प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्वप्न असते, की आपल्या आयुष्यात कमीत कमी एकदा तरी परदेश दौरा करुन करायला मिळावा. कोणाला सिंगापूरला फिरायला जाण्याची इच्छा असते तर कोणाला स्वित्झर्लंड, पॅरिसचे निसर्गसौंदर्य आपल्या डोळ्यात सामावून घ्यायचे असते. परंतु विमानाच्या तिकिटाव्यतिरिक्त त्या देशांमध्ये फिरण्यासाठी खूप साऱ्या पैशांची गरज लागते.
कदाचित हेच कारण असेल ज्यामुळे अनेकजण आपल्या परदेशात फिरण्याच्या इच्छेला मुरड घालणेच पसंत करतात. तरीसुद्धा तुम्हाला परदेशात फिरायचे असेल ते देखील कमी खर्चात, तर मग तुम्ही भूतान पासून सुरुवात करु शकता.
भूतानलाच फिरायला का जायचे ?
हिमालयाच्या डोंगररांगांमध्ये लपलेला भूतान बऱ्याच काळापासून रहस्य आणि कथांमध्ये चर्चेत राहिला आहे. असं मानलं जातं की जगातील सर्वात आनंदी लोक भूतानचे असतात. भूतान हिमालयाच्या अप्रतिम निसर्ग सौंदर्य, शांत बौद्ध मठ आणि मौजमजा पसंत करणाऱ्या लोकांचा देश आहे. इथे श्वास रोखून धरायला लावणाऱ्या हिमालयाच्या त्या लोभस नजाऱ्यांचे दर्शन होते जिथे बर्फाळ डोंगर, हिरवीगार मैदाने आणि प्राचीन जंगलांचा संगम आहे.
इथल्या निसर्गाच्या सुंदर छटांमध्ये स्वच्छ आणि ताज्या हवेचा आनंद घ्यायला मिळेल. तसेच तुम्हाला या गोष्टीचे अजिबात आश्चर्य वाटायला नको की भूतान हा संपूर्ण जगातील पहिला आणि एकमेव कार्बनविरहित देश आहे, कारण इथे उद्योग धंद्यांतून होणारे कार्बन उत्सर्जन कमी आहे.
भुतानमध्ये काय काय करणार ?
भूतानमध्ये पाहण्यासाठी खूप काही आहे. हा असा एक देश आहे जिथे तुम्ही अवश्य गेले पाहिजे. इथला तक्तसुंग पालफंग मठ जो टायगर्स नेस्ट मठ म्हणून देखील प्रसिद्ध आहे. या मठाकडे जायच्या रस्त्यावर तुम्हाला डोंगरदऱ्या आणि जंगलाचा अप्रतिम नजारा बघायला मिळेल, त्यासोबतच अनेक बौद्ध प्रार्थनास्थळे पाहण्याचा आनंदही घेता येईल. इथे तुम्हाला अनेक राष्ट्रीय उद्याने पाहता येतील जिथे भूतानचा राष्ट्रीय प्राणी टाकीन, हिम बिबट्या, गळ्यावर काळे पट्टे असणारे सारस आणि वाघ बघायला मिळतील.
भूतानमध्ये जायला आणि फिरायला किती खर्च येतो ?
भूतानच्या पर्यावरण आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी तिथल्या सरकारने पर्यटकांना प्रति व्यक्ती प्रतिदिन १४२६४ रुपये शुल्क ठेवले आहे, त्यामुळे भूतान सहल जगातील सर्वात महाग सहलींमध्ये समाविष्ट केली जाते. परंतु भारत हा एकमेव असा देश आहे, जिथल्या लोकांना कुठलेही शुल्क न देता भूतानमध्ये फिरता येऊ शकते. भारत आणि भूतान यांच्यातील व्यापार, पर्यटन करारामुळे हे शक्य आहे.
भूतानला जाण्याचा योग्य काळ कोणता ?
तसं तर वर्षाच्या कुठल्याही महिन्यात भूतानला जाऊ शकता, परंतु भूतानला जायचा सर्वात चांगला काळ म्हणजे एप्रिल ते जुलै किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबर हा आहे. भूतानला जाण्यासाठी तुम्हाला व्हिसाची आवश्यकता नसते, फक्त आपला पासपोर्ट किंवा आधार किंवा मतदान ओळखपत्र घेऊन जाऊ शकता.
भूतानला कसे जाणार ?
भूतानला जाण्यासाठी दोन फ्लाईट आहेत. ड्रकएअर आणि भूतान एअरलाईन्स, ज्या दिल्ली, बँकॉक, सिंगापूर आणि काठमांडू येथून सापडतील.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.