एन. डी . पाटील यांना नांदेडला जायचं होत. मी आणि त्यांच्या गाडीचा चालक परशुराम त्यांना सोडण्यासाठी सी. एस.टी. रेल्वेस्थानकावर गेलो होतो. ते गाडीतून खाली उतरले. परशुरामन त्यांची सुटकेस घेतली .आम्ही दोघे त्यांना सोडायला प्लॅटफॉर्मवर निघालो.आम्ही प्रवेशद्वारापर्यंत गेल्यावर त्यांनी त्यांची सुटकेस परशुरामकडून घेतली आणि म्हणाले.
मुलानो तुम्ही आत येवू नका.तुमच्याकड प्लॅटफॉर्मच तिकीट नाही आणि आता काढायलाही वेळ लागेल. तुम्ही विनातिकीट आत आला तर टी. सी.पकडेल तुम्ही जा इथून परत, अहो,पण तुम्हाला चालता येत नाही. आम्ही सोबत येतो, गाडीत बसवून लगेच येतो आम्ही परत असे मी त्यांना म्हणालो.
नाही रे मी जाईन व्यवस्थित, तुम्ही काळजी करू नका. असे म्हणून ते आत गेलेसुद्धा त्यांच्या पायाचे ऑपरेशन झाले होते. त्यांना लंगडत चालावे लागते म्हणून आम्हाला वाटत होते आपण त्यांना गाडीत बसवून यावे. पण त्यांनी आम्हाला कायदा मोडून दिला नाही. शिस्त शिकवली.
महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री असणारे एन. डी. पाटील महाराष्ट्रातील कष्टकरी बांधवाचे कैवारी त्यांच्यासोबतचा हा एक प्रसंग आहे. आजकाल पोलिसांनी जर गाडी अडवली तर लगेच ‘मी अमुक नेत्यांचा कार्यकर्ता आहे’ अस सांगितलं जातं. पोलीस सोडत नसतील तर वाद घातला जातो. नेत्याला फोन लावून पोलिसाच्या कानाला लावला जातो.
या सगळ्या पाश्वभूमीवर मला मात्र कायदा पाळायला शिकवणारे महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री एन डी पाटील आठवतात. मी विचार करू लागलो असं का घडतय? तेव्हा मला कुठेतरी वाचलेलं वाक्य आठवलं जेव्हा मोठ्या माणसांच्या सावल्या लहान पडतात आणि लहान माणसांच्या सावल्या मोठया पडतात तेव्हा असच काहीतरी घडत.उसापेक्षा शेवरी मोठी झालीय दुसर काय?
संपत मोरे 9422742925