१९५७ साली प्रसिद्ध अभिनेता आणि गायक किशोर कुमार यांचा “बेगुनाह” नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता. त्यावेळी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अमेरिकेतील पॅरामाऊंट पिक्चर्स या कंपनीने आरोप केला होता की त्यांच्या १९५४ मध्ये आलेल्या “नॉक ऑन वुड” या चित्रपटाची नक्कल करुन किशोर कुमारांनी “बेगुनाह” चित्रपट बनवला आहे. त्यानंतर हा वाद मुंबई उच्च न्यायालयात गेला आणि त्याठिकाणी पॅरामाऊंट पिक्चर्स कंपनीने हा खटला जिंकला.
पॅरामाऊंट पिक्चर्स कंपनीच्या “नॉक ऑन वुड” चित्रपटाची नक्कल करुन “बेगुनाह” चित्रपट बनवल्याचे मुंबई कोर्टात सिद्ध झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने किशोर कुमार यांना “बेगुनाह” चित्रपटाच्या सर्व रीळ नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी चित्रपटाच्या सर्व रीळ शोधून नष्ट करण्यात आल्या होत्या. या केसशी निगडित फारच थोड्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या होत्या. परंतु आता “नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया”ला त्या चित्रपटाची दुर्मिळ अशी रीळ सापडल्याने सर्वजण आनंदात आहेत.
बेगुनाह चित्रपटाच्या सापडलेल्या दुर्मिळ रीळमध्ये संगीतकार जयकिशन (शंकर – जयकिशन जोडीपैकी) हे पियानो वाजवत आहेत. अभिनेत्री शकीला त्यावर नृत्य करत आहेत. मुकेश कुमार “ऐ प्यासे दिल बेजुबा…” हे गाणे गात असल्याचे दिसत आहे. “नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया”चे संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले की शंकर-जयकिशन यांचे चाहते गेल्या अनेक वर्षांपासून लोक या चित्रपटाच्या रिळाच्या शोधात होते, कारण जयकिशन यांचा या चित्रपटात मोठा रोल होता.