प्रत्येक राजकीय पार्टी आपण किती देशभक्त आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच करते. भारतात राजकीय नेते चांगले कि वाईट याचा अंदाज काही गोष्टींवरून लावला जातो. ज्यामध्ये त्यांना असलेला सैनिकांबद्दलचा आदर देखील महत्वाचा पैलू आहे. जो सैन्याचा जास्त सन्मान करेल तो पक्ष किंवा राजकीय नेता चांगले असे एक मापच आहे. अनेक वर्षे काँग्रेस सत्तेत होते त्यामुळे काँग्रेसचा दावा असतो कि आम्हीच मोठे देशभक्त आहोत. तर भाजप म्हणतो आम्ही मोठे देशभक्त. यातच भर पडली आहे नव्याने व्हायरल झालेल्या एका फोटोची. ज्यामध्ये इंदिरा गांधी या सैन्याला जेवण वाढताना दिसत आहेत. पण यामध्ये खरंच तथ्य आहे का? जाणून घेऊया व्हायरल फोटोमागची सत्यता खासरेवर..
व्हायरल पोस्टमध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. एखाद्या तंबूमध्ये एक टेबल ठेवलेला आहे. टेबलावर काही प्लेट्स आहेत आणि तीन सैनिक बाजूने बसलेले आहेत. या टेबलाच्या बाजूला इंदिरा गांधी उभ्या आहेत. ज्या आपल्या हातात असलेल्या प्लेटमधून सैनिकांना जेवन वाढत आहेत. आजूबाजूला अजूनही काही लोकं बसलेले आहेत, ज्यावरून जेवणाचा कार्यक्रम चालू आहे याचा अंदाज येतो. या फोटोसोबत जो हिंदी मजकूर व्हायरल झाला आहे त्यामध्ये लिहिलेले आहे,
‘देश के बहादुर सैनिकों को अपने हाथ से नाश्ता परोसते हुए तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी. इसे कहते हैं देश के वीर जवानों का सम्मान.’
काय आहे यामागची सत्यता?
या फोटोबद्दल माहिती शोधली असता हा फोटो एक्सप्रेस ग्रुपच्या जनसत्ता वेबसाईटवर एका बातमीत वापरलेला मिळाला. फोटोवर लिहिलेल्या कॅप्शननुसार हा फोटो १९ जानेवारी १९८० चा आहे. इंदिरा गांधी या तेव्हा पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी या जेवन वाढत होत्या यामध्ये तर तथ्य आहे मात्र त्या टेबलवर बसलेले लोक हे सैन्याचे जवान नाहियेत तर ते NCC (नैशनल कैडेट कोर) चे कॅडेट्स आहेत.
इंदिराजींचा हा फोटो चांगला संदेश देत असला तरी त्यामध्ये ते सैनिक आहेत म्हणून जो मॅसेज व्हायरल झालाय तो मात्र खोटा आहे. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता हा अशाप्रकारे आपले नेते कसे चांगले आहेत हे दाखवण्यासाठी असे करतो हे मात्र खरे आहे.