेच्छा. कुठलाही संकल्प नाही, यावर्षी फक्त एकच इच्छा आहे, ती म्हणजे पोल्युशन आणि ट्रॅफिक कमी व्हावी. आशा करते की, भविष्यात कॅन्सर फक्त एक राशी (कर्क) राहील. तिरस्कार करायला नको, गरीबी कमी होईल, प्रेम आणि आनंदासोबतच सगळे स्वस्थ राहो.”
नीतू यांच्या या ट्वीटनंतर ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असल्याचे बोलले जातेय. बॉलीवूड आणि त्यांच्या चाहत्यांना मात्र या ट्विटनंतर मोठा धक्का बसला आहे. नीता यांनी पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ऋषी कपूर यांची तब्येत खूपच खालावलेली दिसत आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…