क्रांतिसिंह नाना पाटील खासदार होते तेव्हाची गोष्ट आहे.ते एकदा मुंबईला निघाले होते. त्यांच्यासोबत भाळवणीचे हंबीरराव धनवडे नावाचे कार्यकर्ते होते. हे दोघे कराड रेल्वे स्थानकावर गेले.तर त्यांना समजलं गाडी निघून गेलेली आहे. दुसरी गाडी रात्री खूप उशिरा होती. ते पोहोचले तेव्हाच रात्रीचे दहा वाजले होते. आता गाडी तर गेलेली.वाट पहाण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून ते दोघे तिथेच बसले. ते थंडीचे दिवस.कडाक्याची थंडी होती.यांच्याजवळ पांघरायलाही काही नव्हते. तशाच थंडीत ते गाडीची वाट पाहत बसले. त्या स्टेशनवर ते दोघे आणि एखाददुसरा कर्मचारी होता. बाकी सगळी शांतता होती.दरम्यान दिवसभरच्या कामाने थकून गेलेल्या हंबीररावाना झोप यायला लागली म्हणून ते बाकड्यावर कलंडले तशीच त्यांना झोप लागली. काही वेळातच ते घोरायला लागले.
साधारण दोन तासांनी स्टेशनवर वाजणाऱ्या घंटेच्या आवाजाने त्यांना जाग आली. ते एकदम उठले तर तेव्हा त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या अंगावर लुंगी पांघरलेली आहे. आणि क्रांतीसिंह नाना पाटील मात्र थंडीत कुडकुडत बसले आहेत. त्यांनी त्यांच्या अंगावरील लुंगी झोपलेल्या हंबीररावांच्या अंगावर टाकली होती आणि स्वतः थंडीत बसलेले.तो प्रसंग पाहून हंबीरराव गहिवरून म्हणाले, “अण्णा, अस का ओ केलंसा? माझ्या अंगावर लुंगी टाकून तुम्ही थंडीत कुडकुडत बसलाय?”
“हंबीरा, तु इळभर रानात राबून कटांळला हुतास. पडल्या पडल्या तू घोराय लागलास. पण ही थंड अशी. कुडकूड कराय लागलास. थंडीन झोपतच तू गळ्यापातूर गुडघ आखडून घेतलंस. मला ते बघवल न्हाय. मग टाकली लुंगी तुझ्या अंगावर”‘ते ऐकून हंबीरराव यांना हुंदका फुटला. ते रडायलाच लागले.
त्यांची समजूत घालत क्रांतिसिंह म्हणाले,
“हंबीरा रडू नको,आर मला सवय झालीय. इंग्रज सरकारच्या विरोधात लढताना लय वाईट दिवस काढल्याती. मला थंड,वार, पाऊस सगळ्याची सवय झालीय. तू दिवसभर रानात राबून आला होतास, तुला विश्रांती मिळावी असं वाटलं मला”
मग नाना बोलत होते आणि हंबीरराव हुंदके देत ऐकत होते.
दिवस निघून गेले. काही काळानंतर क्रांतिसिंह नाना पाटील जग सोडून गेले, हंबीरराव यांना खूप दुःख झालं.त्यानां या शोकातून बाहेर यायला बरेच दिवस लागले. नंतर ते सावरले. नानांची स्मृती जतन करण्यासाठी त्यानी त्यांच्या घराला नावं दिल’कॉम्रेड निवास’आणि बैठकीच्या खोलीत भिंतीवर क्रांतिसिंह यांच एक मोठं तैलचित्र करून घेतलं.हंबीरराव कॉम्रेड होते ,ते नास्तिक होते पण रोज सकाळी संध्याकाळी जेवताना त्या तैलचित्राचाजवळ जात, दोन हात जोडत आणि पून्हा जेवण करत. लोक त्याना म्हणत, ‘तुम्ही आयुष्यभर देवाला कधी नमस्कार केला नाही आणि या फोटोला मात्र रोज हात जोडता हे कसं काय?’
ते सांगत’बाबांनो,तुम्ही ज्या देवाला जाता त्यो देव तुम्ही पाहिला नाही. पण हा देव मी पाहिला आहे,त्याच देवपण मी जवलून बघितलं आहे.म्हणून या देवाच्या मी पाया पडतो’ते असे म्हणायचे आणि बोलता बोलता गहिवरून जायचे. हंबीरराव थकले त्यांनी एक दिवस त्यांच्या मुलांकडून वचन घेतलं,’माझ्या माघारी अण्णांना विसरू नका. मी जस त्यांना नमस्कार केल्याशिवाय जेवत नव्हतो तसच वागा’ दिवस निघून गेले .एक दिवस वयोमान झाल्यावर हंबीरराव काळाच्या पडद्याआड गेले.
आता ‘कॉम्रेड निवास’ तसेच आहे.बैठकीच्या खोलीत असणारा क्रांतिसिंह नाना पाटील यांचा फोटो दुरून दिसतो. सकाळी जेवणाची वेळ झाली की त्या घरातील कर्ता माणूस त्या फोटोसमोर येतो. फोटोचे दर्शन घेतो आणि मगच जेवतो. हंबीरराव धनवडे यांनी मुलाला दिलेलं वचन आजही त्या घरात पाळलं जातंय. उद्याही त्यांची नातवंड ही जित्या देवाची आठवण जागवतील. आजोबांनी प्रत्यक्ष अनुभवलेल्या क्रांतिसिह नाना पाटील या माणसातल्या देवाचं विस्मरण त्यांना कधीही होणार नाही.
साभार-संपत मोरे
९४२२७४२९२५
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…