लोकशाहीमुळे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात भारतामध्ये वाव आहे. लोकशाहीचा पुरेपुर फायदा उठवत दुर्लक्षित घटक तृतीयपंथीय आज काल प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. राज्यातील सरपंचाची निवडणूक ग्रामपंचायत सदस्यांऐवजी थेट जनतेतून करण्याचा निर्णय याच वर्षी राज्य सरकारने घेतला. या अगोदर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड होत असे. या निर्णयामुळे गावातील राजकारणाला एक वेगळे वळण मिळाले असून याचा खरा लाभ समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांना होताना दिसत आहे. याच निर्णयामुळे दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूक खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरली आहे. कारण माळशिरस तालुक्यातील तरंगफळ गावात चक्क तृतीयपंथी सरपंचपदी विराजमान झाला आहे.
जाणून घेऊया खासरेवर भारतातील पहिले तृतीयपंथी सरपंच ज्ञानेश्वर कांबळे उर्फ माऊली यांचा जीवनप्रवास
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यापासून 12 किमी अंतरावर 3000 लोकसंख्येचे तरंगफळ हे डोंगर, दऱ्यात वसलेलं गाव आहे. गावात ग्रामपंचायतची स्थापना 1972 साली झाली, यामध्ये गावात 3 प्रभाग बनवण्यात आले. या ग्रामपंचायतची सदस्यसंख्या 9 आहे. यंदा झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये गावातील लोकांनी ऐतिहासिक निकाल देत तृतीयपंथी ज्ञानेश्वर कांबळे यांना सरपंचपदी विराजमान केले आहे. तरंगफळमध्ये एकूण 1850 मतदार आहेत. ज्ञानेश्वर कांबळे उर्फ माऊली माय यांच्या विरोधात एकूण सहा उमेदवारांनी आपले नशीब अजमावले. सर्वाना पराभवाचा जोरदार धक्का देत माउलींनी त्यांच्या विरोधात उभा राहिलेल्या 5 जणांचे डिपॉझिटच जप्त करण्याचा पराक्रम केला आहे. माऊली यांनी 860 मते मिळवत आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांवर 167 मतांनी विजय मिळवला आहे.
अत्यंत गरीब, उपेक्षित मातंग समाजात कुटुंबात माऊलींचा जन्म झाला. ज्ञानेश्वर शंकर कांबळे असे त्यांचे संपूर्ण नाव. लहानपणी माऊलींच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांनी आपले सातवीपर्यंत चे शिक्षण पूर्ण केलेले आहे. वडील शंकर मुकुंदा कांबळे हे अत्यंत तुटपुंज्या मिळकतीवर आपले कुटुंब चालवत असत. त्यांच्या वडिलोपार्जित 10 एकर जमिनीतून ते आपल्या कुटुंबातील पत्नीसह 5 मुले व एक मुलीचं पालन करत. कधी कधीतर कुटुंबावर उपासमारीची वेळही येत असे. पोटभर जेवन मिळावे म्हणून शंकर कांबळे यांनी आपल्या पोरा बाळांना घेऊन इतरांच्या शेतातही मजुरीचे काम केले आहे. ज्ञानेश्वर हे शंकर कांबळे यांचे थोरले चिरंजीव. ज्ञानेश्वर यांचा जन्म एक मुलगा म्हणूनच झालेला, पण शाळेत असतानाच त्यांच्या वागणूक व चालणे, बोलणे बाईकीच होतं. त्यामुळे साहजिकच त्यांना चिडवण्यात येत होते.
तृतीयपंथी असल्याचे गुणधर्म ही ज्ञानेश्वर याना जाणवत होते. त्यांना ही वयात आल्यावर ते मुलगा नाही तर मुलगी असल्याचे जाणवत होतं. त्यातच त्यांच्या घरात रेणुकामातेच्या सेवभक्तीचं वातावरण असल्यानं छोट्या वयातच माऊलींनाही रेणुकामातेच्या भक्तीची ओढ लागली. त्यांच्या आत्या पारुबाई पूर्वी रेणुकामातेशी लग्न करून देवदासी झाली होती. त्यामुळे ज्ञानेश्वर यांनी ही लग्न व संसार न करता आपल्या आत्यासारखे रेणुकामातेशी लग्न करून सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यांना घरून यासाठी फार विरोध झाला पण त्यांनी घरच्यांच्या विरोधाला धुडकावून घर सोडण्याचा निर्णय घेतला. वयाच्या पंधराव्या वर्षीच ज्ञानेश्वर यांनी आपले घर सोडले. कर्नाटकातील सौन्दतीला ईथे त्यांनी रेणुकामातेचशी लग्न केले. गळ्यात पांढरी गारगोटीसारखी मोत्यांची माळ घालून रीतसर साडी नेसत त्यांनी तृतीयपंथी असल्याचा शिक्का मारून घेलता आणि त्यांचा वनवास सुरू झाला.
त्याना आता नवीन ओळख मिळाली आहे ती म्हणजे माऊली माय. त्यांच्या भूतकाळाविषयी माऊली सांगतात की, घरातून बाहेर पडले आणि घरदार विसरून गावागावात भटकू लागले. सोबत इतर 2-3 तृतीयपंथी ही जोडले गेले होतेच. घरोघरी रेणुकामातेच्या नावाने जोगवा मागणं सुरू झालं. देवीची विशिष्ट लयीत गाणे गाताना नृत्य ही केले जायचे. मी नृत्यात आणि गाण्यात पारंगत झाले. बारामती इंदापूर फलटण आशा वेगवेगळ्या तालुक्यातील गावे पालथी करताना म्हातारी माणसे भेटायची. माया लावायची. पण घरची आठवण यायचीच. 12 वर्षे घराबाहेर काढली खरी पण आईवडिलांची आठवण काही स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांच्या आठवणीनं काळीज भरून यायचं. शेवटी ती ओढच मला परत घरी घेऊन आली.
तृतीयपंथी असूनही माउलींना घरच्यांनी स्वीकारलं होतं. जसं जसं माऊलींचं वय वाढत गेलं तसं माऊलींच आयुष्य एका वेगळ्या दिशेने पुढे गेले. त्यांना तृतीयपंथीयांचं गुरुपद मिळालं. त्यातून त्यांना गुरुदक्षिणा मिळण्यास सुरुवात झाली. त्यांच्या घरातच देवीचा दरबार भरण्यास सुरुवात झाली. शिष्य व भक्तांकडून यथाशक्ती दान दक्षिणा मिळू लागली. यातून त्यांच्या अंगावर सोन्याचे दागिने वाढत गेले. त्यांचं पूर्वीच राहतं घर सरकारच्या योजनेतून मिळालं होतं. त्यांनी पुढे त्याचा छानपैकी विस्तार करून बंगल्याचे स्वरूप दिले. माऊलींकडे 2 मोटारी आहेत, ज्या की त्यांना दान रूपाने मिळाल्या आहेत.
देविमातेची सेवा करताना त्यांना गावाचा ,समाजाचा विकास करण्याचे वेध लागले. त्यांनी गरिबांसाठी कामे करण्यास सुरुवात केली. गावात विविध योजनांची माहिती तळागाळातील घटकांना मिळवून देऊन त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम गावामध्ये राबवण्यास सुरुवात केली. गोरगरीब स्त्रियांना आधारकार्ड मिळवून देणे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ मदत योजना यांसारख्या शासकिय योजनांचा लाभ त्यांनी अनेक लोकांना मिळवून दिला. यामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकी निर्माण झाली व त्यांच्या बद्दलचा दृष्टिकोन बदलत गेला.
त्यांच्या घरातील व्यक्तींचा अगोदर पासूनच राजकारणाशी संबंध होता. पाच वर्षांपूर्वी त्यांच्याच घरातील सखुबाई कांबळे यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. यावर्षी होणारी सरपंचपदाची थेट निवड ज्ञानेश्वर यांच्यासाठी लॉटरीच ठरली. कारण गावचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव होतं.गावातील लोकांनी ज्ञानेश्वर यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यांचा भाऊ लाला कांबळे सुरुवातीला निवडणूक लढवेल असे वाटत असतानाच अचानक माउलींनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आणि सारे जण अवाक झाले.
त्यांनी आपल्या निर्णयांवर ठाम राहत निवडणूक लढवली. सुरुवातीला त्यांना विरोधही झाला. सरपंच पदासाठी त्यांच्या विरोधात 14 उमेदवार उभे राहिले, त्यातल्या 7 उमेदवारांनी माघारही घेतली. आपल्या कामामुळे ओळख निर्माण केलेल्या माऊलींच्या उमेदवारीवर गावकऱ्यांनीही शिक्कामोर्तब केले. तृतीयपंथी म्हणून त्यांच्या पॅनेलची खिल्ली उडवली गेली पण त्यांनी ताकदीनं व विश्वासानं प्रचार केला. तृतीयपंथी असले तरी माऊली गावाचा विकास करून आदर्श गाव बनवतील असा विश्वास पॅनेलप्रमुख सुरेश तरंगे यांनी दिला. लोकांनीही यावर विश्वास ठेवत ज्ञानेश्वर कांबळे यांना भरघोस मतांनी निवडून दिले. एका तृतीयपंथी कडून पराभूत झाल्याने विरोधकांच्या मानाही खाली गेल्या. एक तृतीयपंथी सरपंच निवडून आल्याने गावाचे नाव संपूर्ण देशभरात पोहचले. समाजात होणाऱ्या या मानसिक बदलाचं खरच कौतुक झाले पाहिजे.
तुम्हाला ही माहिती आवडल्यास कंमेंट करा, शेअर करा आणि पेज अवश्य लाईक करा.
वाचा: 22 वर्षीय दिव्यांग तरुण बनला गावचा थेट सरपंच..
वाचा: विक्सच्या जाहिराती मधील तृतीयपंथी आई गौरी सावंतची सत्य घटना….
वाचा ज्या कोर्ट समोर मागायची भिक तिथेच झाली जज, भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश