हापूस म्हणलं की प्रत्येकाला कोकण आठवते. अप्रतिम स्वाद आणि गोडीसाठी कोकणातील हापूस जगाच्या पाठीवर प्रसिद्ध आहे. हापूसला “कोकणचा राजा” असा मान आहे. हापूस म्हणजे कोकणासीयांचा स्वाभिमान आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि जोडून आलेला हापूस आंब्यांचा सिझन यासोबत कित्येक कोकणवासीयांच्या आठवणी जोडल्या आहेत. हापूस आंब्यावर चित्रपटही निघावा इतकं त्याचं कोकणाशी घट्ट नातं आहे.
अशा या हापूसच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन मागच्या काही वर्षांपासुन आफ्रिकन आंब्यांचा बाजारात प्रचार केला जात आहे. कोकणच्या राजावरील हे आफ्रिकन आक्रमण थोपवण्यासाठी काही कोकणवासियांनी मोहीम हाती घेतली आहे.
कोकणातील हापूसच अस्सल, बाकीचे डुप्लिकेट
महाराष्ट्रातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या या पाच जिल्ह्यातील हापूस आंब्याला भौगोलिक निर्देशांक म्हणजेच जिऑग्राफिकल आयडेंटीफिकेशन मिळाले आहे. कोकणच्या या पाच जिल्ह्यातील हवामान, माती, पाण्यामुळे हापूस आंब्याला एक विशिष्ठ चव प्राप्त झाली आहे.
या पाच जिल्ह्यांव्यतिरिक्तच्या अन्य आंब्यांसाठी हापूस ही ओळख वापरणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्रात यंदा आलेल्या “क्यार” वादळामुळे पुढच्या वर्षी हापूस उशिरा बाजारात येणार आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन बाजारात आफ्रिकेच्या माळवी देशातील आंब्यांचा हापूसच्या नावाने प्रचार झाल्याने कोकणवासियांनी राग व्यक्त केला आहे.
आफ्रिकन मालवी हा हापूस नाहीच
२०११ ते २०१३ दरम्यान आफ्रिकेतील एका उद्योजकाने कोकण कृषी विद्यापीठातून हापूसची ४०००० रोपे दक्षिण आफ्रिकेच्या मालवी देशात नेऊन ७०० हेक्टरवर त्याने या रोपांची लागवड केली होती. मागच्या वर्षीपासून त्याच्या “मालवी मँगोज” कंपनीचे आंबे भारतात आयात करायला सुरुवात झाली. पुणे मुंबईच्या बाजारपेठेत हे आंबे १८००-२२०० रुपये डझनाने विकले जात आहेत.
हे आंबे रंगाने आणि चवीने हापूसला मिळतेजुळते असल्याचा दावा करुन त्यांची विक्री केली जात आहे, मात्र त्यांना हापूस म्हणता येणार नाही. कारण भौगोलिक निर्देशांक केवळ कोकणातील हापूसला आहे. आफ्रिकेच्या आंब्यांना हापूस नावाने जगात प्रचार करणे म्हणजे कोकणच्या हापूसची ओळख मिटवण्याचा प्रयत्न करण्यासारखे असल्याचा रोष कोकणवासियांनी व्यक्त केला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.