अष्टविनायकापैकी पहिले महत्वाचे ठिकाण
मोरगाव श्री मयुरेश्वर
जवळच कर्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरुजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणेजिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.
अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे
थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात.
थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती.
हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून २३ कि. मी. अंतरावर आहे.
अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती.
या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.
हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.
अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे.
येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.
मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.
अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज.
जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे.
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.
महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे.
या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ.स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.
रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे.
पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे.
या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.
पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली – पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल – गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.
Comments 1