सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील आणि केंद्रातील राजकारणातील एक बुलंद नाव पवार हे पॉवरफुल नाव पाठीमागे असूनही या नावाचा कधीही उपयोग न करता स्वतःचा रस्ता ताईंनी स्वतः तयार केला. ताई ह्या नावाप्रमाणेच सर्वांची मोठी बहिण म्हणून काळजी घेतात असे अनेक त्यांच्या जवळचे सांगतात. आज खासरे वर बघूया सुप्रिया ताई विषयी काही खासरे माहिती जी अजूनही अनेक लोकांना माहिती नाही.
शरद पवार यांचे प्रतिभाताईंशी लग्न ठरले, त्यावेळी त्यांनी एकच अट घातली होती. ती म्हणजे, आपल्याला एकच मूल हवे. मग ते मुलगा असो की मुलगी. 30 जून 1969 रोजी पुणे येथे सुप्रियाताईंचा जन्म झाला. त्या एकुलती एक मुलगी आहे, असा विचारही न करता कुटुंब नियोजन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. हा निर्णय ४५ वर्ष अगोदर घेणे म्हणजे मोठे काम होते त्यांनी त्या काळात हा निर्णय घेतला. त्यामधून साहेबांच्या विचारातील आधुनिकता स्पष्ट दिसते. अश्या विचारात सुप्रिया ताईंचे बालपण गेले त्यांनाही त्यांचे निर्णय घेण्याचे लहानपणापासून पवार साहेबांनी स्वतंत्र दिले होते. त्यांच्या आयुष्याचे सगळे निर्णय त्यांनीच घेतले आणि विशेष म्हणजे त्यांचे आईबाबा आणि कुटुंबीय पाठीशी भक्कमपणे उभे राहिले.
अशी झाली सदानंद सुळे यांच्या सोबत ओळख
कॉलेजनंतर सुप्रियाताई एक वर्ष पुण्यात काकांकडे राहिल्या. दरम्यान पुण्यातून प्रकाशित होणा-या एका अग्रगण्य वृत्तसमूहात नोकरीही केली. त्याच्या पुढच्या वर्षी त्यांची आणि सदानंदरावांची एका फॅमिली फ्रेंडकडे भेट झाली. सदानंद सुळे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे पूत्र म्हणजेच बाळासाहेबांचे भाचे आहेत. त्यामुळे अर्थातच बाळासाहेब ठाकरे हे सदानंद सुळे यांचे सक्के मामा लागतात. पहिल्या भेटीनंतर ताई आणि सदानंदरावांनी सहा महिने एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ दिला. नंतर तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने त्यांचे लग्न झाले. त्याला शरदराव आणि प्रतिभाईंनी आनंदाने होकार भरला आणि कन्यादान केले.
सदानंदराव हे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे जवाई तर आहेतच. पण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे पुत्रही आहेत. पण, तरीही ते अमेरिकेत नोकरीत करत. लग्नानंतर सुप्रियाताई या सदानंद यांच्याबरोबर अमेरिकेत गेल्या. त्यांनी तिथे बर्कले युनिवर्सिटीत प्रवेश घेऊन आपले खंडित शिक्षण सुरू केले. तिथे जलप्रदूषणावर त्यांनी एक पेपरही सादर केला होता. नंतर सदानंद यांच्या बदलीमुळे त्यांना सिंगापूरला यावे लागले. त्यानंतर त्यांचे शिक्षण थांबले ते कायमचेच. काही वर्ष जकार्ताला राहून 11 वर्षांपूर्वी हे दाम्पत्य भारतात परतले.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..