अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील गर्भगिरी डोंगराच्या कुशीत पांढरीपूल-करंजी रस्त्यावर असलेले गाव म्हणजे आव्हाडवाडी. या गावातील लोकसंख्या अवघी ७०० ते ८०० आहे. अत्यंत कमी लोकसंख्या असताना देखील या गावाने ‘फौजदारांचे गाव’ असा नावलौकिक मिळवला आहे.
गावातील १६ तरुण फौजदार आहेत. महाराष्ट्र आणि केंद्रीय शासकीय सेवेत वर्ग-१ अधिकारी म्हणून १४ जण सेवेत आहेत. २७ जण पोलीस दलात अंमलदार या पदावर कार्यरत आहेत. अत्यंत छोटस गाव असतानाही शिक्षणाचा आणि नोकरीचा दर्जा हा मात्र खूप मोठा आहे.
आव्हाडवाडी हे गाव तस दुष्काळी गाव आहे. दरवर्षी अल्प प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतीतून अत्यंत कमी उत्पन्न मिळते. शिक्षणाशिवाय आणि काम करण्याशिवाय तिथल्या तरुणांसमोर दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही. नगर शहर जेमतेम २५ किलोमीटरच्या अंतरावर असल्याने येथील सर्व तरुण शिक्षणासाठी धडपड करत असतात.
शासकीय सेवेत जाण्यासाठी ते रात्रंदिवस कष्ट करतात. गावात शासकीय सेवेची सुरुवात पहिले प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्ञानदेव आव्हाड हे विक्रीकर आयुक्त म्हणून दाखल झाले. त्यांच्यानंतर मात्र आव्हाडवाडीने मागे वळून पहिले नाही आणि गावात एका मागून एक जण शासकीय सेवेसाठी भरती होऊ लागला.
सध्या गावात २७ पेक्षा जास्त तरुण हे पोलिसदलात पोलीस अंमलदार म्हणून महाराष्ट्रात विविध ठिकाणी कर्तव्य बजावत असतात. विविध प्रकारच्या शासकीय कार्यालयांमध्ये देखील अनेक तरुण काम करत आहेत. शासकीय सेवेत असलेल्या तरुणांनी गावासाठी एकत्र येत गावात एक अत्याधुनिक वाचनालय सुरु केले आहे. गावातील जेष्ठ मंडळी देखील स्वेच्छेने या वाचनालयासाठी मदत करत असते. गावातील ८०% लोक वारकरी संप्रदायाला मानणारे आहेत. गावात नेहमीच अखंड हरिनाम सप्ताह,कीर्तन, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आजूबाजूची अनेक गावे आव्हाडवाडी गावाकडे आदर्श गाव म्हणून पाहतात.