Tuesday, February 7, 2023
  • Login
Khaas Re
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
  • Home
  • बातम्या
  • नवीन खासरे
  • प्रेरणादायी
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • जीवनशैली
  • Privacy Policy
  • About Us
No Result
View All Result
Khaas Re
No Result
View All Result

जाणुन घ्या गावगुंडांचा कर्दनकाळ बोरगावचा ढाण्या वाघ बापु बिरु वाटेगावकर उर्फ आप्पा यांना…

khaasre by khaasre
November 10, 2017
in प्रेरणादायी
2
जाणुन घ्या गावगुंडांचा कर्दनकाळ बोरगावचा ढाण्या वाघ बापु बिरु वाटेगावकर उर्फ आप्पा यांना…

बापू बिरू वाटेगावकर ऊर्फ आप्पा. वय शंभरीपार. तब्येत अजूनही ठणठणीत. बुद्धी अजूनही तल्लख. वागण्या-बोलण्यातही तीच तडफ, तोच आब. काही दिवसांपूर्वी त्यांच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली. आधी डॉक्टर म्हणाले, वयोमानपरत्वे शक्य होणार नाही. आप्पा म्हणाले, काही घाबरू नका. काही होणार नाही, आप्पाचं सगळंच कसं अद्भुत नि अलौकिक…

‘रंग्या शिंदेंची बोरगावात गँग हुती. त्या गँगच्या जिवावर रंग्या लय मातलं वतं. कोंबडं घावदे न्हायतर बोकड, बिन पैसे देता घेऊन जायचं. पैसे मागितलं तर मार द्यायचं. खलास करीन म्हणायचं. गावातल्या आया-बहिणींवर त्येची वाईट नजर हुती. त्याला बघितला तरी, माझं रगात तापत हुतं. असला नराधम जिवंत ठवून चालायचा न्हाय, असं वाटायचं. गावातलं पुढारीबी त्याला भेत हुतं. मग म्याच शेवटी त्याला संपवला. तवापसन म्या ठरवलं, आता इथनं पुढं याच रस्त्यानं आपुन जायाचं. जो गरिबांना त्रास दिलं, त्याला संपवायचा. जेला कुणी नाही, त्याला आपुन हुयाच. माणसं आजबी भेटली तरी रडत्यात, पाया पडतात…

चित्रपट, तमाशा आणि पोवाडा या माध्यमातून दखल घेतलेले आणि बोरगावचे ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर (आप्पा) सांगत होते.

मी बापू आप्पांना यापूर्वी चार वेळा पाहिले होते. सांगली जिल्ह्यातील विटा येथे त्यांच्या उपस्थितीत एका सभा झाली होती. त्या सभेतलं त्यांचं अाध्यात्मिक भाषण मी ऐकलेलं. त्यानंतर खटाव तालुक्यातील मायणी या गावात गेलो होतो. मायणीच्या चौकात गर्दी होती. गर्दीजवळ गेलो तर तिथं बापू बिरू वाटेगावकर आले होते. त्या भागात एका लग्नाच्या निमित्ताने ते आले होते. गर्दीतील लोक त्यांच्या पाया पडत होते. आप्पा लोकांशी बोलत होते. त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेक जण जवळ जात होते. गरिबांना सुखी जीवन जगता यावं म्हणून स्वतःला दुःखाच्या खाईत लोटून दिलेला, संसारावर तुळशीपत्र ठेवलेल्या एका खऱ्याखुऱ्या नायकाला लोक सलाम करत होते.जे पाय अन्यायाच्या विरोधात धावून गेले होते, मैलोनमैल काट्याकुट्यातून चालले होते, त्या पायावर माणसं डोकं टेकवत होती. कृष्णाकाठचा वाघ साक्षात समोर उभा होता…

बापूंचं गाव वाळवा तालुक्यातील बोरगाव. याच गावातल्या एका गरीब कुटुंबातला बापूंचा जन्म. लहानपणापासून कुस्तीची आवड. गरीब माणसांविषयी विलक्षण कळवळासुद्धा. याच बोरगावात रंगा शिंदे गोरगरिबांना त्रास देत होता. गावातील स्त्रियांची भर रस्त्यात छेड काढत होता. लोक घाबरत आहेत, म्हटल्यावर रंग्या दिवसेंदिवस उर्मट बनत चालला होता. बापू रंग्याच्या दंडेलीला चिडून होते. गावातील पुढाऱ्यांनी बापूला रंग्याचा बंदोबस्त करायला सांगितले. एक दिवस ओव्याच्या कार्यक्रमात बापूंनी रंगा शिंदेला संपवला. रंग्याच्या भावाने रक्ताचा टिळा लावून ‘बापूला खलास करेन’ असा पण केला. बापूंच्या कानावर ही बातमी आल्यावर बापू आणि त्यांच्या साथीदारांनी त्या भावाचाही कायमस्वरूपी बंदोबस्त केला. त्यानंतर त्याच्या मामालाही यमसदनी पाठवले.

गरिबांना न्याय मिळावा यासाठी बापूंच्या हातून तब्बल बारा खून झाले. बापू पंचवीस वर्षे फरार राहिले. पोलिसांनी बापूंच्या घरच्या लोकांना खूप त्रास दिला, छळ केला. बापूंनी पोलिसांच्या स्वाधीन व्हावे, म्हणून खूप प्रयत्न झाले, पण बापू मात्र सह्याद्रीच्या डोंगररांगा, उसाची शेते, दुष्काळी भागातील आडवळणी गावात राहिले…

या सगळ्या थरारक गोष्टी बापूंच्या जवळ बसून मी ऐकत होतो. बापू सांगतात, ‘घर तर कायमचं सुटलं होतं. लोकांच्या बळावर इथून पुढचं दिवस काढायचं होतं. पहिली गोष्ट म्हंजी, आम्ही चोरी, दरोडा या गोष्टींपासून खूप लांब होतो. या गोष्टी आयुष्यात कधीच जवळ येऊ द्यायच्या नाहीत, असं पक्क केलं होतं. परस्त्री आम्हाला आई-बहिणीप्रमाणे होती. आमच्याकडे जी माणसं होती त्यात दारू पिणारं एकबी नव्हतं. दारू पेणार कोण असलं, तर त्याला थापडी लावून बाहेर घालवत होतो. आमचं सगळं आयुष्य लोकांच्या मायेमुळं पार पडलं. लोकांनी लय लळा लावला, काही आया-बहिणी एकट्या भाकरी घेऊन यायच्या. गावोगावी अशा जीव लावणाऱ्या बहिणी मिळाल्या.’

‘गरीब माणसं विश्वासू असतात. ती तुमच्याशी दगाफटका करत नाहीत. मला ज्यांनी सांभाळलं, ती गरीब माणसं होती, मला पकडून देऊन पैसे मिळवावं असं कोणालाही वाटलं नाही. उलट त्यांनी आमच्यावर आलेलं संकट दूर केलं. एकदा तर पोलिस आम्ही रहात हुतो, त्या उसाच्या जवळ आले होते. एका गुराखी पोरानं पोलिसांना उलटा रस्ता दाखवला. त्या पोरानं नुसत बोटाने खुणवले असते, तरी आम्ही सापडलो असतो. पण त्या पोरानं तसं केलं न्हाय. त्येला माहिती हुतं बापू गरिबांचा आधार हाय. त्येला जपलं पायजे,’ बापंूनी एक प्रसंग सांगितला…

‘एखाद्याच्या लेकीला सासरचा छळ असायचा. लग्नात हुंडा, मानपान केला नाही म्हणून पोरीला नवरा, सासू, सासरा लय ताप द्यायची. मारहाण करायची, उपाशी ठेवायची, मग पोरीच्या बापाला कोणीतरी सांगायचं, बापूला भेट. मग तो यायचा. रडत सांगायचा. आम्ही पोरीच्या सासरला रात्री जाऊन भेटायचो. माझं नाव त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं असायचं. मी सांगायचो, पोरगीला छळू नका न्हायतर गाठ माझ्याशी आहे. त्यानंतर त्या पोरीचा छळ बंद व्हायचा. तिचं नांदणं लागायचं. अशा कितीतरी पोरींचा छळ आमच्यामुळं बंद झाला. पोरींचा छळ झाल्यावर माणसं पोलिस खात्याकडं न जाता आमच्याकडं यायची.

‘एका गावात धाकट्या भावाला थोरला भाऊ आणि वडील जमीन वाटप करून देत नव्हते. त्यानं वाटून मागितलं की अंगावर धावून यायचे. मग तो भाऊ मला येऊन भेटला. रडायला लागला. मी त्याच्यासोबत गेलो आणि त्याच्या भावाला आणि बापाला दारात जाऊन सांगितलं, ‘मला वळखलं असशील? आता फक्त तोंडी सांगायला आलोय. पुन्हा आमचा हेलपाटा करू नकोस’ आम्ही तिथून हाललो आणि त्याच दिवशी बापाने त्या पोराला जमीन वाटून दिली.

> बापूआप्पांची कथनशैली अशी की, सगळा प्रसंग जिवंत उभा
करत होते. मी त्यांना विचारले, ‘तुम्ही पहिल्यादा एकटेच बाहेर पडला नंतर तुम्हाला जे जिवाभावाचे साथीदार मिळाले. ते तुमच्याकडे कसे आले? तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून लगेच सहभागी करून घेतलं?’
‘माझ्याकडं आलेला प्रत्येकजण काही अडचणीपायी आलेला हुता. कोणावर गावगुंडांनी अन्याय केला हुता. कोणाची जमीन भावकीतल्या बड्याने लाटली वती. कोणाच्या बहिणीवर अन्याय झाला हुता. प्रत्येकजण पीडित हुता. अशी पोरं माझ्याकडं आली. आम्ही सगळी एका जिवांन राहिलो.

बापू त्यांच्या काही तत्त्वावर आयुष्यभर ठाम राहिले. त्यांनी जे नियम बनवले होते, ते मोडले तर शिक्षा ठरलेली असायची. त्यात कोणाची दयामाया करत नव्हते. त्यांच्या मुलाने काही चुका केल्या, तेव्हा त्या मुलालाही त्यांनी मारले. त्याचीही गय केली नाही. ‘बापू बिरूचा नियम सगळ्यांना सारखा, मग तो कोणीही असो’ हे त्यांनी सिद्ध केलं. ते म्हणतात, ‘मुलगा माझा लाडका होता हे खरं हाय. पण आम्ही जी माणसं मारली तिबी कुणाची तरी लाडकी हुतीच की, मग आपल्या मुलाला का वेगळी वागणूक द्याची. त्यो चुकला त्याला शासन केलं.’

संपत मोरे व बापू बिरू वाटेगावकर

> ‘आप्पा, तुम्ही पोलिसांना इतके दिवस कसे सापडला नाही?’
‘आम्ही कधीही गावात राहत नव्हतो. रानामाळात, शिवारात राहत होतो. त्याच्याकडं जेवायला जायचो, त्याला कधीही अगोदर सांगत नव्हतो. अचानक जायचो आणि असलं ते वाढा म्हणायचो. अगोदर सांगून जर गेलो असतो, तर नक्कीच दगाफटका झाला असता. दुसरं म्हणजे, जिथं जेवायचो तिथं कधी मुक्काम केला नाही. काही वेळा मुक्काम केल्यावर कसंतरी वाटायचं, मग रातोरात ती जागा सोडायचो.’

पंचवीस वर्षे भूमिगत अवस्थेत राहिलेल्या आप्पांना पोलिसांनी एक दिवस पकडलं. त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षेनंतर ते बाहेर आले. बाहेर आल्यावर त्यांनी ठरवलं, लोकांचं प्रबोधन करायचं. मग ते गावोगावी प्रवचनासाठी जाऊ लागले. त्यांचा अाध्यात्मिक अभ्यास होता. भूमिगत असताना त्यांनी एक गुरू केला होता. तेव्हापासून ते अाध्यात्मिक मार्गाला वळले होते. आप्पा प्रवचनकार म्हणून जायचे, तेव्हा त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लोकांची गर्दी व्हायची. प्रवचनात आप्पा ‘चांगलं वागा. कोणावर अन्याय करू नका. बायका-माणसांकडे आई-बहिणीच्या नात्याने वागा’ असं सांगायचे.

गेल्या चार वर्षांपासून बापूंंना गुडघेदुखीचा आजार झाला. त्यांना चालता येत नव्हते. त्यामुळे ते बाहेर फिरायचे बंद झाले. गेल्या आठवड्यात त्यांच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. एवढ्या म्हातारपणी शक्यतो, शत्रक्रिया केली जात नाही, पण बापूंची प्रकृती चांगली असल्याने केली आहे. आता या शस्त्रक्रियेनंतर बापू बिरू नावाचं वादळ पुन्हा एकदा लोकांच्या भेटीला, त्यांच्याशी सवांद करायला येणार आहे. आता गावोगावच्या सभामंडपात बापू आप्पांची प्रवचने सुरू होणार आहेत. एखाद्या खेड्यात आलेले आप्पा आणि त्यांना पाहायला आलेली गर्दी हे चित्र पाहायला मिळणार आहे…

संपत मोरे लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५
सदर लेख या अगोदर दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत प्रसिध्द झाला आहे. लेखकाच्या परवानगीने हा लेख खासरेवर घेण्यात आला आहे.

Loading...
Tags: bapu biru
Previous Post

आर. आर. आबा यांच्याविषयी माहिती नसलेली गोष्ट…

Next Post

ब्लेडमध्ये असणाऱ्या डिझाईनचे रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल…

Next Post
Blade

ब्लेडमध्ये असणाऱ्या डिझाईनचे रहस्य ऐकून तुम्ही थक्क व्हाल…

Comments 2

  1. Bhaskar jadhav says:
    5 years ago

    God of needy and affected people.SaluteTo to Bapu

    Reply
  2. Ashish manikrao Patil says:
    5 years ago

    बोरगावचा ढाण्या वाघ

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हे देखील वाचा

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

सरसेनापती हंबीरराव सिनेमातलं बहुप्रतीक्षित गाणं प्रेक्षकांच्या भेटीला..!

May 24, 2022
Software Development Companies in USA

Software Development Companies in USA

April 27, 2022
सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

सैन्यदलाची ही पद्धत अवलंबली तर २ मिनिटात येईल झोप

December 21, 2021
गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

गुलाबराव पाटलांनी गालांबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य, थेट हेमा मालिनींनी दिलं मिश्किल उत्तर

December 20, 2021
एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

एकेकाळी शुल्लक पैशांसाठी तरसणारे हे ७ क्रिकेटपटू आज करोडोंमध्ये खेळतात, बघा लिस्ट

December 20, 2021
शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

शेअर बाजारात अवघ्या काही मिनिटात झाले १० लाख कोटींचे नुकसान, ‘हे’ आहे मोठे कारण

December 20, 2021
Load More

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • About Us
  • About Us
  • Advertise
  • All Articles
  • Archive
  • Blog
  • Contact Us
  • Contacts
  • Easy Sharing
  • Home
  • Infinite Scroll
  • Our Team
  • Overlay Header
  • Portfolio
  • Privacy Policy
  • Services
  • Sorted by Topics

© 2021 Website Design: Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In