कोरोनामुळे देशात सर्वच छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या खिशाला कात्री बसली आहे. एका बाजूला कोरोनाची भीती आणि दुसऱ्या बाजूला लॉकडाऊनचा हातोडा यामुळे सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. देशात अनेकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. कोरोनाची दुसरी लाट आली, अनेकांना आपला जीव गमवावा लागला. लसीकरण प्रक्रियेचा गोंधळ उडाला आहे. मात्र देशाचे प्रधानमंत्री मोदी यांचे या सगळ्याकडे लक्ष नाही असा आरोप अनेकजण करत आहेत.
बारामतीच्या चहावाल्याने १०० रुपयांची मनिऑर्डर पाठवून मोदींना दाढी कटिंग करण्याची विनंती केली
अनिल मोरे नावाचे गृहस्थ बारामतीत आपला चहाचा गाडा चालवतात. त्यांनी टीव्हीवर मोदी दाढी वाढवून देशवासियांना संबोधित करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी पोस्ट ऑफिस गाठले आणि मोदींना दाढी कटिंग करण्यासाठी १०० रुपयांची मनिऑर्डर केली.
चहावाल्याचे म्हणणे तरी काय आहे ?
मोदींना मनिऑर्डर करताना चहावाल्याने एक पत्रही पाठवले आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात, “गेल्या १५ महिन्यांपासून कोरोनारुपी राष्ट्रीय संकट आहे, मात्र केंद्र आणि राज्य सरकार काहीही ठोस नियोजन करत नाही. लॉकडाऊनच्या नावाखाली लोकांना भिकारी बनवून त्यांचे रोजगार आणि उत्पन्नची साधने नाहीशी केली आहेत. लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोकांना आपल्या दैनंदिन गरज, औषधे, राशनपाणी, लाईट बिल, विविध प्रशासकीय कर भरण्यासाठी पैसे नाहीत.
भारतीयांची अवस्था अत्यंत बिकट असताना मोदीजी आपण दाढीचे केस वाढवून काय सिद्ध करु पाहताय ? तुम्हाला वाढवायचेच असतील तर सरसकट मोफत उपचार वाढावा, लसीकरण केंद्र आणि औषधांची गुणवत्ता वाढवा. प्रति व्यक्ती प्रति घर किमान ३० हजार प्रति महिना आर्थिक मदत करण्याचे नियोजन करा. सर्वांची मागची थकीत आणि पुढे २०२२ पर्यंतची वीजबिले माफ करा. लोकांना मोफत घरपोच अत्यावश्यक सेवा पोहोचावा. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपये देऊन त्यांना आत्मनिर्भर करा. सर्व भारतीयांचे दोन वर्षांचे कर माफ करा. ज्यांचे नुकसान झाले त्यांना बिनव्याजी दीर्घमुदतीचे कर्ज द्या.
शेतकरी आणि लघु उद्योजकांना वाढीव सहकार्य करा. कुणाचेही शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नका. महागाई नियंत्रित करा. औषधांचा काळाबाजार रोखा. वैद्यकीय सेवा मोफत द्या. सर्व शासकीय पदांची भरती करुन घ्या. डोक्यावरचे केस आणि तोंडावरची दाढी वाढवून साधूसारखा वेशभूषा करून काय सध्या होणार नाही. राजकारण बनवेगिरी सोडून तुम्ही पहिले दाढी कटिंग करा. तुमचं व्यवस्थित टापटीप राहणे महत्वाचे आहे. तुम्ही चहावाले होता, मी ही चहावाला आहे. मी माझ्या कष्टाचे १०० रुपये आपणास पाठवत आहे. तुम्ही दाढी कटिंग करुन घ्या. भारतीय नागरिक या नात्याने मी आपणाला विनंती करतो.”