देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. ईशा अंबानींचं लग्न आनंद पिरामल यांच्याशी होणार आहे. आनंद हा पिरामल ग्रुपचे प्रमुख अजय पिरामल यांचा मुलगा आहे.
ईशा आणि आनंद हे १२ डिसेंबर रोजी मुंबईत विवाहबद्ध होणार आहेत. भारतातील सर्वात महागडे समजले जाणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया या घरी त्यांचा विवाह होणार आहे.
पिरामल हे देखील एक नावाजलेले उद्योगपती आहेत. त्यांनी आपल्या मुलासाठी आणि होणाऱ्या सुनबाईसाठी गिफ्ट देणाऱ्या बंगल्याची सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. सीफेसला नवीन ५ मजल्याचा, ५० हजार चौरस फुटांचा हा बंगला अजय पिरामल आणि स्वाती पिरामल यांच्याकडून इशा आणि आनंदला गिफ्ट देण्यात येणार आहे.
या चर्चांमध्ये अजून एक भर पडली आहे. या गोष्टीचे तुम्हीही कौतुकच कराल. कारण इशा-आनंदच्या विवाहापूर्वी अंबानी-पिरामल कुटुंबाकडून मोठी अन्नसेवा केली जात आहे.
अंबानी कुटुंबाकडून राजस्थानातील उदयपूरमध्ये अन्नदान करण्यात आलं. उदयपूरमध्ये ७ ते १० डिसेंबरदरम्यान ही अन्नसेवा सुरु राहणार आहे. यावेळी शहरातील ५१०० जणांना जेवण दिलं जात आहे. उदयपूर शहराप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि नागरिकांचे आशीर्वाद घेण्यासाठी अंबानी परिवाराकडून या अन्नसेवेचं आयोजन करण्यात आलं आहे.
लग्नाआधी अंबानी आणि पिरामल कुटुंबीय सेलिब्रेशनसाठी उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत. संगीत, मेहंदी आणि इतर विधी ८ आणि ९ डिसेंबरला पार पडणार आहेत व नंतर १२ डिसेंबर ला मुंबईत ते विवाहबद्ध होतील.
उदयपूरमध्ये अन्नसेवेसाठी मुकेश अंबानी, नीता अंबानी, अजय पिरामल, स्वाती पिरामल यांच्यासह इशा अंबानी आणि आनंद पिरामलही उपस्थित होते.