विपरित परिस्थितीत अथक परिश्रम घेत शुन्यातून विश्व निर्माण करणारी सामान्य व्यक्तिमत्व जेव्हा असामान्य काम करतात ते काम आपल्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असतं. मला ’हे’ मिळालं नाही. म्हणून मी ’ते’ करू शकलो नाही. असं बोलून परिस्थितीशी झगडण्यापेक्षा पळवाटा काढणं बर्याचदा पसंत केलं जातं.
पळवाटा काढणं हे जर आपल्या प्रश्नाचं सोल्यशून असतं तर आपण आपल्या आयुष्यात नक्कीच यशाचं मोठं शिखर गाठलं असतं. असो, आज आपण विपरित परिस्थितीशी खंबीरपणे झगडणार्या प्रेरणादायी चरित्रांविषयी जाणून घेऊयात, त्यातून आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळेल…
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम(शास्त्रज्ञ)
भारताचे राष्ट्रपती, भारताला अनुउर्जेमध्ये सक्षम बनविणारे व्यक्तिमत्व डॉक्टर अब्दुल कलाम त्यांचे वडील नावाडी होते. विद्यार्थीदशेत असताना ते वर्तमानपत्र विकत होते. विपरित परिस्थितीशी झगडत ते आधी शास्त्रज्ञ नंतर राष्ट्रपती झाले.
शेक्सपिअर(इंग्लिश कवी, नाटककार आणि अभिनेता)
आज शेक्सपिअरला संपूर्ण जग ओळखते. त्यांच्या नाटकाची व लिखाणावर अनेक विद्यापीठ अभ्यास करतात. परंतु त्याचा संघर्ष कोणाला माहिती नसेल. ते खाटीकखान्यात नोकरी करत होते. रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभळता-सांभळता एका नाटककाराचा जन्म झाला. ज्याला जग कधीही विसरू शकत नाही.
ग.दि.माडगूळकर (कवी, कथा-पटकथा-संवादलेखक, अभिनेते)
रोज सकाळी आकाशवाणीवर गीतरामायण एकल्या शिवाय आपला दिवस सुरु होत नाही. ग.दि.माडगूळकर यांनी मॅट्रिक नापास झाल्यावर उदबत्त्या विकल्या. अनवाणी आयुष्य जगले. गीतरामायण लिहिले. त्यांच्या कविता, कथा आजही अतिशय प्रेरणादायी आहेत.
सम्पूर्ण सिंह कालरा उर्फ़ गुलजार(गीतकार, कवी, पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि नाटककार)
गुलजार हे नाव घेतल्या शिवाय हिंदी चित्रपट सृष्टी पूर्ण होत नाही. आनेवाला पल जानेवाला है , मेरा कूछ सामान , तेरे बिना जिया जाये ना या जुन्या सदाबहार गाण्यापासून ते नवीन गाणे सगळी कडे गुलजार दिसणार हे नक्की. फाळणीनंतर ते दिल्लीला आले. मोटार गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. बिमल रॉय यांना भेटले. मोटार गॅरेजमधले आयुष्य फिल्म इंडस्ट्रित आले आणि आज अजरामर झाले.
सुधीर फडके (मराठी आणि हिंदी संगीतकार व गायक)
देहाची तिजोरी आजही सकाळी एकले कि दिवस चांगला जातो. ते सुधीर फडके सुरवातीच्या काळात चहा भाजीचा व्यापार करत होते. प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी वाद्य विकावी लागली. भटकंतीतून त्यांनी सुर शोधला. ते गायक झाले, संगीतकार झाले.
नीळू फुले (अभिनेते)
निळू फुले यांनी रंगविलेल्या भूमिका महाराष्ट्रात आजही जिवंत आहेत. पाटील हा शब्द ऐकताच लोकांना निळू फुले आठवतात. ते पुण्याला कॉलेमध्ये अकरा वर्षे माळी होते. झाडांची निगराणी करता-करता ते राष्ट्रसेवादलाच्या पथकात सामील झाले आणि नटसम्राट निळू फुले महाराष्ट्राला माहीत झाले.
विष्णूपंत छत्रे (मराठी उद्योजक आणि आशियातील पहिले सर्कस मालक)
सर्कस हा प्रकार मराठी माणसां पर्यंत पोहचविणारे विष्णुपंत. सुरवातीच्या काळात घोड्याच्या पागांमध्ये चाबूकस्वार म्हणून तीन रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वतःच स्वताःचा मार्ग शोधला. पुढे जाऊन त्यांनी भारतातील पहिली ग्रेट सर्कस निर्माण केली.
दारा सिंग (कुस्तीपटू, अभिनेता आणि राजकारणी)
पेहलवान म्हणून सुरु केलेला हा त्यांचा प्रवास अभिनेता, राजकारणी इत्यादी पैलू त्यांनी पार पाडले. पंजाबमधल्या एका सामान्य खेड्यात आखाड्यात कुस्ती खेळत होते. रानात गुरं चरायला जात होते. गुरांना सांभाळता-सांभाळता कुस्तीची आवड निर्माण झाली. मग जगभर अनेक कुस्त्या जिंकल्या, चित्रपटात कामे केली, राज्यसभेत खासदार झाले.
एम. एफ. हुसेन (चित्रकार)
जगप्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसेन यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये पंढरपूर येथे झाला. मुंबईच्या फुटपाथवर सिनेमाची पोस्टर्स रंगवली. पुढच्या आयुष्यात त्यांची चित्रे शंभर कोटींना विकली गेली. भारतात चित्रकलेच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला गेला. काही वादात सापडल्यामुळे ते इंग्लंडला स्थायिक झाले होते.
कर्मवीर भाऊराव पाटिल (समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक)
भाऊराव पाटील यांनी लावलेल्या वटवृक्षामुळे आज अनेक लोक शिक्षणाच्या प्रवाहात आले आणि त्यांचे आयुष्य पालटले. परंतु भाऊराव पाटील यांनि सुरवातीच्या काळात कंदिल आणि नांगराचे विक्रेते होते. कंदिल नांगर विकता-विकता त्यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण केली.
खरंच ही प्रेरणादायी चरित्र आपल्या संघर्षमय जीवनाला जगण्याचा नवा धडा आणि नवा उत्साह देतात!
Comments 1