काल एक व्यक्ति भेटला साधारण चाळीशीतला असेल एका मोठ्या राजकीय पक्षाचा गावातील कार्यकर्ता, त्याची ही करुणामय कथा, माझं नाव डिगांबर गावात मला लोक पुढारी म्हणायचे आणी त्या बोलण्याने मला राज्याच्या मुख्यमंत्री असल्याचा भास व्हायचा. दररोज कडक पांढरे कपडे घालून गावभर हिंडायचो. लोक तोंडावर गोड बोलतात व मागे हसू काढतात हे मला थोडं उशीराच म्हणजे वेळ निघून गेल्यावर कळालं.
घरात अठराविश्व दारिद्र्य कौलारु घराच्या फटीतून भर पावसाळ्यात धो धो सरी कोसळायच्या. बायकोला गेल्या दहा वर्षात कधी नवीन साडी व मुलांना कपडे घेतल्याचं मला आठवत नाही. तिला जे काही मिळायचं ते माहेरावरुन घरातल्या तेलामिठाचिही सोय मी कधी केली नाही.ती माय माऊली दररोज दुसर्याच्या शेतात मजूरी करुन घर चालवायची.त्यात माझा बाप अंथुरणाला खिळलेला त्याचं औषध पाणी तिच बघायची.
मी फक्त गावभर बोबलतं मान मिळवत हिंडायचो. निवडणूका आल्या की नेत्यांच्या मागे पुढे असायचो नारे देत कधी बॅनर चिटकवायला तर कधी झेंडे लावायला नाहीतर सभा झाल्या की खुर्च्या जमा करायला. कारण कार्यकर्ते ते शेवटी कार्यकर्तेच राहतात.
कारण राजकारणाची घराणेशाही असल्याने समान्य माणसांना त्यात कवडीमोल किंमत. मला कधी घर कळालचं नाही. नेत्यांचं घर त्यांची मुलं म्हणजे आपलं सर्वस्व. या राजकारणापायी नात्यांमध्येही दुरावा निर्माण होत होता पण त्याची मला परवा नव्हती कारण मी साहेबांचा कार्यकर्ता होतो ना….
भांडण,तंटे,वाद हे दररोज जगणं झालं होत. त्यामुळे वैरी खूप झाले. सगळं झालं की साहेब आहे ना निपटायला. पण एक दिवशी असा प्रसंग घडला की मी पुरता हादरलो.
माझा बाप हे जग सोडून गेला….हि वार्ता माझ्या कानी पडताचं मी घरी पोहचलो माझी बायको रडू रडू टाहो फोडत होती ती हळूच माझ्याजवळ आली व मला म्हणाली जा आता तुमच्या साहेबांकडे आणी मयतीला तरी पैका आणी की त्यांच्याकडन्.
मी थेट डोळे पुसत निघलो मनात अभिमान होता मी एक कार्यकर्ता आहे साहेब या विधीचा सारा भार उचलतील व हजरही राहतील…. तसाच विचारांच्या भोवर्यात पोहचलो दारी साहेबांच्या… हाक दिली साहेब बाहेर आले मी म्हणलो साहेब बाप गेलाहो माझा…..
साहेब :- अरेरे खूप वाईट झालं रे डिंगबरा….. काही मदत लागली तर कळवं मी :- (मी थोडा सुखावलो आणी हळूच बोललो)
बापाच्या मयत विधीसाठी पैश्याची नडं होती साहेब तेच मिळाले असते तर बरे झाले असते. साहेब :- हेच तर कठीण असतं बघ डिंगबरा तुमच्या सारख्या लोकांचं.देतो म्हणलो की कुत्र्यागत हाफाफल्यावाणी करता तुम्ही अरे माझ्याकडे का सरकारचा निधी आहे का की तुमचा कुणी गेला की खर्च करायला.
मी :- साहेब पण मी तुमचा कार्यकर्ता….. साहेब :- ते तर आहेच रे पण मग एक होवू शकत बघ मी व्याजानं देतो चालल का……? मी :- अहो साहेब असं का म्हणताय आतापर्यंत तुमची हाजी हाजी केली त्याचं हे फळ का.? नको तुमचा पैसा आम्हाला. साहेब :- अरे जा.जा
असे दररोज किती येतात आणी जातात तुमची लायकी विसरु नका फक्त निघ आता ईथून चालता हो. पैसे लागतात म्हणे.
तसाच निराशेपोटी घराकडे पाऊले टाकत निघालो एक-एका पावला प्रती मला माझा भूतकाळ आठवत होता. किती काही काहि केलं या नेत्यांसाठी पण यांना त्याची कदर नाही. घरी आलो बायकोला म्हंटले नाही देवू शकलो गं मी माझ्या बापाला सुखी मरण तरी. जीवंतपणी यातना दिल्याच पण मेल्यावरही त्यांचा अंत:विधी मी निटसा करु शकत नाही. नातेवाईक व या गलिच्छ राजकारण व माझ्या वागणूकीपायी तुटल्याने मयतीला खांदा द्यायलाही कुणी आलं नाही.
शेवटी माझ्या पत्नीला मुलांना बैलगाडीत बसवून मी बैलांच्या मुसक्या आवलल्या व गाडीत स्वार होवून निघालो स्मशानाकडे. बापाला अग्नि देतांनांच संकल्प घेतला की या अश्या स्वार्थी राजकारणालाही यात समर्पित करत आहे. किती स्वार्थीपणा हो याच नेत्यांच्या आयुष्यात नेहमी सुख रहावं यासाठी धडपडणार्या कार्यकर्त्याच्या हाती शेवटी काय लागत तर निराशाचं ना. या देशात सुव्यवस्थित राजकारण करणारे लोकही आहे ते नेतेगिरि करत नाही तर समाजकारण करतात.
परंतू बहुतेक ठिकाणी मोहापायी बरबटलेले राजकारणीच जास्ती दिसतात. कुणीही उठत अन् गल्लीत दादा,भाऊ,काका,आण्णा होवून जात.थोडे कडक कपडे घातले की भावी सरपंच युवा नेते भावी आमदार झाल्यागत अनेकांना वाटू लागतं. पण मित्रांनो खरं सांगू या राजकारणापायी आपण आपल्याच पायावर दगड मारत आहोत.
ज्याला कागदावर सही करता येत नाही तो गावचा सरपंच. माझ्यामते या नेतेमंडळींच्या स्वार्थापायी तरुणामध्ये बेरोजगारीच प्रमाण वाढत आहे. खेडोपाडी तरुण मुलं नुसते गावभर हिंडतांना दिसतात. आज तरुणांनी जाग होण्याची गरज आहे कारण आई-बापाला ग्लासभर पाणी न देणारं पोरगं नेत्यांच्या वाढदिवसाला बाटलीभर रक्त देवून येत.
हे कुठेतरी लक्षात असू द्या. व सुशिक्षित व्हा बेरोजगारीवर मात करा आपल्या शिक्षणाने अनेकांना कसा फायदा होईल याचा विचार करा. नेते मंडळीची कशाला सेवा करताय तर या भारत मातेची या समाजाची आपल्या गावाची व आई-वडिलांची मनोभावे सेवा करा.
देशसेवा हेच तुझे कार्य आणी याचाच तु कर्ता म्हणजेच ‘कार्यकर्ता’
लेखक:सागर म भोंडे पाटील मु.पो म्हसला बु ता.जि.बुलडाणा मो नं :-9011185202