प्रति,
चित्रकार Sachin Juvatkar
विषय : महाराजांच्या कर्तृत्वाचे दैवतीकरण थांबवा…
तीन वर्षांपुर्वी चित्रकर आपण कुठल्यातरी एका शिवमंदिरात गेल्यावर आपणास छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाचा साक्षात्कार झाला. ते रुप डोळ्यात साठवुन प्रत्यक्षात चित्ररुपाने उतरवण्याचा आपण ध्यास घेतला. सहा महिन्यांपासुन ब्रह्ममुहुर्तावर पहाटे साडेतीन वाजता उठुन आपण चित्र साकारायला सुरुवात केली. अशी बातमी वाचली.
साडेपाच तोळे सोन्याचा वर्ख, चांदी, तांबे, तुळस, अष्टगंध आणि ११ हजार मंत्रांच्या जपातुन छत्रपती शिवाजी महाराजांची चतुर्भुज म्हणजे चार हात असलेले चित्र साकार केले असे आपले म्हणणे आहे. मंत्रजपामुळे चित्राच्या माध्यमातुन सकारात्मक ऊर्जा पाहणाऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत असा आपला दावा आहे.
ज्यांच्या महाराष्ट्रभुषण पुरस्काराला महाराष्ट्रातुन शिवप्रेमींनी तीव्र विरोध केला त्या ब.मो.पुरंदरे यांनी आपल्या या चित्रप्रदर्शनाचे उद्धाटन केले. आपण शिवरायांना ज्या रुपात पाहण्याची कल्पना करतो त्या दैवी रुपाचा साक्षात्कार या चित्रातुन झाल्याचे कौतुक उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. अनावधानाने जयंत पाटील सारखे नेतेही आपल्या या चित्राचे कौतुक करताना आढळले. असो !
कलाकार म्हणुन आपल्या कलेचा आदरच आहे. पण आपल्या कलेतुन समाजापर्यंत कोणता संदेश घेऊन जातोय याचे भानही कलाकाराला जपावे लागते. छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राज्यकर्ते होते. त्यांच्यासारखा राज्यकारभार करण्याची प्रेरणा आजच्या राज्यकर्त्यांनी घ्यावी असे कार्य महाराजांनी केले. जेव्हा महाराजांच्या या मानवी कार्याला देवत्व चिकटवले जाते तेव्हा महाराजांच्या आदर्शवत प्रतिमेला आपोआप चमत्काराचे कुंपण लागते. महाराजांचे कुठलेही चित्र बघितले तरी त्यातुन सकारात्मक उर्जाच मिळते, त्यासाठी मंत्रजप वगैरे या भ्रामक कल्पना आहेत.
मार्च २००४ मध्ये पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळात निनाद बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत प्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना चार हात असलेल्या विष्णुच्या अवतारात दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मराठा सेवा संघाने त्याला विरोध करुन पोलीस कारवाईपर्यंत प्रकरण नेले होते.
आज छत्रपती शिवाजी महाराजांचे असे दैवतीकरण करुन महाराजांना संकुचित करत आहोत याचे भान आपण बाळगले नाही. आज ढालतलवारीच्या पलीकडले शिवराय समाजाला समजुन घ्यायचे आहेत. मात्र आपण महाराजांना चमत्काराच्या कोंदणात बंदिस्त करु पाहत आहात. महाराजांचे दैवतीकरण करण्याला आमचा कायम विरोध राहील. आपण कृपया विचार करावा.
जय शिवराय !
अनिल माने, बारामती.
9096207033.