महाराजसाहेब ,
आपल्या चरणासी विनम्रतापूर्वक मुजरा…
महाराज, खरे तर पत्र लिहुन आपल्याला त्रास द्यायची अजिबात इच्छा नव्हती,पण साडेतिनशे वर्षानंतर सुद्धा आम्हाला तुमच्या शिवाय दुसरा आधारच नाही. त्यामुळे नाइलाजाने हा पत्रप्रपंच करावा लागला..
महाराज, प्रतिगामी तुम्हाला ‘हिंदुत्ववादी’ म्हणुन स्विकारतात तर पुरोगामी तुम्हाला ‘धर्मनिरपेक्ष राजा’ मानतात. पण राजे, तुम्ही एक आदर्श पुत्र,पती,पिता आणि माणुस होतात हे मात्र कोणत्याच वर्गात शिकवले जात नाही..
महाराज,जास्त त्रास देत नाही फक्त मागील आठ दिवसात तुमच्या महाराष्ट्रात घडलेल्या चार घटना तुम्हाला सांगतो,मग आपणच ठरवा कि तुमच्या राज्याची आज काय अवस्था आहे..
१. बायकोचे व आईचे पटत नाही म्हणून काल अहमदनगर मध्ये एका मुलाने चक्क जन्मदात्या आईला जिवंतपणी स्मशानभूमीत आणून सोडले… राजे,अहो आईच्या स्वप्नासाठी तुम्ही स्वराज्य उभे केले होते आणि तुमचे नाव घेणारी आमची ही पोरे बघा..
२. सलग पाच ही मुलीच झाल्या म्हणून सोलापुरला एका नवर्याने बायकोच्याच गळ्यावर कोयता फिरवला. बिचारी जागेवर मेली-नवरा तुरुंगात गेला,पण राजे,प्रश्न हाच उरलाय की त्या पाच निरागस अनाथ मुलींचे पुढे काय??
३. बेलवड़ीच्या गढ़ीवरचे तुमचे शिल्प आम्ही जगाला अभिमानाने दाखवतो आणि सांगतो “हे आमचे राजे होते,ज्यांनी परस्रीकड़े वाईट नजरेने पाहिले म्हणून बायकोच्या सख्या भावाचेसुद्धा डोळे काढले” पण राजे,परवा कल्याणमध्ये स्वताच्या मतिमंद मुलीवर जन्मदात्या बापाने सलग दोन वर्ष बलात्कार केला व तिची हत्या केली.. याचे काय करावे?
४. “रयत तर लेकरासारखी,तिला लेकरासारखेच जपावे”असा स्पष्ट आदेश आपला अधिकार्यांना असायचा पण राजे,काल आमच्याकडे सांगलीत वेगळेच घडले.जनतेचे रक्षक म्हणवणार्या पोलीसांनीच एका निरपराधाची हत्या केली आणि परस्पर प्रेत सुद्धा जाळुन टाकले..वाह रे रक्षक!!..
राजे,खरे सांगू “ तुमच्या पुतळ्यांना डोक्यावर घेतले आणि विचारांना पायदळी तुडवले म्हणून आमची आज हि अवस्था झालीय”
शहीद झालेल्या पतीच्या पावलावर चालत लष्करात भरती होणारी “स्वाती महाडिक” सारखी एखादी वाघिण आम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. पण राजे,एखाद्या ठिगळानी आता काही होणार नाही, इथे सारे आभाळच फाटलेय…
राजे फक्त एवढीच विनंती आहे कि माॅसाहेबाना यातले काही सांगु नका, नाहीतर त्यांच्या काळजाला खुप वेदना होतील.. त्यांच्यासारखी एखादी माता पुन्हा जन्माला आली तरच ठिक नाहीतर महाराष्ट्राच्या नशिबी पुन्हा आधुनिक मोगलाई आहेच…
आपलाच
यशवंत गोसावी
पत्र आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
शिवाजीमहाराज आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत असताना अस्सल राजस्थानी पत्रव्यव्हाराचे मराठी भाषांतर
पटल पत्र. मनाला लागलंं खुप.