पंडित जवाहरलाल नेहरु आणि हरिवंशराय बच्चन यांच्या काळापासूनच गांधी-बच्चन कुटुंबामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. नेहरू प्रधानमंत्री असताना हरिवंशराय बच्चन परराष्ट्र मंत्रालयात हिंदी अधिकारी होते. हळूहळू नेहरुंच्या कन्या इंदिराजी आणि हरिवंशरायांच्या पत्नी तेजी बच्चन यांच्यातही मैत्री झाली.दोन्ही कुटुंबीय नेहमी एकमेकांना भेटायचे. राजीव गांधी दोन वर्षांचे आणि अमिताभ बच्चन चार वर्षांचे असल्यापासून त्यांच्यातही या गांधी-बच्चन कुटुंबामधील मैत्रीचे प्रतिबिंब उमटले. राजीवजी आणि अमिताभ दोघे एकत्र खेळतच मोठे झाले.
राजीव गांधी आणि सोनिया गांधी
१९६१ नंतर राजीवजी पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले. जानेवारी १९६५ मध्ये ते केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकत असताना एका रेस्टोरंटमध्ये त्यांची ओळख इटलीच्या ॲन्टोनीया माईनो (सोनिया गांधी) यांच्याशी झाली. तिथेच त्यांचे प्रेमप्रकरण जुळले.
१९६६ मध्ये राजीव गांधी भारतात परतले, त्याचवर्षी इंदिरा गांधी भारताच्या प्रधानमंत्री झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पायलटचे प्रशिक्षण घेतले. राजीव आणि सोनिया यांचे प्रेमप्रकरण तीन वर्षे चालले. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. इंदिराजींनीही या लग्नाला सहमती दिली.
बच्चन कुटुंबाने लावले राजीव सोनियांचे लग्न
गांधी कुटूंबियांना हे लग्न हिंदू रितीरिवाजानुसार करायचे होते आणि सोनियांसोबत त्यांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य आले नव्हते. अशा अडचणीच्या काळात राजीवजींना अमिताभची आठवण आली आणि आपली समस्या घेऊन ते अमिताभच्या घरी गेले. अमिताभने हरिवंशराय आणि तेजी बच्चन यांना ती समस्या सांगितली, सोबतच त्यांचे लग्न बच्चन कुटुंबियांच्या घरीच करण्याचा सल्लाही दिला.
१३ जानेवारी १९६८ साली सोनिया गांधी पहिल्यांदा भारतात आल्या, परंतु त्यांच्या परिवारातील इतर सदस्य भारतात येऊ शकले नाहीत. गांधी कुटुंबाच्या विनंतीनंतर तेजी बच्चन स्वतः दिल्लीच्या पालम विमानतळावर सोनियाजींना आणायला गेल्या, त्यावेळी अमिताभ बच्चन देखील त्यांच्यासोबत होते. त्यानंतर सोनियाजी ४४ दिवस बच्चन कुटुंबियांच्या घरी राहिल्या. २५ फेब्रुवारी १९६८ रोजी राजीव गांधी वरात घेऊन अमिताभच्या घरी आले. स्वतः हरिवंशराय बच्चन यांनी सोनियांचे कन्यादान केले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.