विकास दुबेच्या निमित्ताने ….
विकास दुबेसारखे माणूस तयार होणं , त्यांनी बाहूबली म्हणून मिरवण हे अगदी तालुक्यातालुक्यात घडतय …महाराष्ट्र हा युपी बिहार नाही अस म्हणणार्यांना पुण्यातला लोणी काळभोरचा अप्पा लोंढे आठवत असेल … असंख्य गुन्हे , उलट्या काळजाचा म्हणून त्याची ओळख , बेकायदा वाळूउपश्याचा मुख्य धंदा आणि जोडीला दहशतीखाली जमीनी बळकावण्याचा तेजीतला व्यवसाय .. अगदी पोलिस सुध्दा आप्पा लोंढेच्या दहशतीला घाबरायचे , त्याचा तपास करणारे काही पोलिस कर्मचारीच गायब असल्याच्या कथा ही तिथे सांगितल्या जातात … ग्रामीण पोलिसांनी अप्पाच्या वाढत्या दहशतीला पायबंद घालायचा प्रयत्न केला तेव्हा तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी त्याची तडीपारी रद्द केली होती …
जवळपास वीस वर्ष अगदी पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्याचा एकमेकांना लागून असलेला भाग अप्पा लोंढेचा इलाखा समजला जायचा … कम्युनिकेशन गॅप असलेल्या तीन जिल्ह्याच्या पोलिसांच्या हद्दीच्या वादाचा फायदा त्याने कायम ओळखला … असंख्य गुन्हे केले ,पचवले , यंत्रणेला कस वाकवायच यासाठी कायद्याची धुळधाण न्यायालयात करणारे वकील त्यावेळी त्याच्या दिमतीला होते … त्याच्या दहशतीची कारकीर्द वीस ते पंचवीस वर्ष या भागात लोकांचे पाडत होती , जमीनी बळकावत होती , सरकार नावाच्या यंत्रणेला राजरोस मूर्खात काढत होती ….
त्याच्या या कारनाम्यांना संपवण्याचा चंग ग्रामीण पोलिसांनी बांधला ,त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी होते राम जाधव … एसपी होते जय जाधव … अप्पा लोंढेला पकडायच जिवंत किंवा मृत हे नक्की झाल कारण तो सहज पोलिसांना शरण येईल हे गृहीत धरण्यात अर्थ नव्हता , याची माहिती अप्पा लोंढे ला मिळाली आणि तो फरार झाला …पोलिसांचा महिनाभर शोध सुरू होता ..अप्पा लोंढेला कुणकुण होती त्याचा होणार ..
आणि अचानक एक दिवस बातमी आली अप्पा लोंढे सोलापूर पोलिसांकडे हजर झाला सहाजिकच पुणे पोलिसांना हा मोठा हादरा होता….अप्पा लोंढेला वाचवण्यासाठी ही खेळी खेळण्यात आली होती … ज्यात राजकारणी आणि पोलिस दोन्ही सहभागी होते …
तीन महिन्यानंतर अप्पा लोंढे जामीनावर बाहेर आला आणि पुन्हा त्याने त्याचे जमीन बळकवण्याचे उद्योग सुरू केले …. शेवटी अश्याच जमीन बळकवण्याच्या प्रकरणात त्याचा त्याच्याच घराजवळ अत्यंत वाईट अंत करण्यात आला .
विकास दूबे आज वाचला असेल पण त्याचाही अंत फार लांब आणि वेगळा नाही …
वैभव सोनवणे
न्यूज१८लोकमत, पुणे