देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या लोकांनी जे काही सहन केले आहे, ते शब्दात सांगता येणार नाही. आपल्या देशात या महामारीला हरवणे हे एवढं अवघड नव्हतं, पण आपल्याला केवळ एकट्या कोरोना व्हायरसशी लढायचं नाही. कोरोनाव्यतिरिक्त आपल्याला १० अशा व्हायरस सोबत लढायचे आहे जे आपल्या आसपास आहेत. तुम्हीही त्या व्हायरसला ओळखता. ज्यावेळी कोरोना व्हायरस प्रभावी झाला त्यावेळी हे १० व्हायरस देखील प्रभावी झाल्याचे आपण पाहिले आहे. चला तर वेळ न घालवता पाहूया कोणते आहेत ते १० व्हायरस ज्यांच्याशी देखील आपल्याला लढायचे आहे.
१) अंधश्रद्धा पसरवणारा व्हायरस : कोरोनाच्या इलाजासाठी इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवल्या आहेत की विज्ञान सुद्धा लाजेल. कधी गोमूत्र पार्टी, कधी शेणाने अंघोळ, कधी कोरोनाला देवी सांगून पुजले गेले तर कधी त्याला कोरोनासुर म्हणून भासम केले गेले.
२) नियम न पाळणारा व्हायरस : देशामध्ये कोरोना आलेला एक वारसा होऊन गेले. तरीही लोकांना अजून समजले नाही की लॉकडाऊनमध्ये आपल्याला घराबाहेर पडायचे नाही. मास्क आणि सॅनिटायजर वापरायचे आहे. पण इथे नियम कुणाला पाळायचेत ?नियम हे मोडण्यासाठीच असतात हे आपल्या इकडे अभिमानाने सांगितले जाते.
३) धार्मिक हिंसाचार पसरवणारा व्हायरस : एका बाजूला लोक कोरोनाने मरत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही लोक एखाद्या साधारण गोष्टीला धर्माशी जोडून देशात हिंसाचाराची ठिणगी टाकत आहेत. कोरोना पसरवण्यासाठी एकमेकांच्या धर्माचे लोक कसे कारणीभूत आहेत यावर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
४) आर्थिक मंदीचा व्हायरस : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागला. मजुरांपासून ते छोटे व्यावसायिक आणि खाजगी कंपन्यांत काम करणारे नोकरदार यांच्यावर कुऱ्हाड कोसळली. कामगार कपात झाली. लोक शहरांकडून गावाकडे गेले. आर्थिक विवंचनेतून अनेक लोकांना मरण पत्करावे लागले.
५) उपासमारीचा व्हायरस : जर लोकांचे उत्पन्नच बंद असेल तर उपासमारी तर येणारच. लॉकडाऊनमध्ये लोकांनी या उपासमारीचे भयावह रुप बघितले. अनेकांनी बिस्किटे खाऊन दिवस काढले. अनेकांना तर ते ही नशिबात नव्हते.
६) अफवा पसरवणारा व्हायरस : सोशल मीडियावर कोरोना उपचाराच्या इतक्या अफवा पसरल्या आहेत की त्यांची संख्या पेशंट पेक्षा अधिक होते की काय याची शंका वाटते. या अफवांमुळे फायदा काही नाही झाला, पण मात्र नक्की झाले. या अफवांमुळेच लोक लसीकरणाला घाबरत आहेत.
७) संधीसाधू व्हायरस : ज्या काळात लोक आपल्या जवळच्या लोकांना वाचवण्यासाठी धावाधाव करत होते, वाट्टेल तितका पैसे खर्च करत होते, त्याचवेळी औषधांचा काळाबाजार केला जात होता. एका एका इंजेक्शनची किंमत पाचसहा पटीने अधिक केली होती. दवाखान्यापासून मेडिकल, स्मशानभूमी, पुरोहित, इत्यादि सगळेच घटक रुग्णाच्या कुटुंबियांना लुटत होते.
८) शिक्षणाच्या अभावाचा व्हायरस : विद्यार्थी शाळा किंवा कॉलेजात जाऊ शकत नाहीत. अनेक शाळांनी कॉलेजने मनमानी फी आकारली. परीक्षा रद्द केल्या. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली टाईमपास सुरु असतो. अशाने विद्यार्थी कसे शिक्षित होतील ?
९) चमकोगिरी करणारा व्हायरस : ज्यावेळी कोरोना मोठ्या प्रमाणावर पसरला होता, त्यावेळी राजकीय नेते प्रचारसभा घेऊन निवडणूक जिंकण्याची गणिते आखत होते. सर्वांना आपापल्या पक्षाचे पडले होते, जनतेशी कुणाला देणेघेणे नव्हते.
१०) गुन्हा करणारा व्हायरस : कोरोनाकाळात कोविद सेंटरमध्ये महिलांचा विनयभंग, ऑक्सिजन आणि ऍम्ब्युलन्सच्या नावाखाली फसवणूक, हॉस्पिटलमधील अनागोंदी हे सगळं सुरु होतं. गंगेच्या किनारी मृतदेह पुरले जात असताना त्यांच्या अंगावरची कफन चोरणारे लोकच होते.