बॉलिवूड कलाकारांची बोलण्याची शैली तसेच त्यांच्यातील प्रासंगिकपणा बघून त्यांचे खूप शिक्षण झाले असावे, असा समज चाहत्यांचा झाल्याशिवाय राहत नाही. परंतु काही कलाकारांबाबत वास्तव मात्र वेगळेच आहे. होय, काही कलाकारांचे जरी त्यांच्या बोलण्या-वागण्यातून शिक्षण कळून चुकत नसले तरी, वास्तवात ते जेमतेमच शिकलेले आहेत. आज आम्ही बॉलिवूडमधील अशाच एक प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. कदाचित वाचून तुमचा विश्वास बसणार नाही. होय, अभिनेत्री करिश्मा कपूर केवळ पाचवी शिकली आहे. कदाचित हे वाचून अजूनही तुमचा विश्वास बसत नसेल, पण हे खरं आहे.
आपल्या दमदार अभिनयाने अनेक चित्रपटांमध्ये स्वत:चा ठसा उमटविणारी करिश्मा केवळ पाचवी शिकली आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता रणधीर कपूर तिचे वडील, तर अभिनेत्री बबिता तिची आई आहे. तिची बहीण करीना कपूर हीदेखील हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. कपूर परिवारात सर्वात कमी शिकलेली सदस्य म्हणून करिश्माकडे बघितले जाते. इ.स. १९९१ साली चित्रपटसॄष्टीत पदार्पण केलेल्या करिश्माने कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांतून कामे करत इ.स. १९९०च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले. तिने भूमिका साकारलेल्या चित्रपटांपैकी राजा हिंदुस्तानी (इ.स. १९९६), दिल तो पागल है (इ.स. १९९७), फिजा (इ.स. २०००), झुबैदा (इ.स. २००१) हे चित्रपट विशेष गाजले.
बॉलिवूडमधील नामांकित कुटुंबापैकी एक असलेले कपूर कुटुंब गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. कुटुंबाकडून मिळालेला अभिनयाचा वारसा खूपच कमी वयात पुढे घेऊन जाणारे कपूर कुटुंबातील बºयाचशा सदस्यांचे शिक्षण दहावी किंवा बारावीपर्यंत झाले आहे. मात्र करिश्मा केवळ पाचवीपर्यंतच शिकली आहे.
करिश्मा कपूरने ‘कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करिश्मा इयत्ता सहावीचे शिक्षण घेत होती. परंतु तिला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचे असल्याने तिने तेथूनच शिक्षणाला फुलस्टॉप दिला. तिने अभिनयातच आपल्या करिअरवर भर दिला. त्यामुळे करिश्माला केवळ पाचवीपर्यंतच शिक्षण घेता आले. कदाचित ही बाब अनेकांना माहिती नाही. कारण करिश्माने आपल्या अदाकारीच्या जोरावर अनेक भूमिका गाजविल्या आहेत. आजही करिश्माचा इंडस्ट्रीतील दबदबा कायम आहे. सध्या ती इंडस्ट्रीतून गायब असली तरी तिचे नाव मात्र तिच्या चाहत्यांच्या ओठावर आहे.