पुढच्या वर्षी पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणूक तिकिटांसाठी तडजोडी आणि गटबाजीचा खेळ सुरु झाला आहे. राज्यात सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेस पक्षातही पुन्हा सत्तेत येण्यासाठी ओढाताण सुरु आहे. याच परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी काही लोक निवडणूक कॅम्पेनिंगसाठी नेत्यांना संपर्क करु लागले आहेत. यातील भुवया उंचावयाला लावणारी बाब म्हणजे, एका गॅंगच्या लोकांनी स्वतःला प्रशांत किशोर आणि त्यांची टीम भासवून चक्क सत्तेत असणाऱ्या काँग्रेस नेत्यांना करोडोंचा चुना लावण्याचा उपद्व्याप करुन ठेवला आहे.
प्रशांत किशोर यांचे नाव देशातील टॉपचे राजकीय रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र त्यांच्या नावाचा गैरफायदा घेऊन पंजाबमधील एक गँग सध्या राजकीय नेत्यांना चुना लावण्याचे उद्योग करत आहे. या गॅंगचे लोक राजकीय नेत्यांना फोन लावून चक्क प्रशांत किशोर यांच्या आवाजात आणि लयीत बोलतात. नंतर तिकीट देणाऱ्या प्रमुख नेत्यांना वाढवून चढवून आकडेवारी असणारा सर्वे देऊन एखाद्या इच्छुकाला कुठल्यातरी पक्षाचे तिकीट देण्याचे आश्वासन देऊन मोठ्या रक्कमेची मागणी करतात. गंमत म्हणजे या गँगने एकाही आमदारालाही यातून सुट्टी दिली नाही.
काँग्रेस नेत्यांना लावला करोडोंचा चुना
प्रशांत किशोर असल्याचे भासवून एक गॅंग मागच्या काही महिन्यांपासून जवळपास ३० ते ४० काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात होती. लुधियाना, भटिंडा, जालंधर, अमृतसर आणि संगरूर भागातील हे नेते आहेत. या नेत्यांना येणाऱ्या विधानसभेच्या तिकिटाचे आणि त्या निवडणुकीत आपली राजकीय रणनीती वापरुन निवडून आणण्याचे स्वप्न दाखवून या गँगच्या लोकांनी त्यांच्याकडून पैसे उकळले. इंडियन एक्सप्रेसमधील बातमीनुसार या डुप्लिकेट प्रशांत किशोर गॅंगने काँग्रेसच्या नेत्यांना जवळपास ५ कोटींचा चुना लावला आहे.
असा लागला या गँगचा तपास
पैशाच्या आशेने या गॅंगच्या लोकांनी आमदार असणाऱ्या कुलदीप सिंह वैद यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी प्रशांत किशोर बनून संपर्क केला. निवडणुकीत त्यांना तिकीट मिळवून देण्यासाठी त्यांच्या बाजूने सर्वे रिपोर्ट देऊ असे त्यांना सांगितले. त्याबदल्यात गिफ्टची मागणी केली. यावरुन आमदार महोदयांना संशय आला. त्यांनी पोलिसांत कळवले. पोलिसांनी सापळा रचून या गँगच्या लोकांना पकडले. या गँगचा सूत्रधार असणाऱ्या व्यक्तीलाही नंतर पकडण्यात आले.
या गँगचा प्रमुख गौरव तिवारी एक जुगारी माणूस आहे. तो दररोज लाखांमध्ये सट्टा खेळतो. प्रशांत किशोर यांना टीव्हीवर पाहून त्याने त्यांच्यासारखं बोलण्याची कला अवगत केली. पुढे त्यांनी आपली गॅंग बनवून लोकांच्या राजकीय महत्वाकांक्षेचा गैरफायदा घेऊन केवळ पंजाबच नाही, तर बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल मधील नेत्यांनाही लुटले.