कोरोनाच्या निमित्ताने भारतामध्ये एक चर्चा बराच काळ चालली. त्या चर्चेचा अश्या असा होता की, “मोठमोठ्या बंगल्यात राहणाऱ्या श्रीमंतांनी परदेशातून कोरोना भारतात आणला, पण त्याचा त्रास झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागत आहे.”
थोडक्यात शहरातील हाय क्लास सोसायटीत राहणारे लोक उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने विमानाने परदेशात गेले आणि त्यांनीच भारतात कोरोना आणला. त्यामुळे देशात कोरोना पसरला, लॉकडाऊन झाले आणि लोकांचा रोजगार बुडाला वगैरे असा आक्षेप घेतला जातो. मुंबईची धारावी झोपड्पट्टीही कोरोनाची हॉटस्पॉट बनली होती, परंतु नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे धारावी कोरोनमुक्त होत आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचे आभार मानले आहेत.
काय आहे धारावीचा इतिहास ?
मुंबईची ओळख सात बेटांचे शहर अशी असतानाच्या काळात ब्रिटिशांनी आपली तटबंदी सुरक्षित करण्यासाठी १७३७ मध्ये धारावीत “रेवा” हा किल्ला बांधला, जो आज काळा किल्ला म्हणून ओळखला जातो. त्यावेळी धारावी हे खारफुटीचे दलदलयुक्त बेत होते. नंतर बेटांलगतच्या खाड्यांमध्ये भराव टाकून ही सात बेटे एकत्र केली गेली. त्यानंतर धारावीत मासेमारी करणाऱ्या लोकांनी वस्ती केली. पुढे मुंबईची लोकसंख्या वाढल्यानंतर १८८४ साली ब्रिटिशांनी प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने मुंबईतील चामड्याचे कारखाने धारावीला हलवले.
हिंदू धर्मात अस्पृश्य मानले जाणारे आणि मुस्लिम लोक अशा कारखान्यांमध्ये काम करायचे, त्यामुळे त्यांच्यासाठी ब्रिटिशांनी धारावीला वस्ती वसवली. त्यानंतर १८९५ मध्ये ब्रिटिशांनी कुंभार समुदायाला व्यवसाय करण्यासाठी ९९ वर्षांच्या कराराने धारावीला जमीन दिली. नंतर आसपास कापडउद्योगही आला.
हळूहळू कारखान्यांची संख्या वाढत गेली आणि नोकरीच्या शोधात ग्रामीण भागातून मुंबईला येणाऱ्या लोकांनी धारावी भागात वस्ती करायला सुरुवात केली. शहरीकरणात वाढ झाल्याने कधीकाळी मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या धारावीच्या कडेला नागरीकरण वाढत गेले. धारावीच्या झोपडपट्टीत वाढ झाली.
५२० एकर परिसरात पसरलेल्या धारावीत आज ७ ते ८ लाख लोक राहतात. गर्दी वाढल्याने अनेकदा धारावी साथीच्या आजारांनी हतबल होताना पाहायला मिळते. १८९६ साली आलेल्या प्लेगच्या साथीत धारावीमध्ये २० हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला होता. आजघडीला पारंपरिक मातीच्या वस्तू, कापड व्यवसाय, कचरा प्रक्रिया उद्योग, चामडे व्यवसाय आणि इतर छोटेमोठे व्यवसाय यातून एकट्या धारावीचा वार्षिक टर्नओव्हर १०००० कोटींच्या घरात गेला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.