आपला मुलगा-मुलगी डॉक्टर इंजिनीअर व्हावी हे जवळपास प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते. मुलामुलींनी चांगले शिकून त्यांना चांगली नोकरी मिळाली पाहिजे असं प्रत्येक पालकांना वाटते. बऱ्याच पालकांचे हे स्वप्न पूर्णही होते पण काही पालक परिस्थितीमुळे आपल्या मुलामुलींना चांगले शिक्षण देण्यास असमर्थ असतात. शिक्षणामध्ये वाढत चाललेली स्पर्धा, भरमसाठ फिसवाढ अशा अनेक गोष्टी सर्वसामान्य घरातील मुलामुलींना शिक्षणापासून वंचित राहण्याचे कारण बनत आहेत. शिक्षणाचा एकप्रकारे बाजार झाला आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
पण या सर्व गोष्टींवर मात करत एका धुणीभांडी करणाऱ्या व भाजीपाला विकणाऱ्या महिलेने आपल्या मुलीला डॉक्टर बनवून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. या महिलेचा मुलगाही आपल्या बहिणीसाठी भाजीपाला विकून मदत करतो. या अभिमानास्पद कामगिरीमुळे या मायलेकी पूर्ण शहरासाठी रोल मॉडेल बनल्या आहेत.
मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी आईने केली लोकांची धुणीभांडी-
या आदर्श आईचे नाव आहे सुमित्रा. सुमित्रा या हमीपुरच्या मौदहा परिसरात आपल्या कुटूंबियासह राहतात. सुमित्रा यांच्या कुटुंबामध्ये एकूण 6 सदस्य आहेत. त्यामध्ये त्यांची 2 मुले व 3 मुलींचा समावेश आहे. त्यांच्या पतींचे 12 वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर पूर्ण मुलामुलींची जबाबदारी एकट्या सुमित्रा यांच्या खांद्यावर आली.
सुमित्रा यांची मोठी मुलगी अनिता ही लहानपणीपासून अभ्यासात फार हुशार होती. तिचे डॉक्टर बनायचे स्वप्न होते. सुमित्रा याना वाटायचे की मी शिकलेली नाहीये तर मुलींना तरी शिकवावे. त्यात अनिता हुशार असल्याने त्यांनी तिला पुढे शिकवण्याचा निर्णय घेतला. अनीतानेही आईच्या विश्वासास पात्र ठरत कॉलेजमध्ये पहिला क्रमांक पटकावला. यानंतर सुमित्रा यांनी तिला कानपूरला मेडिकल एंट्रान्सच्या तयारीसाठी पाठवले.
अनिताने तिथे एक वर्षभर चिकाटीने अभ्यास केला आणि मेडिकल एंट्रान्समध्ये यश प्राप्त केले. तिने या एंट्रान्समध्ये 682 वि रँक मिळवली होती. यामुळे तिला सैफई मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. अनिताने नुकतेच MBBS चे 4 वर्ष पूर्ण केली आहेत. अनिता आता प्रॅक्टिस करत असून ती पुढच्या वर्षी डॉक्टर बनून सैफई कॉलेजमधून बाहेर पडेल.
सुमित्रा यांनी अनिताच्या शिक्षणासाठी मोठा त्याग केला आहे. अनिता म्हणाली की, ‘ आईने माझ्यासाठी लोकांची धुणीभांडी केली आहेत, बसस्टँडवर पाणी विकले आहे. कगुप कष्ट करून मला शिकवले आहे. घरखर्च भागवण्यासाठी नंतर आईने भाजीपालाही विकला आहे. पै पै पैसे जमा करून मला शिकवले आहे.’ या सर्व परिस्थितीमध्ये अनिताचे जेव्हा सिलेक्शन झाले तेव्हा सुमित्रा या रात्रभर रडल्या होत्या. ते आनंदाचे अश्रू होते.
शिक्षणादरम्यान अनितानेही अनेक अडचणींचा सामना केला. तिने शाळेबाहेर चिंचाही विकल्या आहेत. चिंचा विकून पुस्तके घेतल्याचे अनिता सांगते.
गरिबांना देणार मोफत उपचार-
अनिताच्या वडिलांचा आजारपणामूळे मृत्यू झाला होता. सुमित्रा यांच्याकडे त्यांच्या पतीचा उपचार करण्यास पैसे नव्हते. चांगल्या उपचाराअभावी त्यांच्या पतीची तब्येत ढासळत गेली व त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासूनच अनिताने डॉक्टर बनण्याचे ठरवले होते. अनिताला आता अशा परिस्थितीपुढे हतबल गरजूंना मदत करायची आहे. केवळ पैसे नाहीत म्हणून ज्या लोकांना दवाखान्यात उपचार घेता येत नाहीत अशा लोकांसाठी अनिता मोफत उपचार देणार आहे.
सुमित्रा यांच्या कुटुंबियांना अनेकदा उपाशी राहून रात्र काढावी लागली आहे. सुमित्रा यांचा मुलीला डॉक्टर बनवण्यासाठीचा संघर्ष प्रत्येक पालकांना आदर्श देणारा आहे. त्यांनी खूप मेहनतीने पैसे जमा करून अनिताचे शिक्षण पूर्ण केले आहे. सुमित्रा या आपल्या छोट्या मुलीलाही डॉक्टर बनवू इच्छितात. तिलाही मेडिकल एंट्रान्सच्या तयारीसाठी कानपूरला पाठवले आहे.
सुमित्रा यांच्या या संघर्षमय प्रवासास खासरेकडून सलाम.लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा: अवघ्या 16 व्या वर्षी डॉक्टर, 22 व्या वर्षी आयएएस, आता देतात गरीब विद्यार्थ्यांना एमपीएससी चे मोफत शिक्षण
Comments 1