मित्रांनो जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये सापांची गणना केली जाते. सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला आजूबाजूला सर्व ठिकाणी आढळतील. अन्नाच्या शोधात हे सरपटणारे जीव इकडे-तिकडे भटकत असतात. बर्याच वेळा ते मानवी वस्तीच्या अगदी जवळ येतात आणि कधीकधी मानवांना चावतात देखील. तसं बघायला गेलं तर सगळेच साप विषारी नसतात, पण काही साप चावल्यास माणूस विषबाधेने मृत्युमुखी देखील पडू शकतो. पण विषाची परीक्षा कशाला घ्यायची ? पण समजा साप चावल्याची एखादी घटना घडलीच तर काय करावं आणि काय करु नये हे देखील आपल्याला आधीच माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी शेवटपर्यंत हा लेख वाचा.
नक्की सापच चावलाय का हे कसे ओळखायचे ?
पुढे दिलेल्या काही लक्षणांवरुन आपण सापच चावला आहे का याची खात्री करु शकतो. १) चाव्याच्या ठिकाणी दोन जखमेच्या खुणा. २) प्रभावित जागेवर तीव्र वेदना. ३) रक्ताच्या गुठळ्या तयार होणे. ४) तोंडातून लाळ येणे. ५) उलट्या होणे. ६) ज्याठिकाणी चावा घेतला आहे तिथली जागा लाल होऊन सुजणे. ७) श्वास घेण्यास त्रास होणे. ८) डोळ्यांना अस्पष्ट दिसणे. ९) रक्तदाब कमी होणे. १०) धक्का बसणे. ११) भरपूर घाम येणे. १२) हातपाय बधिर होणे.
विषारी साप चावल्यावर त्वरित कोणते उपाय करायचे असतात ?
एखाद्या व्यक्तीला साप चावल्यास त्याला त्वरित रुग्णालयात नेले पाहिजे. परंतु प्रथमोपचार म्हणून पुढे नमूद केलेल्या गोष्टी करता येतील त्यामुळे रुग्णाची प्रकृती सुधारू शकते आणि त्याचे आयुष्य वाचू शकते. १) सर्वप्रथम रुग्णाला सापापासून दूर न्या आणि त्याला झोपवा. २) रुग्णाला बेशुद्ध होऊ देऊ नका. ३) साप कोणत्या प्रजातीचा आहे याची माहिती घ्या, म्हणजे आपण डॉक्टरांना त्याबाबत सांगू शकाल. ४) रुग्णाला शांत करा आणि त्याला हालचाल करु देऊ नका. यामुळे विष शरीरात जास्त पसरणार नाही. ५) त्यानंतर पट्टी त्याच्या जखमेवर बांधा. ६) बाधित भागावर दागदागिने असल्यास ते काढा. ७) सापाने पायावर चावा घेतला असल्यास रुग्णाचे चप्पल किंवा बूट काढा. यानंतर पाणी आणि साबणाने जखम धुवा.
साप चावल्यानंतर या गोष्टी अजिबात करु नका
१) साप पकडू नका. २) चुकूनही जखमेवर बर्फ लावू नये. ३) जखमेचे पाण्यात बुडवून ठेऊ नका. ४) जखमेवर चाकूचा वापर करु नका. ५) रुग्णाला दारु पाजू नका. ६) रुग्णाला चहा किंवा कॉफी देखील देऊ नका. ७) शरीरावर दाबून ब्लड सर्क्युलेशन थांबविण्याचा प्रयत्न करू नका. ८) विष उपसण्यासाठी पंप वगैरे साधने वापरू नका. हा लेख फक्त माहितीसाठी आहे. या विषयावरील अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी नक्की बोला आणि प्रथमोपचारासाठी प्रशिक्षण घ्या.