29 नोव्हेंबरला विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर ते तातडीने राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आलं. राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी केल्याने 1 डिसेंबरपासून राज्यात मराठा आरक्षण कायदा लागू झाला आहे. यानुसार मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण मिळणार आहे.
याआधी आघाडी सरकारनेही मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. पण या आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल झाल्याने त्याला स्थगिती मिळाली होती. आता फडणवीस सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाविरोधातही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे हे आरक्षणही कायद्याच्या कचाट्यात अडकणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पण हे आरक्षण असंवैधानिक असल्याचे सांगत मराठा आरक्षणाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. राज्य सरकारने 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण जाहीर करणं हे राज्यघटनेविरोधात आहे, अशी भूमिका घेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं ही याचिका सादर करण्यात आली आहे.
सुरुवातीला हि याचीका न्यायालयाने फेटाळली होती. पण आज या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार होती. या सुनावणीसाठी सदावर्ते हे कोर्टात आले होते. सदावर्ते हे जेव्हा प्रसारमाध्यमांना माहिती देण्यासाठी आले तेव्हा एका मराठा युवकाने त्यांना मारहाण केली आहे.
मुंबई हायकोर्टाबाहेर या तरुणाने अचानक येऊन एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले. हा युवक जालन्याचा असून त्याचे नाव वैद्यनाथ पाटील असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी मात्र असे पाऊल उचलू नये असे आवाहन मराठा समाजातील तरुणांना केले आहे. मराठा क्रांती मोर्चाने या हिंसेचे समर्थन करत नसल्याचे सांगितले आहे.