आजचा भारताचा सर्व कारभार ज्या नियम-कायद्याच्या आधारे चालतो, त्या नियम कायद्याचं पुस्तक म्हणजे भारताचे संविधान. त्या संविधानाविषयी काही अपरिचित बाबी आपण खासरेवर जाणुन घेऊया…
भारताचे संविधान तयार करण्यासाठी सर्वप्रथम घटना समिती (संविधान सभा) स्थापन करण्यात आली. संविधान सभेत सुरुवातीला २९६ सदस्य होते, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यात फेरबदल होऊन ही संख्या २९९ झाली. ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. ११ डिसेंबरला डॉ.राजेंद्रप्रसाद यांची घटनासमितीचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. १३ डिसेंबर रोजी जवाहरलाल नेहरुंनी घटनासमितीत मांडलेल्या उद्देशपत्रिकेच्या आधारे घटनेचा सरनामा/प्रास्ताविक तयार करण्यात आले. पुढे त्या प्रास्ताविकेच्या चौकटीतच घटनेची निर्मिती करण्यात आली. घटना समितीने घटना निर्मितीच्या कामांसाठी ८ मुख्य समित्या व १३ उपसमित्यांची रचना केली. २९९ सदस्यांना वेगवेगळ्या समित्यांमध्ये कामे वाटुन देण्यात आली. घटना समितीने राज्यघटना तयार करणे, देशासाठी कायदे तयार करणे, भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला अनुमोदन देणे, भारताचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रगान स्विकृत करणे, पहिल्या राष्ट्रपतींची निवड करणे आणि निवडणुका होईपर्यंत तात्पुरती संसद म्हणुन कार्यभार पाहणे ही कामे केली.
मसुदा समिती ही घटना निर्मितीतील मुख्य समिती होती. त्यामध्ये ७ सदस्य होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. इतर समित्यांनी केलेल्या तरतुदींचा विचार करुन घटनेचा मसुदा तयार करण्याचे काम मसुदा समितीने केले. त्यांनी घटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये सादर केला. भारतीय जनतेला त्या मसुद्यात सुधारणा सुचविण्यासाठी ८ महिने वेळ दिला. जनतेची मते, सुचना, टीका विचारात घेऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये दुसरा मसुदा सादर करण्यात आला. त्यावर चर्चा होऊन नोव्हेंबर १९४८ मध्ये तिसरा अंतीम मसुदा घटना समितीत मांडण्यात आला. त्या मसुद्यातील प्रत्येक कलम विचारात घेऊन वर्षभरात एकुण तीनदा वाचन झाले. या टप्प्यात एकुण ७५६३ सुधारणा सुचविल्या गेल्या, त्यापैकी २४७३ सुधारणांवर घटना समितीत प्रत्यक्ष चर्चा घडुन आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद केला. मसुदा बनविण्याचे प्रमुख (Chief Draftsman) म्हणुन एस.एन.मुखर्जी यांनी काम पाहिले.
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेच्या मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला. २९९ पैकी उपस्थित असणाऱ्या २८४ सदस्यांनी राज्यघटनेवर सह्या केल्या. सदस्य सह्या करत असताना बाहेर पाऊस सुरु झाला हे शुभसंकेत असल्याचे बोलले गेले. २४ जानेवारी १९५० रोजी पुन्हा एकदा घटना समितीने राज्यघटनेवर सर्वांच्या स्वाक्षऱ्या केल्या. घटनेचा अंमल २६ नोव्हेंबर १९५० पासुन सुरु झाला. हा दिवस निवडण्यामागचे कारण म्हणजे काँग्रेसच्या १९२९ च्या लाहोर अधिवेशनातील ठरावानुसार २६ जानेवारी १९३० हा दिवस भारताचा “पुर्ण स्वराज्य दिन” म्हणुन साजरा करण्यात आला होता. २६ जानेवारी १९५० हा दिवस घटनेच्या प्रारंभाचा दिन म्हणुन ओळखला जातो. तो दिवस प्रजासत्ताक/गणराज्य दिन म्हणुन साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० पासुन घटना समिती संपुष्टात आली. भारतीय संविधान अंमलात आल्यापासुन भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७, भारत सरकार कायदा १९३५ व त्याचे सर्व पुरक कायदे रद्द करण्यात आले.
भारताची घटना निर्माण करण्यासाठी घटनाकर्त्यांनी जगातील जवळपास ६० देशांच्या घटनांचा विचार केला. घटननिर्मितीसाठी २ वर्षे,११ महिने व १८ दिवसांचा कालावधी लागला. (अमेरिकेची घटना चार महिन्यात तयार झाली होती.) या कालावधीत घटना समितीने ११ सत्रात १६६ दिवस काम केले. मसुदा समितीने १४१ दिवस काम केले. घटनानिर्मितीसाठी एकुण ६३ लाख ९६ हजार ७२९ रुपये खर्च आला. भारतीय राज्यघटनेचे मुळ इंग्रजी हस्तलिखित सुंदर आणि वळणदार अक्षरात दिल्लीच्या प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी लिहले. त्याच्या प्रत्येक पानावर चित्रकार नंदलाल बोस यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतनमधील इतर कलाकारांनी आकर्षक नक्षीकाम केले आहे. प्रास्ताविकाचे नक्षीकाम बिओहर राममनोहर सिन्हा यांनी केले. हिंदी मुळ हस्तलिखित वसंत वैद्य यांनी लिहले. त्याला नंदलाल बोस यांनी आकर्षक असे नक्षीकाम केले. भारतीय संविधानाची इंग्रजी व हिंदी मुळ प्रत भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम पेटीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. भारतीय संविधानाची हिंदी व इंग्रजी प्रत देहारादुन येथे छापण्यात आली.
घटना समितीची निशाणी म्हणुन हत्ती स्विकृत करण्यात आला होता. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २२ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.
प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती देशाला संबोधित करतात. भारतरत्न, पद्मभुषण, किर्तीचक्र पुरस्कार प्रजासत्ताकदिनी दिले जातात. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये “Abide with me” हे गीत गायले जाते.
भारतीय संविधानाची मूळप्रत डाऊनलोड करण्या करिता इथे क्लिक करा…
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..
good informection sir