राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र महिनाभरापूर्वी होतं. पण आता मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. मागील वर्षी कोरोना मार्चमध्येच महाराष्ट्रात दाखल झाला होता. त्याच मार्चची पुनरावृत्ती करत यावर्षी देखील कोरोनाने डोके वर काढले आहे.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघून अनेक जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन लावण्यात आलं होतं. तर काही शहरांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. हळू हळू सर्वच गोष्टींवर पुन्हा एकदा निर्बंध येत असल्याचं सध्या चित्र आहे.
राज्यातील कोरोना रुग्ण आटोक्यात आल्याने सर्वच गोष्टींमध्ये नागरिकांना सूट देण्यात आली होती. सर्वकाही सामान्य झाल्याचं चित्र होतं. पण नागरिकांनी खबरदारी न घेतल्याने आता कोरोनाचा विस्फोट झाला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत.
यापूर्वी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सिनेमागृह यांना पूर्ण क्षमतेने परवानगी देण्यात आली होती. तर लग्न समारंभ देखील खूप मोठ्या गर्दीत पार पडत होते. आता मात्र हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सिनेमागृहांना पुन्हा एकदा ५० टक्के क्षमतेने खोलण्यास सांगितले गेले आहे. तर राज्यात कोणत्याही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
काय आहेत नवीन निर्बंध-
-सिनेमागृह, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना पूर्ण क्षमतेने चालवण्यास देण्यात आलेली परवानगी निम्म्यावर आणण्यात आली. आता क्षमतेच्या केवळ ५० टक्के उपस्थितीला परवानगी.
-राजकीय सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम घेण्यास बंदी.
-विवाह सोहळ्यांना केवळ ५० जणांना उपस्थित राहता येणार
-अंत्य संस्कारासाठी केवळ २० जणांना उपस्थित राहता येणार
-आरोग्य सेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कंपन्यांमध्ये क्षमतेच्या केवळ ५० टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यास परवानगी
-धार्मिक स्थळं आणि ट्रस्ट यांना दर तासाचे नियोजन करुन भाविकांची संख्या मर्यादित ठेवण्याचं व्यवस्थापन करण्याचे आदेश