विलासराव देशमुख महाराष्ट्राला जीव लावणारे व्यक्तिमत्व ! बदल्यात महाराष्ट्रातील जनतेनेही त्यांना तितकेच, किंबहुना त्यापेक्षा जास्त जीव लावला. सतत लोकांमध्ये राहणे, त्यांच्याशी संवाद साधणे विलासरावांना आवडायचे. विलासरावांना मुख्यमंत्री असतानाही कोणताही माणूस थेट फोन लावू शकत होता आणि विलासरावही प्रत्येकाच्या फोन कॉलला उत्तर द्यायचे. कॉल उचलता आला नाही तर वेळ मिळाल्यावर रिटर्न कॉल करायचे. आलेला फोन ते कधीच टाळत नसायचे. फोन उचलल्यानंतर “हॅलो, मी विलासराव देशमुख बोलतोय.” हे त्यांचे वाक्य अनेकांनी आपल्या काळजात साठवून ठेवलं आहे.
कधीकधी तर लातूरच्या ग्रामीण भागातील त्यांच्यावर प्रेम करणारी सर्वसामान्य मुलेही खरोखरच विलासराव फोन उचलतात का हे पाहण्यासाठी त्यांच्या नंबरवर कॉल करत. तेव्हा पलीकडून फोन उचलल्यानंतर विलासराव अत्यंत दिलखुलासपणे त्यांची खुशाली विचारायचे.
काही काम आहे का विचारायचे. सहज तुम्ही फोन उचलता का ते पाहण्यासाठी कॉल केला असे मुलांनी सांगितले की अत्यंत शांतपणे, न रागावता विलासराव त्यांच्याशी संवाद साधायचे. एकदातरी लातूरच्या एका जीपचालकाला वाहतूक पोलिसांनी अडवल्यानंतर त्याने थेट विलासरावांना फोन केला. त्यावेळी विलासरावांच्या विनंतीनंतर वाहतूक पोलिसाला त्याला सोडून दिले. असे अनेक किस्से आहेत. इतका मनाचा निरागस नेता महाराष्ट्राने गमावला याचे सर्वांनाच दुःख आहे.
विलासराव देशमुखांचा तो मोबाईल नंबर आजही आहे चालू, फोन लावून ऐकू शकता भाषणे
विलासरावांना जाऊन आता जवळपास आठ वर्षे होत आली, पण त्यांची आठवण लोकांच्या मनातून कमी झाली नाही. पण विलासरावांचा ९८२११२५००० हा मोबाईल नंबर आजही कित्येकांच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. चाहत्यांचे विलासरावांवरील प्रेम पाहून त्यांच्या पुत्रांनी त्यांचा हा मोबाईल नंबर आजही चालू ठेवला आहे. या नंबरवर तुम्ही कधीही फोन लावू शकता. फोन लावल्यानंतर तुमच्याशी विलासराव बोलत नाहीत, पण त्यांची गाजलेली भाषणे तुम्हाला ऐकायला येतात.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.