देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत प्रत्येक दिवशी कोट्यवधी रुपयांची वाढ होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे गेल्या ६-७ वर्षांपासून या यादीत टॉपवर आहेत. श्रीमंत व्यक्तींच्या यादीत एस. पी. हिंदुजा आणि कुटुंब, एल. एन. मित्तल आणि कुटुंब आणि अजीम प्रेमजी यांचा अनुक्रमे दुसरा तिसरा आणि चौथा क्रमांक लागतो. ‘बार्कलेज हुरुन इंडिया रिच लिस्ट २०१८’ मध्ये त्यांच्या संपत्तीविषयी माहिती समोर आली आहे. त्यांच्या कंपनीच्या समभागांच्या भावात मागील एक वर्षात ४५ टक्क्यांची वाढ झाली आहे. पण मुकेश अंबानी यांची संपत्ती रोज किती कोटींनी वाढते हा कधी विचार केला आहे का?
तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडला असेल तर याच उत्तर समोर आले आहे. मुकेश अंबानी रोज किती कोटी रुपये कमावतात हे या लिस्टमध्ये समोर आले आहे. मागील वर्षभरात त्यांच्या संपत्तीत प्रतिदिन किती कोटींची वाढ झाली आहे याबद्दल या लिस्टमध्ये खुलासा करण्यात आला आहे. मुकेश अंबानी हे दार दिवसाला तब्बल ३०० कोटी रुपये कमावतात. त्यांच्या एकट्याची संपत्ती दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असलेल्या अनुक्रमे एस. पी. हिंदुजा आणि कुटुंब, एल. एन. मित्तल आणि कुटुंब आणि अजीम प्रेमजी यांच्या एकत्रित संपत्तीहून अधिक आहे.
या यादीत ज्यांची संपत्ती १००० कोटी रुपयांहून अधिक आहे अशा भारतीय श्रीमंतांचा समावेश करण्यात आला आहे. २०१७ मध्ये या यादीत ६१७ लोकांचा समावेश होता तर तीच संख्या यावर्षी ८३१ वर पोहोचली आहे.
या यादीत पाचव्या स्थानी सन फार्माचे दिलीप संघवी यांचा नंबर लागतो. तर कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक हे सहाव्या स्थानी, सीरम इन्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस एस. पूनावाला सातव्या स्थानी आहेत तर अडानी एंटरप्राइजेसचे गौतम अडानी हे आठव्या स्थानी आहेत.