सुनील चव्हाण या पुस्तकवेड्या माणसाची ही गोष्ट आहे. पुस्तक माणसाचं मस्तक बदलू शकतात यावर विश्वास असलेल्या या माणसाने चंद्रपूरपासून कणकवलीपर्यन्त आणि ठाण्यापासून बेळगावपर्यन्त सुमारे एक लाख पुस्तके वाटली आहेत.पुस्तके वाटणारा हा माणूस प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून गेल्या १५ वर्षांपासून हे काम करतोय. विकासाच्या गोष्टी शहरातून खेड्याकडे जातात ,इमारती उभ्या राहतात. ती सरकारी कामे होतच राहतात पण पुस्तके जर खेड्यात गेली तर खेड्यात नक्कीच बदल होईल हा आशावाद बाळगून चव्हाण सर यांची मोहीम सुरू आहे. आज हा प्रवास आपण खासरे वर बघूया
सांगली जिल्ह्यातील नेवरी गावचा हा माणूस. पेशान शिक्षक पण वृत्तीनं सामाजिक कार्यकर्ता मनाने कवी त्यांना १५ वर्षापूर्वी पतंगराव कदम यांचे स्वीय साहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. नोकरीच्या निमित्तानं गावं सोडून शहरात जावं लागलं. मुंबईत गेल्यावर आपण ज्या खेड्यातून आलोय तिथल्या माणसांच्यासाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटू लागलं. मुंबईतील झगमगीत दुनियेत त्या गावाकडच्या संवेदनशील माणसाला गावं आठवायच. मुंबईतल सांस्कृतिक वातावरण पाहून वाटायचं,काहीतरी करावं. मग त्यातूनच चांगली पुस्तक खेडोपाड्यात पोहोचवण्याचा विचार आला. ते म्हणतात, मला माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या चरित्रातूनच ही प्रेरणा मिळाली. ‘मग त्यांनी मंत्रालयात पुस्तकप्रेमी अधिकारी व कर्मचारी यांचा ग्रुप केला. काही लेखक कवी यात सहभागी झाले,या पुस्तकप्रेमी लोकांनी पुस्तके गोळा करायची आणि ती खेडोपाडी नेऊन चव्हाण सर यांनी पोहोच करायची. अशी मोहीम सुरू झाली. भालचंद्र नेमाडे, मारुती चित्तमपल्ली,अच्युत गोडबोले,ज्ञानेश्वर कोळी हे लेखक आणि शांताराम भोई, सुवर्णा खरात, अभिजित घोरपडे हे अधिकारी या मोहिमेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी पुस्तके देऊन या विधायक चळवळीला थेट हातभार लावला.आज ही वाचन चळवळ खेडोपाडी पोहोचली आहे.
बेळगाव म्हटलं की मराठी भाषिकांची चळवळ समोर येते. मराठी भाषिक या प्रश्नाबाबत खूपच आक्रमक होतो. याबाबतच्या बातम्याही अधूनमधून येतात. सुनील चव्हाण यांनी बेळगाव भागात मराठीतील चांगली पुस्तक पोहोचवून या भागात वाचनचळवळ रुजवण्याचा प्रयत्न केला. या भागातील अनेक गावांत तोपर्यँत मराठीतील मान्यवर लेखकांची नावेही कानावर गेली नव्हती अशा आडवळणी गावात पुस्तक घेऊन जाणे,पुन्हा लोक पुस्तके वाचतात काय?याचा पाठपुरावा करणे या गोष्टी नोकरी सांभाळून करणे म्हणजे तारेवरची कसरत होती पण या पुस्तकवेड्या माणसाने ती कसरत केली.
तसच पालघर परिसरातील दुर्गम भागातही ही चळवळ पोहोचली. या गावातील शाळांतून पुस्तके वाचण्याचा कार्यक्रम सुरू केला. काही ठिकाणी गावातील तरुणांना सोबत घेऊन वाचनालये सुरू केली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातही असे प्रयोग केले. ‘जे आपण करणं शक्य आहे ते काम आपण करूया.’ पुस्तके वाटून लोकांना अनेक ज्ञानकक्षेच्या जवळपास घेऊन जाणे हाच प्रमुख उद्देश होता. पुस्तकाचं सामर्थ्य लक्षात आलेल्या या गावाकडच्या माणसाने वेड्यासारखी पुस्तके वाटली. त्यांना पुस्तके वाटण्याचं व्यसनच लागलं अस म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. राज्यातील काही रुग्णालये, तुरुंग येथेही ही वाचन चळवळ पोहोचली. गेल्या पंधरा वर्षात कित्येक लोकांना सरामुळे वाचनाची गोडी लागली, ज्यांना फुकट पुस्तके मिळाली होती ते विकत घेऊन वाचू लागले आणि वाटूही लागले. दिव्यानं दिवा लावावा अशी या चळवळीची वाटचाल सुरू आहे.आज ती सगळीकडं विस्तारली आहे. या ध्येयवेड्या माणसाला स्वयंसेवी संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवलेच पण ‘कोसला ‘कार भालचंद्र नेमाडे यांनी घरी बोलावून त्यांचे खास कौतुक केले.
आडगावात पुस्तके घेऊन जाणारे सुनील चव्हाण. तीच त्यांची खरी ओळख आहे पण पुस्तक वाटण्यासोबतच सांगली,साताऱ्यापासून खानदेश, मराठवाडा येथील गरीब विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला हा माणूस. अनेक विद्यार्थी आज त्यांच्यामुळे शिकले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सरांचा खूप आधार वाटतो. आज खेडी आणि शहर यांच्यात अंतर पडत चाललं आहे. प्रश्नही वेगवेगळे आहेत. शहरात येणारी माणसं खेड्यातील वाईट गोष्टीची चर्चा करतात पण आपणही मूळचे खेड्यातील आहोत हे विसरतात. खेड्याला दोष देण्यापेक्षा खेड्यात काय करता येईल याचा विचार करणाऱ्या माणसांची गरज आहे.शहरात जाऊन शहरातीलच होणारे लोक खेड्यासाठी काय करणार आहेत हाच खरा प्रश्न आहे. फीसाठी पैसे नाहीत म्हणून शिक्षण अर्ध्यावर सोडून जाणारी गावाकडं जाणारी मुलं आसपास असतात पण ती दिसत नाहीत.सुनील चव्हाण यांच्यासारख्या माणूस शहरात येतो पण स्वतःची मूळ विसरत नाही. सुट्टीच्या दिवशी माथेरान,महाबळेश्वरला गेले नाहीत तर पुस्तकाच्या थैल्या घेऊन जिथं पुस्तक पोहोचली नाहीत तिथं गेले. गेली १५ वर्षे हेच काम सुरू आहे.
साभार संपत मोरे
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
या तरुणाने वाचवली बुलेट(Royal Enfield) कंपनी इतिहास जमा होण्यापासून…