‘”तुम्ही निर्लज्ज असू शकाल, मी नाही” असे बोलून रतन टाटा यांनी व्यवसायापेक्षा देश महत्वाचा हे दाखवून दिले’अशा स्वरूपाची एक मोठी पोस्ट सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली बघायला मिळत आहे. रतन टाटा यांची स्तुती करणारे अनेक मेसेज त्यासोबत फिरताना दिसत आहेत. रतन टाटा यांच्या देशभक्तीचे गुण गान करणाऱ्या या पोस्टमध्ये खरंच तथ्य आहे का? जाणून घेऊया खासरेवर..
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये-
२६/११ च्या घटनेनंतर काही महिन्यांनी टाटा उद्योग समूहाच्या ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स यांनी त्यांच्या देश विदेशातील हॉटेल्सचे नुतनीकरण व पुनर्रचना करण्याच्या कामाचे त्यांचे सर्वात मोठे टेंडर काढले होते. काही पाकिस्तानी कंपन्यांनी हे टेंडर भरले होते. आपले टेंडर प्रभावशाली ठरावे म्हणून पाकिस्तानातील दोन मोठ्या उद्योगपतींनी रतन टाटा भेटीसाठी पूर्व नियोजित वेळ देत नाहीत हे पाहून मुंबईतील “बॉम्बे हाऊस” या टाटाच्या मुख्यालयास समक्ष भेट देऊन टाटांची भेट घेतली.
त्या पाकिस्तानी उद्योगपतींना बॉम्बे हाऊसच्या स्वागत कक्षात ताटकळत ठेवण्यात आले. काही तासांनी त्यांना कळविण्यात आले की, रतन टाटा कामात व्यस्त असल्याने पूर्व परवानगीशिवाय ते कोणालाही भेटत नाहीत. निराश, त्रस्त,वैतागलेले पाकिस्तानी उद्योगपती दिल्लीला गेले. आणि त्यांच्या हायकमिशन मार्फत केंद्रीय व्यापार मंत्र्याला भेटले. या मंत्र्याने लगेच रतन टाटा यांना फोन करून विनंती केली की, त्या दोन पाकिस्तानी उद्योगपतींना आपण भेट द्यावी आणि त्यांच्या टेंडरचा आस्थापूर्वक विचार करावा.
त्यावर रतन टाटा ताडकन म्हणाले, “तुम्ही निर्लज्ज असू शकाल, मी नाही”. त्यानंतर काही महिन्यांनी पाकिस्तानी सरकारने टाटा उद्योग समूहाला “टाटा सुमो” या वाहनाची खूप मोठी खरेदीची ऑर्डर दिली, मात्र रतन टाटा यांनी ती खरेदीची ऑर्डर स्पष्टपणे धुडकावून लावली …। या ऑर्डर च्या माध्यमातून टाटा समूहाला हजारो कोटींचा नफा कमवायची संधी होती पण त्यांनी त्यावेळी देशाचा विचार केला.
काय आहे सत्यता?
पण या पोस्टची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हि पोस्ट २०१२ पासून शेअर केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हाच हि पोस्ट खोटी असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र वारंवार हि पोस्ट शेअर केली जात आहे. BharathAutos या ऑटोमोबाईल वेबसाईटवर ८ ऑगस्ट २०१२ ला हि न्यूज पब्लिश करण्यात आली होती. BharathAutos ने हि न्यूज खोटी असल्याचे सांगत माफी देखील मागितली होती.
टाटा कंपनीकडून हा बिजनेस नाकारण्यात आला होता मात्र याचे कारण वेगळे होते. भारत आणि पाकिस्तान दरम्यान कुठल्याही मोठ्या उच्चस्तरीय व्यापारावर प्रतिबंध घातलेले होते. त्यामुळे पाकिस्तान सरकार आणि टाटा मोटर्स मध्ये असा कुठलाही व्यवहार होणे अशक्य होते. टाटा मोटर्सचे एक ट्विट देखील हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करते.
Thank you all for your caring and thoughtful messages .
— Ratan N. Tata (@RNTata2000) July 13, 2013