नवसाला पावणारी खान्देशवासिनी ‘कानुबाई’ हे खान्देशचे आराध्यदैवत आहे. ‘कानुबाई’च्या नावावरूनच खान्देश हे नाव प्रचलित असल्याचे सांगितले जाते. पुराणातही ‘कानुबाई’चा उल्लेख आढळतो. निसर्गदेवता असलेली कानुबाई ही प्रकृती आहे तर सूर्य हा पृथ्वी, चंद्र आदींचे मूळ आहे, म्हणून कानुबाईचे लग्न सूर्याशी लावले गेल्याची आख्यायिका आहे. तसेच वंशवृद्धी आणि गोसंवर्धनसाठी या कानुबाईचा उत्सव श्रावण महिन्यात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. खान्देशासह संपूर्ण राज्यातील इडापिडा जाऊन सुखसमृद्धी नांदावी, यासाठी कानुबाईला साकडे घातले जाते. कानुबाईच्या उत्सवाला आज आधुनिक स्वरुप प्राप्त झाले असले तरी खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र कानुबाईचा उत्सव हा पारंपारिक पद्धतीनेच साजरा केला जातो.
पारंपारिक पद्धतीने प्रतिष्ठापना…
श्रावणातील पहिल्या रविवारी हा उत्सव साजरा करण्याची फार प्राचीन परंपरा आहे. परंतु यंदा पहिल्या रविवारी नागपंचमी आल्याने श्रावणातील दुसर्या रविवारी केला जात आहे. काही भागात दुसर्या अथवा चौथ्या रविवारीही कानुबाईची प्रतिष्ठपना केली जाते. संपूर्ण खान्देशात कानुबाईची प्रतिष्ठापना करण्याची पारंपरिक पद्धत आहे. कानुबाईचा उत्सव हा तसा दोन दिवसांचा असतो, मात्र, पाच दिवसांत कानुबाईचे रोट (प्रसाद) खावे लागतात. खान्देशात श्रावण महिन्यात पहिल्या रविवारी कानुबाईची स्थापना केली जाते. कानुबाईच्या उत्सवात कुटुंबातील ज्येष्ठांना मान दिला जात असतो. त्यामुळे नोकरी किंवा उद्योग-धंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले कुटुंबातील इतर सदस्यही या उत्सवास आवर्जुन हजेरी लावत असतात. कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन कानुबाईची विधिवत पूजन करून घराच्या देव्हार्यात बसवतात. कानुबाई ही श्रीफळ म्हणून पवित्र मानल्या जाणार्या नारळाच्या रूपाने घरोघरी आणली जाते. बर्याच ठिकाणी हे नारळ पिढ्यानपिढ्या तेथील देव्हार्यात जतन करून ठेवलेले असते. कानुबाईची स्थापना ठराविक घरांतच होत असली तरी शेजारीपाजारी, भाऊबंदकीतले लोक त्या कुटुंबांच्या आनंदात सहभागी होतात.
असा चढविला जातो कानुबाईला साज…
कानुबाईला पिवळा, लाल अथवा गुलाबी पीतांबर नेसवला जातो. मोत्याची नथ, मंगळसूत्र, हार, हिरवा चुडा आदी सौभाग्यकांक्षिणीची आभूषणे चढवून घरातल्या देव्हार्यात अथवा देव्हार्यालगतच्या जागी नव्याकोर्या साड्यांच्या आडोशात सजावट करून कानुबाईची स्थापना होते. अवतीभवती आंब्याच्या पानांची तोरणे व विविध रानफुलांच्या माळांनी देव्हारा सजवला जातो. घरातल्या स्त्रिया कानुबाईची गाणी म्हणतात. अनेक लोकगीतांच्या ओव्यांमधून कानुबाईच्या सौंदर्याचे, तिच्या प्रेमाचे गुणगान केलेले असते.
रात्री जागरण, फुगड्या…
कानुबाईची स्थापना अशा गाण्यांबरोबर स्त्रिया अहिराणी व मराठी भाषेतील गीत गाऊन रात्रभर जागरण करतात. डफ वाजवून नृत्य करतात, फुगड्या खेळतात. प्रसाद म्हणून लाह्या अथवा फुटाणे, खडीसाखर वाटले जातात. घरातली स्त्री अथवा दाम्पत्य मिळून उपवास करतात. रात्रभर समई तेवत ठेवली जाते. भक्ती, भाव आणि श्रद्धा यांचा अनोखा संगम त्या उत्सवात पाहायला मिळतो. परगावी गेलेले कुटुंबातील सदस्य या सणानिमित्त गावी परततात. त्यामुळे विभक्त कुटुंबपद्धतीला छेद देत कुटुंबात एकोपा निर्माण करणार्या या सणाला खान्देशात महत्त्व कायम आहे. घरात सुख, समृद्धी व शांती नांदावी म्हणून हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.
दुसर्या दिवशी विसर्जन…
कानुबाईचे विसर्जन दुसर्या दिवशी वाजत-गाजत होते. रविवारी सायंकाळी कानुबाईची स्थापना होऊन सोमवारी विसर्जन केले जात असल्याने तिला एका रात्रीची पाहुणी म्हणूनही संबोधले जाते. गावातल्या स्त्रिया आपापल्या कानुबाईला चौरंगावर बसवून डोक्यांवर घेतात. गल्लोगल्लीत इतर स्त्रिया औक्षण करतात. स्त्रिया सजूनधजून – नऊवारी साड्या अथवा लुगडी परिधान करून विसर्जनात सहभागी होतात. मार्गांत पाण्याचा सडा टाकला जातो.
नवसपूर्तीसाठी रोटांचा नैवेद्य…
उत्सवासमयीचे एक दृश्य कानुबाई नवसाला पावल्यास गव्हाचे ‘रोट’, त्यासोबत तांदळाच्या गोड खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. अर्थातच देवीच्या नावाने नवस मानलेला असताना रोटांसाठी दळलेले जाडभरडे पीठ संपत नाही तोपर्यंत घरोघरी दोन-तीन दिवस दुसरा स्वयंपाक करत नाहीत. सोबत ‘आलन-कालन’ ही विविध पालेभाज्यांचे मिश्रण केलेली भाजी बनवली जाते.
सकाळच्या रोटांना ‘उगतभानूचे रोट’ म्हणतात. त्यासाठी घरातील स्त्रीने भल्या पहाटे, सूर्य उगवण्याआधी रोट रांधावे असा संकेत आहे. दरवाज्यात गायीच्या शेणाने गोलाकार सारवून, त्यावर पिठाची व कुंकवाची रांगोळी काढून दुरडी ठेवली जाते. रोटांच्यावर पुरणाचे दिवे पेटवून पूजा केली जाते. रोट संध्याकाळच्या आत संपवायचे असतात. रोट कुणीही खाऊ शकतो, पण संध्याकाळचे रोट फक्त कुटुंबातील सदस्य किंवा भाऊबंदकीतली माणसे खाऊ शकतात. सकाळचे रोट कानुबाईचे तर संध्याकाळचे रोट तानबाईचे मानले जातात. घरातल्या पुरुष मंडळींच्या संख्येनुसार रोटाचे गहू वेगळे काढले जातात. कुटुंबातून विभक्त झाल्यास त्यानुसार रोटांची वाटणी निम्मी होते. एखाद्या मुलाला मुलगा झालाच नाही तर रोट बंद पडतात. त्याचप्रमाणे बंद पडलेले रोट सुरू होण्यासाठी रोटांच्या दिवशी घरात मूल अथवा गायीला गोर्हा होईस्तोवर वाट पाहावी लागते. कानुबाईच्या विसर्जनानंतर उरलेले रोट हरबर्याच्या डाळीचे पदार्थ, दही, दूध, खीर आदींसोबत पौर्णिमेच्या आत संपवावे असा संकेत आहे.
पूर्वी कानुबाईचे रोट दळण्यापासून तर मुखवटा आणणे, आदल्या रात्री तयारी करणे, स्थापनेच्या दिवशी दिवसभर कार्यक्रम व स्थापनेच्या रात्री व विसर्जन प्रसंगी पारंपरिक गीते व ओव्या म्हटल्या जात असत. मात्र आता या उत्सवातही आधुनिकता डोकावू लागली आहे. पारंपरिक ओव्या व गीते ऐकायला मिळत नाहीत. कानुबाईच्या ऑडिओ कॅसेट तसेच सीडीजमधील नव्या चालीतील गाणे घराघरातून ऐकायला मिळतात. एवढेच नव्हे तर कानुबाईची स्थापना, पूजा व विसर्जन या प्रसंगी करण्यात येणारे विधी व मंत्रोच्चार यांच्याही सीडीज् आता बाजारात उपलब्ध झाल्या आहेत.
कानुबाई पोहचली परप्रांतात-
खान्देशची कुलस्वामिनी आता परप्रांतात पोहचली आहे. खान्देशातील काही लोक नोकरी- व्यवसायासाठी गुजरात, मध्य प्रदेश राज्यात गेले आहेत. कामाच्या व्यापामुळे त्यांना कानुबाईच्या उत्सवात सहभागी होता येत नाही. त्यामुळे त्यांच्या नावाचे रोट ते सोबत घेऊन जातात. परप्रांतात असले म्हणून कानुबाईच्या उत्सवाला पाठ देता येत नाही. त्यामुळे परप्रांतातही कानुबाईचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा होताना दिसतो.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
देवीची महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठे..