राजस्थानमध्ये अंतर्गत संघर्षातून सुरु झालेला वाद आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचला आहे. सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात खटके उडत होते. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पदाची आशा होती पण अनुभवी असलेल्या गेहलोतांना मुख्यमंत्री बनवण्यात आले.
सचिन पायलट यांनी अखेर बंड पुकारत काँग्रेसपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी नाराजीचं बंड पुकारलं. त्यानंतर त्यांना काँग्रेसच्या वरिष्ठांकडून वारंवार चर्चेला येऊन प्रश्न सोडवा असे आवाहन करण्यात आले. पण त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. अखेर काल सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसने हकालपट्टीची कारवाई केली आहे. त्यांना उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं आहे.
दरम्यान यांच्या बंडाचे कारण ठरली आहे त्यांना पाठवण्यात आलेली देशद्रोहाची नोटीस. कॉंग्रेस सरकार अंतर्गत त्यांच्या स्वतःच्या मंत्र्याला नोटीस देत आहे त्यामुळे माझा स्वाभिमान दुखावल्याचे सचिन पायलट यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.
त्यांच्यावर भाजपसोबत मिळून सरकार पाडत असल्याचा आरोप झाला. यावर त्यांनी मी असा कुठलाही विचार केला नाही उलट राजस्थानमध्ये कॉंग्रेसला जिंकण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, मी पक्षाच्या विरोधात काम का करणार? असे उत्तर दिले.
भाजपमध्ये जाणार का? सचिन पायलट यांनी दिले ‘हे’ उत्तर-
या मुलाखतीत त्यांना भाजपमध्ये जाणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी नाही असे उत्तर दिले आहे. ते म्हणाले,’पहिल्यांदा स्पष्ट करतो की, मी भाजपात प्रवेश करणार नाही, मला लोकांसाठी काम करायचे आहे इतकचं आता सांगू शकतो.’ मी भाजपाच्या कोणत्याही नेत्याला भेटलो नाही. असे ते म्हणाले.
नवा पक्ष काढू शकतात पायलट-
सध्या सचिन पायलट आणि त्यांच्या २ सहकाऱ्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर स्पीकर यांनी १९ आमदारांना सदस्यत्व का रद्द करू नये म्हणून नोटीस पाठवली आहे. यानंतर सचिन पायलट काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. सचिन पायलट यांच्याकडे स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा पर्याय असणार आहे. ते पक्ष स्थापन करून काँग्रेसला आव्हान देऊ शकतात.
राजस्थानमध्ये सुमारे ३० असे मतदारसंघ आहेत जिथे सचिन पायलट यांचा दबदबा आहे. गुर्जर मतदारांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात ते आपले उमेदवार निवडून आणू शकतात. तसेच मुस्लिम लोकसंख्या आणि मीणा मतदारांची संख्या अधिक असलेल्या ठिकाणीसुद्धा ते यशस्वी होऊ शकतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.