आज मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभेत पारित झाले. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी काही दिवसापूर्वीच १ तारखेला जल्लोष करण्यास सांगितले होते. आज विधेयक पारित झाल्यानंतर माझ्या सारख्या एका मराठा तरुणाच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपणास नमस्कार,
मुख्यमंत्री साहेब आपण मराठा आरक्षण देण्यासाठी जे काही पाऊल उचलले त्याबद्दल मी प्रथम आपले अभिनंदन करतो. तसे पाहता आपले अभिनंदन मानायचे काही कारण नाही. आमच्या अनेक मुलांनी बलिदान दिले आहे. खरेतर त्या सर्वांचे आभार आहेत. माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. साहेब आपण मराठा समाजाला जे काही आरक्षण दिले आहे ते कोर्टात टिकणारे आरक्षण दिले आहे का ? हा मराठा तरुणांच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न उपस्थित राहतो. कारण साहेब मराठा समाजातील तरुणांच्या मनात आरक्षणाबद्दल प्रचंड खदखद आहे.
मराठा समाजाने आता पर्यंत महाराष्ट्रासहित देश विदेशात ५८ हून अधिक मराठा क्रांती मोर्चे काढले. हे मूक निघालेले मोर्चे मराठा समाजातील तरुणाच्या मनातील खदखद बाहेर काढणारे होते. साहेब आपण या सर्व मोर्चाची दखल घेतली नसल्याने आमच्या तरुण बांधवानी जेव्हा महाराष्ट्र बंद केला तेव्हा आपण ज्या १५ हजाराहून अधिक तरुणांवर केसेस दाखल केल्यात. साहेब तरुणांनी असे काही मोठे गुन्हे केले नाहीत पण आपण त्यांच्यावर सामाजिक आंदोलन केल्यामुळे ज्या केसेस दाखल केल्यात त्यामुळे त्या हजारो तरुण आणि त्यांच्या कुटुंबियांना जो मानसिक त्रास होतो आहे. याबद्दल आपण काही एक उपाययोजना केली नाही. त्या मराठा आंदोलक तरुणाच्या वरील गुन्हे कधी काढणार आहात ?
आपण एक मेगा भरती जाहीर केली होती व नंतर मराठा ठोक मोर्चा मुळे ती रद्द केल्याचे जाहीर केले. ती मेगा भरती आपण लवकरात लवकर कधी पर्यंत पुन्हा घेणार आहात. कारण आज हजारो तरुण बेरोजगार आहेत सरकारी नोकऱ्यांसाठी वर्षानुवर्षे तयारी करत आहेत. त्या मुलांच्या मनात आपल्या विषयी रोष वाढण्याच्या अगोदर आपण भरती घेऊन त्यांना दिलासा द्यावा.
फडणवीस साहेब आपण जल्लोष करायला सांगत आहात पण आम्ही कोणत्या तोंडाने जल्लोष करणार आमच्या ४२ बांधवानी मराठा आरक्षणासाठी स्वतःचे बलिदान दिले आहेत. ते आमचे बांधव आहेत आमच्या घरातील हे तरुण गेल्यांवर आम्ही कसे काय जल्लोष करू. कोणत्या तोंडाने आम्ही जल्लोष करायचा आहे?
मागासवर्गीय आयोगाने ज्या शिफारशी आपल्याला केल्या आहेत त्या शिफारशी मध्ये मराठ्यांची अवस्था हि दयनीय आहे हे आपण स्वीकारले आहे मग मराठा समाजाच्या प्रगतीसाठी काही उपाय योजना करणार आहात कि नाही ?? अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ आपण स्थापित केले पण त्या महामंडळाला कोणतेही आर्थिक पॅकेज दिले नाही. व्याज परतावा योजना जी आपण मोठा गाजावाजा करून सुरु केली होती. ती आता फक्त नावाला सुरु आहे. मराठा तरुणांना त्या योजनेचाk कोणताही फायदा होताना दिसत नाही. मराठा मुलांना कर्ज मिळत नाहीत त्याबद्दल काही उपाय योजना करणार आहेत कि नाही ?
साहेब आपण मराठा तरुणांसाठी हॉस्टेल ची मोठी भीम घोषणा केली होती पण आज प्रत्यक्षात २ वर्ष होऊन गेले कोणालाच त्याचा लाभ मिळाला नाही कि तुमच्या घोषणेतील हॉस्टेल पण दिसायला तयार नाहीत. मराठा आरक्षण असेच असू नये हि आमची इच्छा आहे. साहेब अजून महत्वाचा प्रश्न आपण MPSC मध्ये आरक्षण देत आहात पण UPSC मध्ये आरक्षण देत नाहीत हा एक मोठा अन्याय आहे. तो कसा दूर करणार आहात ?
मराठा आरक्षणासाठी सर्वात पहिले बलिदान अण्णासाहेब पाटील यांनी केले होते तेथपासून हा मराठा आरक्षणाचा लढा सुरु आहे आमच्या हजारो बांधवांवर गुन्हे हि दाखल झालीत, ४२ बांधवानी आत्मबलिदान दिले त्यांच्या कुटुंबांला अजूनही सरकारी मदत मिळाली नाही. त्या पाश्ववभूमीवर आम्ही कसे काय जल्लोष करणार ??
कुणाल विलास वेडे पाटील- ९८५०४०३९९९