आपल्याकडील चांगल्या गोष्टींची ओळख आपल्याला कधी कधी परकीयांच्या दृष्टीतुनच होते असे अनेकदा अनुभवायला मिळते. मुंबईच्या डबेवाल्यांबाबत नेमकं हेच आहे. सातासमुद्रापार जाऊन कॉर्पोरेट जगताला मॅनेजमेंटचे धडे देणाऱ्या याच मुंबईच्या डबेवाल्यांबाबत आपण मात्र दृष्टिहीन झाल्यासारखे दुर्लक्ष केले. रेल्वे आणि बेस्ट सेवा यानंतरची मुंबईची तिसरी लाईफलाईन म्हणलं तर वावगं ठरणार नाही इतकी महत्वाची ही व्यवस्था आहे. मुंबई महानगरीची ती एक ओळख आहे. त्यांची दखल घेतली जावी त्यासाठी हा लेखनप्रपंच.
नोव्हेंबर २००३ मध्ये इंग्लडचा राजकुमार प्रिन्स चार्ल्स मुंबई भेटीवर आला होता. त्याने मुंबईच्या डबेवाल्यांबद्दल बरेच ऐकले होते. मुंबईच्या डबेवाल्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भेट झाली. त्यावेळी प्रिन्स चार्ल्सने डबेवाल्यांसोबत झालेल्या चर्चेत त्यांना काही तिरकस प्रश्न विचारले. एकतर तुम्ही अशिक्षित किंवा अल्पशिक्षित आहात, तरीही व्यवस्थापनाचे हे कौशल्य तुम्ही कुठे शिकलात ? डब्यांचे Coding, Time Management, Accuracy अशा गोष्टी तुम्ही कुठुन आत्मसात केल्या ? काळानुसार जसे ग्राहक बदलत जातात तसेच तुमच्यातही नवेनवे डबेवाले लोक येत राहतात, तरी सुद्धा गेली सव्वाशे वर्ष वितरण व्यवस्थेतील ही अचुकता तुम्ही कशी जोपासली आहे ? यामागची प्रेरणा नेमकी काय आहे ?
डबेवाल्यांनी प्रिन्स चार्ल्सला उत्तर दिले, “आम्ही सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावुन जे मावळे लढले, त्याच मावळ्यांचे आम्ही वंशज आहोत. छत्रपती शिवरायांच्या काळातील व्यवस्थापनाची शिस्त आमच्या रक्तातच आली आहे. त्यासाठी वेगळं काही प्रशिक्षण घेण्याची गरज नाही. त्याकाळी रयतेच्या संरक्षणासाठी आमचे पुर्वज लढले, आज त्याच रयतेच्या पोटात वेळेवर अन्नाचे दोन घास जावेत म्हणुन आम्ही झटत आहोत. आमचे पुर्वज गडकिल्ले, तटाबुरुजांवरती चढायचे, आम्ही मुंबईतल्या इमारतींचे मजले चढतो. घोडे गेले, सायकली-गाड्या आल्या. याच्या माध्यमातुनच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा होत आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरक शक्ती कायम आमच्या पाठीशी उभी असल्यानेच आम्ही हे करु शकतोय.”
डबेवाल्यांचे उत्तर ऐकुन प्रिन्स चार्ल्सने त्यांना सॅल्युट केला आणि त्यांच्याबद्दल “So you are Shivaji’s Maratha. You Can never be wrong. I salute you all.” अशा शब्दात गौरवोद्गार काढले. एवढेच नाही तर प्रिन्सने त्यांना स्वतःच्या लग्नासाठी विशेष पाहुणे म्हणुन इंग्लंडला निमंत्रित केले. तेथे त्यांचा जाहीर सत्कार केला. अशा डबेवाल्यांबाबत आपल्याला थोडीफार तरी माहिती असणे आवश्यक आहे.
डबेवाल्यांचा इतिहास :
भारतात ब्रिटिश सत्तेचा अंमल असतानाच्या काळात १८९० मध्ये ब्रिटिश तसेच पारशी कर्मचाऱ्यांना जेवण पोहोचवुन त्यातुन आर्थिक प्रपंच उभा करावा आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा या उद्देशाने महादु हावजी बच्चे यांनी ही सेवा सुरु केली. सुरुवातीला त्यांच्यासोबत ३५ डबेवाले काम करत होते. नंतर त्यांची संख्या वाढत जाऊन आज ५००० झाली आहे. पायजमा, शर्ट, गांधी टोपी आणि डब्यांसाठी चुंबळ असा त्यांचा पोशाख असतो.
बहुतेकजण डबेवाले हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. ते शरीराने दणकट असल्याने डोक्यावरील जाळीतुन डब्याचा भार घेऊन फिरणे, रेल्वेत चढणे-उतरणे अशी धावपळ त्यांना जमत असते. नवीन डबेवाला भरती करत असताना त्याला प्रशिक्षण दिले जाते. त्यांना त्यांच्या आचारसंहितेचे कठोर पालन करावे लागते. दादरच्या रानडे रोड येथे ‘मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळ’(डबेवाले) यांचे कार्यालय आहे. डबेवाल्यांचे नेते रघुनाथ मेडगे यांनी “डबेवाला धर्मशाळा” काढली.
डबेवाल्यांची काम करण्याची पद्धत :
डबेवाले सर्वप्रथम एका भागातील डबे गोळा करतात. ते डबे ज्या ज्या भागात वितरित करायचे आहेत त्यानुसार त्यांची विभागणी केली जाते. एकाच भागात वितरित करायचे डबे एकत्रित करुन जलद लोकल रेल्वेने नियोजित जागी पाठवले जातात. डब्यांवर कलर कोडिंग स्वरुपात त्यांचा पत्ता नमुद असतो. ही एक विशिष्ट सांकेतिक ओळख असते, जी फक्त डबेवाल्यांनाच समजते. रेल्वेतुन डबे उतरुन घेतल्यानंतर स्थानिक डबेवाले त्या कोडिंग वरुन ते डबे वितरित करतात. त्यांनतर स्वतःचे भोजन उरकुन रिकामे डबे गोळा करण्याच्या कामाला लागतात आणि शेवटी ते परत घरपोच करतात.
कलर कोड मुळे डब्यांची अदलाबदल होत नाही. डबे पोहोच करण्याचा कुठेही पत्ता लिहलेला नसतो. तो डोक्यात ठेवुन डबे पोहोच केले जातात. डबेवाला हा एखाद्या अभियंत्याप्रमाणे त्याचे कार्य करतो आणि डोकं संगणकाप्रमाणे माहिती साठवण्याचे काम करते. कलर कोडिंग पद्धतीने आपल्या कामात त्यांनी यांत्रिकपणा आणला आहे. त्यामुळेच ५००० डबेवाले दररोज २ लाख डबे वितरित करतात. हे ऐकण्यास जरी सोपे वाटत असले तरी करण्यास खुप अवघड गोष्ट आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता अगदी वेळेवर घरचं ताजे जेवण कोणतीही चुक न होता ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा एकच ध्यास बाळगुन प्रामाणिकपणे ते आपले काम करत असतात.
एवढी सगळी धावपळ करुन प्रतिदिन २५० ते ३००₹ वेतन घेऊन महिना साधारण ७-८ हजार वेतन मिळवतात.
डबेवाल्यांचे हे अनोखे नेटवर्क पाहुन अमेरिकेच्या हार्वर्ड बिझनेस स्कुललाही त्यांचे कौशल्य जाणुन घेण्यासाठी इथं यावे लागले. डबेवाल्यांच्या कामाची त्यांनी माहिती घेतली. त्याच्यावर अहवाल तयार केला. आता त्या अहवालाच्या विक्रीतुन व्यवस्थापनाची कौशल्ये जगभर पोहोचवण्याचा त्यांचा निर्धार आहे. परंतु जिथे पिकते तिथे विकत नाही या म्हणीप्रमाणे आपल्याला डबेवाल्यांच्या असा अहवाल करण्याची दृष्टी कधी आली नाही. दुर्दैव !
डबेवाल्यांच्या या वितरण प्रणालीचा Error Rate म्हणजेच डबा पोहोचवण्याच्या कामात चुक होण्याचे प्रमाण ६० लाख डब्यांमागे फक्त १ इतका नगण्य आहे. या अचुकतेमुळेच फॉर्ब्स मॅगझिनने डबेवाल्यांच्या या प्रणालीस “Six Sigma Accuracy” या अत्यंत महत्वपुर्ण मानल्या जाणाऱ्या वर्गात मोटोरोला, जनरल मोटर्स अशा उद्योगांच्या समवेत स्थान दिले आहे.
स्टॅनफोर्ड व जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांच्याकडुन तर शुन्य टक्के इंधन, शुन्य टक्के आधुनिक तंत्रज्ञान, शुन्य टक्के वादविवाद, अत्यल्प गुंतवणुक याद्वारे शंभर टक्के परिणाम आणि ग्राहकांना शंभर टक्के समाधान पुरवणारी ही संस्था आहे अशी त्यांना वाहवा मिळाली आहे.
डबेवाल्यांच्या प्रवासातील काही ठळक गोष्टी :
● छत्रपती शिवाजी महाराज हे डबेवाल्यांचे प्रेरणास्थान आहेत, तर पंढरीच्या विठोबारायावर, वारकरी संतपरंपरेवर त्यांची नितांत श्रद्धा आहे. ● डबेवाल्यांच्या जीवनावर आधारित “मुंबईचा डबेवाला” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ● डॉ.पवन अग्रवाल यांनी मुंबईच्या डबेवाल्यांवर Ph.D. करुन त्यांच्या जीवनावर आधारित “Teena & Tiffin” या कॉमिक्सची निर्मिती केली. ● डबेवाल्यांचे नेते रघुनाथ मेडगे, गंगाराम तळेकर, सुभाष तळेकर व इतरांनी ६० हुन अधिक देशात डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे धडे दिले आहेत. ● जमाल हिराणी या भारतीयाने लंडन येथे सुरु केलेल्या “Tiffin Beats” उपहारगृहाच्या प्रमोशनसाठी डबेवाल्यांचे नेते गंगाराम तळेकर यांना निमंत्रित केले होते.
● Rohinton Mistry या इंग्रजी लेखकाने त्याच्या “Such a long journey” नावाच्या पुस्तकात डबेवाल्यांना “घामटलेली डुकरे” असे संबोधले होते. त्याला उत्तर देण्यासाठी गंगाराम तळेकरांनी इंग्रजीतच “The wonder of Dabewala unfolded” हे अप्रतिम पुस्तक लिहुन त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि डबेवाले किती ग्रेट आहेत ते दाखवुन दिले. ● वेगवेगळ्या कार्यक्रमांतुन शिल्लक राहिलेले अन्न वाया जाऊ नये आणि गरिबांना त्याचा लाभ घेता यावा या उद्देशाने डबेवाल्यांनी मोफत “रोटी बँक” सुरु केली आहे.
डबेवाल्यांच्या कार्याबद्दल सांगण्यासारखे बरेच आहे. अभ्यासाच्या आणि शब्दांच्या मर्यादांमुळे जितके शक्य तितके लिहण्याचा प्रयत्न केला आहे. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईला घड्याळाच्या वेळेइतकेच तंतोतंत वेळेवर जेवण पोहोचवणाऱ्या डबेवाल्यांचे व्यवस्थापन कौशल्य, अचुकता, वेळेचे गणित आजही कित्येकांच्या कौतुकाचा विषय आहे. तरी सुद्धा आपल्याला आपल्या मुलाबाळांना मिलियन डॉलर सक्सेस स्टोऱ्या सांगत बसतो, मात्र आठवी पास डबेवाल्यांच्या कथा सांगणे आपल्याला कधी महत्वाचे वाटत नाही. हे चित्र बदलेल अशी अपेक्षा आहे. शालेय अभ्यासक्रमात डबेवाल्यांचे व्यवस्थापन कौशल्य समाविष्ट व्हावे.
– अनिल माने.