काळ बदललाय खंडेराव…
महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचा राजरोस इथे अवमान होतोय आणि अवमान करणाऱ्याच्या पाठीशीच त्याच्या धर्म, जात, विचार, पक्ष, संघटनाचे समर्थक उभे राहतायत हे आपल्याकडचे वास्तव चित्र आहे. ते मान्य केल्याशिवाय आता आपल्याला इथुन पुढे जाता येणार नाही.आता इथल्या लोकांकडुन निरर्थक अपेक्षा करणं किंवा त्यांना दोष देणं बंद केलं पाहिजे. अस्मितांनी छात्या फुगतात, पोटं भरत नाहीत असं सांगितले जातं तेच खरंय ! आणि तसंही आताच्या लोकांना अस्मिता राहिल्यात तरी कुठे ?
ज्या लोकांना पोटाचे प्रश्न आहेत त्यांच्यापुढे कितीही पोटतिडकीने शिवरायांचा विचार सांगितला तरी एका प्रतिकाशिवाय महाराजांकडे बघण्याचा अशा लोकांचा दृष्टिकोन वेगळा काही नाही. तेवढ्यापुरते “जय” म्हणुन मोकळे होणाऱ्या लोकांकडुन आपण काय अपेक्षा करावी ? महाराजांचे डोळ्यांना दिसणारे पुतळे, तसबीरी आणि कानावर पडणारी वर्णनं एकदा दृष्टीआड, कानाआड गेली की यांचा आणि महाराजांचा संबंधच संपतो हो ! भवितव्याच्या प्रश्नांनी ग्रासलेल्या या लोकांना इतिहासाची आठवण आणि साठवण करायला वेळच कुठे आहे वर्तमानात ?
आपल्याकडे “राजे परत या…” म्हणुन हाका दिल्या जातात. जर खरोखरच छत्रपती शिवराय परत आले तर त्यांनासुद्धा समाजातल्या वास्तवाचा सामना करावाच लागेल. लोकांच्या कृतघ्नपणाचे अनुभव घ्यावेच लागतील. जातीपातीच्या पलीकडे जाऊनसुद्धा इथे आल्यावर जातीपातीचेच लेबल लावण्याच्या ठायी तत्पर असणाऱ्या लोकांशी त्यांना भिडावेच लागेल. आणि हे केवळ महाराजांच्याच बाबतीत होईल असे नाही. लोकांना जसा शिवशाहीचा विचार आणि वारसा सांभाळता आला नाही तीच अवस्था भविष्यातील लोकशाहीची असणार आहे.
लोकशाही मुल्यांवर हल्ले झाले तरी हल्ला करणाऱ्यांच्याच समर्थानात इथले लोक दिसणार आहेत, यामागचीही कारणं तीच !तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि कार्य जिवंत राहिले पाहिजे, ते वाढले पाहिजे असं वाटणारा मोठा वर्ग आहे. त्यांचं कौतुक केले पाहिजे. इतिहासाकडुन प्रेरणा घेता येतात आणि त्या घेतल्या तर आपल्या आयुष्यात त्याचा उपयोग होईल असे वाटणारा हा वर्ग आहे.
बाकी सगळीकडे राजकारणासाठी आणि समाजकारणासाठी केलेली बेगमी आहे. शिवरायांच्या उंचीचा वापर समाजातील आपली उंची वाढविण्यासाठी केलेला अट्टाहास आहे. जितक्या लवकर आपण हे समजुन घेऊ तितकं शहाणपण आहे.
काळ बदललाय खंडेराव…