सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व पेचप्रसंग निर्माण झाला आहे. निवडणुका होऊन आणि निकाल येऊन १४ दिवस उलटत आले तरी महाराष्ट्रात कोणाचा मुख्यमंत्री होणार आणि कधी नवीन सरकार स्थापन होणार याविषयी स्पष्टता नाहीये. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविला.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. आज राज्यात अनेक वेगवान घडामोडी घडल्या. फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींचा खुलासा केला.
त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर अनेक गंभीर आरोप देखील केले. फडणवीस यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले गेल्या पाच वर्षांत आणि गेल्या १० दिवसांत मोदींवर शिवसेनेकडून खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. एवढी टीका काँग्रेसनेही केली नाही.
मोदींविरोधात असे शब्द वापरणे सुरूच राहणार असेल तर सरकार कशाला चालवायचे असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे फडणवीस म्हणाले. शिवसेनेच्या नेत्यांना आमच्याशी चर्चा करण्यास वेळ नाही पण काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करण्यासाठी शिवसेनेला वेळ होता. अगदी दिवसाला तीन तीन वेळा ते जात होते, असे गंभीर आरोप त्यांनी केले.
शिवसेनेशी युतीसाठी मी उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. मात्र, त्यानी ते घेतले नाहीत असे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केला.
त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत भाजपवर अनेक आरोप केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कितीही खोटारडेपणाचे आरोप केले तरी जनतेला सगळं माहित आहे. महाराष्ट्राच्या जनतेसमोर शिवसेनाप्रमुखांचा मुलगा खोटं बोलतोय ही ओळख मी जाऊ देणार नाही. बाळासाहेबांच्या मुलावर पहिल्यांदा कोणीतरी खोटेपणाचे आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यात महाशिवआघाडीचे सरकार?
आज राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर राज्यात शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार बनेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या ३ पक्षांनी मिळून सरकार स्थापन करावं अशी महाराष्ट्रातील जनतेतीच इच्छा असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान आज पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकाच बॅनरवर फोटो झळकले आहेत. पुण्यातील कोंढवा भागात हे बॅनर झळकल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात हे महाशिवआघाडीचे सरकार खरोखर अस्तित्वात येते का हे येत्या काही काळात कळेल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.