Friday, March 24, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

वंशावळीचे जतन करणारा हेळवी/भाट समाजाबद्दल तुम्हाला हि माहिती आहे का?

khaasre by khaasre
November 15, 2018
in नवीन खासरे
0
वंशावळीचे जतन करणारा हेळवी/भाट समाजाबद्दल तुम्हाला हि माहिती आहे का?

वंशावळीचे जतन करणारा हेळवी समाज- प्रणव पाटील
(मूळ लेख – त्रैमासिक ‘इतिहास शिक्षक’ .)
दक्षिण महाराष्ट्राच्या सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या ग्रामीण भागात ‘हेळवी’ हा जिव्हाळ्याचा व तितकाच आपुलकीचा आणि शहरांत कुतूहलाचा विषय आहे. ‘भारतीय’ या मराठी चित्रपटात मकरंद अनासपुरेने हेळ्व्याची भूमिका करून तो विषय सर्वांसमोर आणला.

हेळवी हा भटका समाज. मोकळे आकाश व विस्तीर्ण क्षितिज हे या हेळव्यांचे घर आणि नंदीबैल हा त्यांचा वाहतुकीचा प्राणी. त्या बैलावर संसाराचे ओझे घेऊन फिरणारे हेळवी सर्वांसाठी आकर्षणाचा विषय. कारण मोडी लिपी लिहिता-वाचता येणारी ही एकमेव भटकी जमात आहे. गावा गावांतील लोकांची वंशावळी सांभाळणे, त्यांत नवीन नावे घालणे, कुळांचा इतिहास नोंदवणे हा हेळव्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. भारताच्या ग्रामीण व्यवस्थेत जसे गावगाडा चालवणारे आलुतेदार-बलुतेदार तयार झाले तसे गावातील लोकांची वंशावळ जतन करण्याचे काम हेळव्यांना खुद्द भगवान शंकरांनी दिले!

हेळव्यांचा नंदीबैल म्हणजे भलेथोरले जनावर. नंदीबैलाचे आकर्षण थोरामोठ्यांपासून लहानांपर्यंत आहे. अंगापिंडाने मजबूत असणारा पांढराशुभ्र नंदी सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. हेळव्यांचा पोषाखही तसाच लक्षवेधी आहे. डोक्याला लाल, गुलाबी धनगरी फेटा, अंगात मांडचोळणा आणि धोतर, खांद्यावर उपरणे, पाय झाकण्यासाठी गुलाबी उपरणे (हेळवी वंशावळ सांगताना पाय झाकून घेतात. कारण त्यांच्या मतानुसार हेळव्यांचा मूळ पुरुष हा लंगडा होता.), हातात चांदीचे कडे, कानात कुंडले, पायात जोडव्या व चांदीचे तोडे असे हे हेळवी त्यांच्या बैलांनाही कायम सजवतात. नंदीबैलावर रंगीत चित्रांची काशिदीकारी केलेली झूल, शिंगांना रंगरंगोटी करून त्यांच्या टोकांना पितळी टोपडी आणि त्यांना रंगीबेरंगी गोंडे असतात. गळ्यात मोठ्या घंटेबरोबर लहान लहान घंटांच्या माळा. हेळवी बैलावर बसून गावात आले, की हां हां म्हणता सगळ्या गावात बातमी पसरते आणि त्यांना भेटायला एकच गर्दी उसळते. गावकरी प्रेमाने त्यांचे स्वागत करून त्यांच्या राहण्याची व नंदीबैलाच्या चाऱ्याची सोय करतात. हेळवीदेखील गावातील सर्वांना नावानिशी ओळखतात.

हेळवी साधारणपणे एखाद्या गावी यात्रेदरम्यान येतात. त्यामुळे शहरात गेलेली माणसेदेखील भेटतात. काही ठिकाणी पावसाळ्याआधी येतात. प्रत्येक हेळव्याकडे साधारणपणे दहा ते पंधरा गावे असतात. त्यातील काही त्यांची मुले सांभाळतात. प्रत्येक गावातील मूळ कुळांच्या वंशावळी व त्यांचा इतिहास हेळव्यांकडे असतो. गावात हेळव्यांची मुक्कामाची जागा ठरलेली असते. गावात आल्यानंतर ते एक महिनाभर तरी तेथे राहतात. त्यांच्या कुटुंबाची सोय लावून ते बैलांवरून घरोघरी फिरतात. प्रत्येक वाड्यावाड्यावर, वस्तीवर जाऊन प्रत्येक घरातील लोकांच्या समोर त्यांची वंशावळ चोपड्यांमधून हेळवी त्यांच्या खास आवाजाच्या ठेक्यात वाचून दाखवतात. ठेका पूजा करणाऱ्या ब्राह्मणांच्या ठेक्यासारखा जलद असतो. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐकल्याखेरीज बोलणे कळत नाही. साधारण एका कुळातील पंचवीस ते तीस पिढ्यांची नावे व त्यांचा इतिहास वाचून दाखवणे म्हणजे मोठी अवघड गोष्ट; त्यामुळे तसा ठेका नैसर्गिक आहे. प्रत्येक कुळाची माहिती सांगताना ते प्रथम त्या मूळाचा मूळपुरुष, मूळगाव सांगतात. एखादे कूळ कोणकोणती गावे बदलत बदलत केव्हा आज राहत असलेल्या गावी, का व कसे आले ते सांगतात. यात दिलेल्या तारखा शक कालगणनेनुसार असतात. वंशावळीतील पूर्वजांची जुन्या वळणाची नावे ऐकताना मोठे रंजक वाटते. पुढे हेळवी त्या कुळाचे गोत्र, प्रवर, ऋषिगोत्र, व्यवसाय, कुलदेवी इत्यादी रंजक माहिती सांगतात. वंशावळीतील नावे मूळपुरुषापासून ती आजच्या पिढीपर्यंत आणून सोडतात. त्यानंतर दक्षिणा म्हणून हेळवी धान्य घेतात. त्या आधारे घरात कोणाचे लग्न झाले आहे का? कोणाला मूल झाले आहे का? तसेच नवीन सून आली असेल तर तिचेही नाव वंशावळीत घालावे लागते. हेळवी स्त्रियांची नावे पूर्वीच्या वंशावळ यादीत घालत नव्हते; परंतु समान संपत्ती हक्क कायद्यानंतर हेळवी वंशावळयादीत मुलींची नावे घालू लागले आहेत. जुन्या वंशावळ यादीत एखादी स्त्री जर वारस असेल तर तिचे नाव पडते. एखाद्याचे नाव घालण्यासाठी हेळवी तांब्याची कळशी घेतात. लग्न, मुलाचा जन्म या नोंदींमुळे हेळव्यांचे उत्पन्न वाढते. लोक हेळव्यांच्या मागण्या आनंदाने पूर्ण करतात.

पूर्वी, हेळवी वंशावळींची नोंद असलेले ताम्रपट घेऊन फिरत असत. गावांची लोकसंख्या वाढली आणि ताम्रपटांचे ओझे घेऊन फिरणे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे हेळवी वंशावळींतील नोंद कापडी शिवणीच्या कागदांच्या चोपड्यांमध्ये ठेवू लागले. परंतु कागद लवकर जीर्ण होऊ लागताच त्यांच्या नक्कला नव्या चोपड्यावर करून ठेवतात. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांनी त्यांचे ताम्रपट एकत्रितपणे बेळगावला ठेवले आहेत. त्या ताम्रपटांची देखरेख करणाऱ्यांना गुरू म्हणतात.
मध्य महाराष्ट्रातील हेळवी व्यवस्था जवळ जवळ संपुष्टात आली आहे. काही ठिकाणी ती काही प्रमाणात चालू आहे. पूर्वी त्यांचे केंद्र कासेगाव, जि. सांगली हे होते. दक्षिण महाराष्ट्रातील हेळव्यांचे केंद्र बेळगाव (कर्नाटक) हे असून मूळस्थान चिंचणी हे बेळगाव जिल्ह्यातील गाव आहे. त्या गावी काही हेळव्यांना थोड्या फार जमिनी आहेत. हेळवी लोकांची मातृभाषा कन्नड आहे. हेळवी लोकांची मूळची जात धनगर ; परंतु सर्वांनी नंतर लिंगायत पंथ स्वीकारलेला आहे. त्यामुळे त्यांना मांसाहार वर्ज्य आहे; महाराष्ट्रातील काही हेळवी मात्र महाराष्ट्रीय लोकांच्या संगतीमुळे मांसाहार करू लागले आहेत, त्यामुळे त्यांना लिंगायत समाजात लग्नाकरता मुली मिळणे अडचणीचे ठरू लागले आहे. हेळव्यांना ते लिंगायत असल्यामुळे सोमवार हा त्यांचा पवित्रवार असतो. त्या दिवशी हेळवी कडक उपवास करतात व बैलाची पूजा करतात. ते सोमवारी बैलावर बसत नाहीत. हेळवी लोक त्यांचे आडनाव ‘हेळवी’ असेच लावतात. ग्रामीण भागात ज्या केसेसमध्ये वंशावळीची गरज लागते, तेथे हेळव्यांची साक्ष कोर्टग्राह्य धरली जाते.

हेळव्यांच्या काही समस्या आहेत –
१. शालेय शिक्षणाचे प्रमाण त्यांच्या सततच्या भटकंतीमुळे नगण्य आहे. २. त्यांना जातींच्या सरकारी सवलती व योजना यांची माहिती नाही. ३. हेळवी समाज कर्नाटकात संघटित आहे ; परंतु महाराष्ट्रात तो संघटित नाही. ४. काही गावांचे हेळवी अकाली गेल्यामुळे त्या गावी दुसऱ्या हेळव्याची नेमणूक करणे गरजेचे आहे. ५. हेळवी परंपरा सांभाळण्यासाठी मुलगाच हवा या धारणेमुळे त्यांच्यात अपत्यांचा जन्मदर अधिक आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रबोधन करणे गरजेचे आहे.
६. महाराष्ट्रात काही भागात दर पाच वर्षांनी राजस्थानातून भाट येतात आणि वंशावळीची नोंद ठेवतात, काही ठिकाणी त्यांचे येणे बंद झाले आहे. तेथे हेळव्यांची नेमणूक व्हावी. ७. हेळव्यांना कामात नवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन उपकरणे पुरवणे गरजेचे आहे.

दक्षिण महाराष्ट्रात हेळवी परंपरा भक्कम लोकाश्रयामुळे सुरळीत चालू आहे. त्यामुळे ती इतरत्र तशीच चालू राहवी याकरता प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझ्या वंशावळीच्या शोधात मी अनेकदा हेळव्यांकडे गेलो त्यांनी माझा प्रेमाने पाहुणचार केला व माहिती पुरवली, त्याबद्दल मी मायप्पा हेळवी व बाबू हेळवी यांचा आभारी आहे.

साभार- प्रणव पाटील

Loading...
Previous Post

अवनी वाघिणीच्या बछड्याचे पुढे काय झाले? कुठे आहेत अवनीने बछडे वाचा खासरेवर..

Next Post

शिवसेना आमदार तानाजीराव सावंतांना शेतकऱ्याच्या मुलाचे खुले पत्र..

Next Post
शिवसेना आमदार तानाजीराव सावंतांना शेतकऱ्याच्या मुलाचे खुले पत्र..

शिवसेना आमदार तानाजीराव सावंतांना शेतकऱ्याच्या मुलाचे खुले पत्र..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In